Homeमाय व्हॉईसमहापौर साहेब, उंटावरून...

महापौर साहेब, उंटावरून शेळ्या हाकण्यात काय अर्थ?

महापौर नरेश म्हस्के महोदय, प्रथम आपले अभिनंदन करतो कारण कधी नव्हे तो आपला पारा चढला! गेल्या सुमारे दिड वर्षात तुम्हाला रागावलेले पाहिले नव्हते. किंबहुना, तुम्हाला कधी राग येतो की नाही याबाबत शंका होती. शिवसेनेचे असूनही तुम्ही मिळमिळीत वाटत होतात. काहीजण मात्र खासगीत म्हणत होते की, पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना रागवण्याचे काम म्हस्के साहेब कसे करतील? मागेही एकदा आम्ही म्हटले होते, पालकमंत्री शिंदे यांनी रागवायचे आणि म्हस्के यांनी सर्वांना (गरज नसताना) सांभाळून घ्यायचे, असा जणू अलिखित करारच असावा!

असो.. याविषयी पुन्हा कधीतरी.. आजचा विषय आहे संतप्त झालेल्या महापौरांनी पालिका आयुक्त विपीन वर्मा यांना लिहिलेले खरमरीत पत्र. मात्र या पत्रावर समस्त ठाणेकर मात्र नाराज आहेत. कारण, या पत्रात दिवा येथीलच अनधिकृत बांधकामांचा उल्लेख आहे. खरे तर संपूर्ण ठाणे शहरच अनधिकृत कामांची बजबजपुरी ठरत आहे, अशी आमची धारणा आहे. अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत रिक्षावाले, अनधिकृत वाहतूक करणाऱ्या बसेस ही अनधिकृत कामांची यादी मारुतीरायाच्या शेपटीप्रमाणे वाढणारी आहे.

आपण बांधकामाबाबत बोलूया. अशी अनधिकृत बांधकामे केवळ दिवा भागातच आहेत का साहेब? अगदी ठाणे रेल्वेस्थानकापासून सुरुवात करून अगदी गायमुखपर्यंत, तसेच माजीवडापासून कोलशेत आणि कशेळीपर्यंत, तसेच वर्तकनगरपासून ते येऊर टेकडीपर्यंत नौपाडा, कॅडबरी,पोखरण, मानपाडा, ओवळा, कोपरी परिसर आदी अनेक ठिकाणी नजर मारली तरी अनधिकृत भावंडे सर्वत्र दिसतील. मग एकट्या दिवा विभागानेच काय घोडे मारले? कळवा, मुंब्रायेथील बजबजपुरी तर डोळ्यात भरण्याजोगीच आहे. थोडक्यात ठाण्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या संबंधातील माहिती घेताना एक अजब किस्सा कानावर आला. शहरातील एक आमदारही काही वर्षांपूर्वी अनधिकृत इमारतीत राहत होता. तो नगरसेवक असताना त्याने व एका दिवंगत पत्रकाराने प्रयत्न केल्यानंतरच ती इमारत अधिकृत झाली होती. म्हणजे थोडक्यात आधी इमारत बांधा आणि नंतर ती अधिकृत करून घ्या, असे प्रकार ठाणे शहराला काही नवीन नाहीत.

“या शहराच्या कानाकोपऱ्यात

घेतला होता मोकळा श्वास

लोकशाहीच्या या तुडुंब गर्दीत

डाव्या उजव्या हाताकडेही होती

थोडी थोडी मोकळी जागा जिच्यातून

आत शिरलो बाहेर आलो

बिनदिक्कत कधीही

वेगवेगळ्या चिन्हांनी

लोकशाहीचा बडेजाव अर्थ सांगत

वयासोबत केली साथसंगत तेव्हा

गुदमरला नव्हता श्वास आतासारखा”

महापौर महोदय.. आपण राजकीय वस्त्रे काढून ठेवलीत तर आपल्याही भावना अशाच असतील.

अनधिकृत बांधकामांमुळे जितका ताण नागरी सुविधांवर पडत आहे तितकाच, किंबहुना थोडा अधिक त्रास अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रशासनावर पडत आहे. कोर्ट नाका परिसर, ठाणे स्थानक परिसर, खोपट, माजीवडा, ढोकाली नाका मानपाडा, मनोरमा नगर वागळे इस्टेट आदी अनेक परिसरात आलटून पालटून कोठलाही लवाजमा न घेता कोणालाही कल्पना न देता सहकुटूंब पायी फेरफटका किंवा खरेदी करण्यासाठी म्हणून अगदी थोडा वेळतरी जाऊन पाहा ना साहेब! आपल्या कुटुंबाने आपल्याला बोल लावला नाही तर आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार असेन. तुम्हीच नाही तर कोणताही लोकप्रतिनिधी आजकाल पायी फिरत नसल्याने त्यांना शहरात किंवा आपल्या विभागात काय चालले आहे तेच कळत नाही. यालाच आपल्या ग्रामीण भाषेत उंटावरून शेळ्या हाकणे असे म्हणतो. यात आपण एकटेच दोषी आहात असे नाही. लोकांसकट सर्वांचाच याला हातभार लागलेला आहे.

आपण आपल्या पत्रात अधिकाऱ्यांना बोल लावला आहे. विशेषतः सहाय्यक अधिकाऱ्यांना आपण दोषी धरले आहे. बिचारा विभाग अधिकारी! त्याच्या हातात काय असते हो? कागदावर त्याला बरेच अधिकार आहेत. पण त्याला ते अधिकार आपले नगरसेवक वा लोकप्रतिनिधी वापरू देतात का? एखादे काम अडले आणि ते अधिकाऱ्यांनी अडवले आहे असे कळले तर लोकप्रतिनिधी त्याच्या कॉलरला हात घालतात. इतकेच नव्हे तर त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उच्चरवाने उद्धार करतात असे अनेक प्रकार आपल्या कानावर आले असतील आणि त्यांच्यावर कधीच कुठलीही कारवाई झालेली नसेल. ही माहितीही आपल्या ब्रिफकेसमध्ये नक्कीच असेल.

प्रभागात इतकी दहशत असेल तर शहर विकास विभाग वा इमारत प्रस्ताव विभागात ती किती असेल याचा आपणच विचार करा. ठाणे शहरातही निवडक भागात जरा भेटी देऊन कशाप्रकारे इमारती बांधल्या आहेत याची पाहणी करा. मुख्य रस्त्याला एक्सेस कुठून आणि कसा दिलेला आहे हे पाहिल्यावर आपणही कपाळावर हात मारून घ्याल याची खात्री आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे लक्ष दिलेच पाहिजे. परंतु तो किती पाण्यात आहे, याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.

“politicians and bureaucrats are the new upper class in our country. It is an upper class that is growing by an increasing number of paid politicians and municipalities in country they let the people suffer but let them go free” ही जनभावना वाढीस लागलेली आहे. हा खर तर धोक्याचा इशारा आहे. सर्व ठाणे शहरभर छोट्यामोठ्या गॅरेजचे भरमसाठ पीक आलेले दिसते. मात्र आयुक्तांचा बंगला आणि विव्हियाना मॉल लगतच्या मोठ्या पदपथावरही गॅरेजचा मागमूसही नसावा हे पाहून जनता गालातल्या गालात हसत आहे. गॅरेजला विरोध नाही. या गॅरेजमुळे मुख्य रस्त्याचा बराच मोठा भाग व्यापलेला असतो. वाहतुकीसही यामुळे मोठा अडथळा होत असतो. यातूनही नागरिकांची सुटका नको का महापौर महोदय?

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content