Homeटॉप स्टोरीखोके गेले कुठे...

खोके गेले कुठे हे महाराष्ट्रासमोर येणारच!

उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत जिल्हा-जिल्ह्यात प्रतिस्पर्धी निर्माण केले. हे पक्षप्रमुखांचे काम नाही. पण त्यांना दरबारी राजकारण करायचे होते. का तुम्हाला इतकी असुरक्षितता वाटत होती? आणि आता उठाव झाल्यानंतर आमच्यावर खोके घेतले… खोके घेतले… म्हणून आरोप करता? इथे बसलेल्या हा जो जनसमुदाय आहे, काय प्रत्येकाने खोके घेतलेत? सगळे खोके कुठे गेले हे एक दिवस महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.

शिवसेनेचा वर्धापनदिन काल गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये प्रचंड जल्लोषात साजरा झाला. खचाखच भरलेल्या या हॉलमध्ये उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही मणिपूरला जायला सांगता? मणिपूर काय, त्यांनी पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करून दाखवला आहे. तुम्ही अडीच वर्षांत वर्षातून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही आणि पंतप्रधान मोदींना आव्हान देता, असा सवाल त्यांनी केला. बिपरजॉय चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये तीन दिवस तळ ठोकून होते आणि तुम्ही 26 जुलैला जेव्हा मुंबईत पूर आला होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना घरी सोडून हॉटेलमध्ये राहायला गेला होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

अयोध्येतील राममंदिर तसेच जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राममंदिर जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अमित शाह यांनी 370 कलम हटवून दाखवले आहे. ज्यांनी या गोष्टी केल्या, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले त्यांच्याशी युती करायचं सोडून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर बसलात… फक्त खुर्चीसाठी. आणि आम्ही गेलो तर गद्दार? गद्दार कोण? तुम्ही की आम्ही, असा सवाल त्यांनी केला.

फक्त एक नोटीस आली तर यांची लेंडी पातळ झाली. बघत नाही तोपर्यंत ठीक आहे. बाळासाहेबांची पुण्याई सोबत आहे तिथपर्यंत ठीक आहे. पण वाटेल ते बोलण्याआधी औकातीत राहा, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना बजावले. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान, वर्षा सोडले… त्यावेळेला तुम्ही किती नाटक केलं. बॅगा काय काढल्या.. गळ्याला पट्टा काय बांधला. अश्रू काय ढाळले… सत्ता येत असते, जात असते आणि तुम्ही एव्हढे मनावर घेतले. पण दुसऱ्या दिवशी पट्टा गायब… माणूस तरतर चालायला लागला. ही करामत डॉ. एकनाथ शिंदे यांनी केली, असेही ते म्हणाले.

तुम्ही रिक्षावाल्याची हेटाळणी केली, टपरीवाल्याची केली, वॉचमनची केली. बाळासाहेबांनी याच सर्व लोकांना सोबत घेऊन शिवसेना वाढवली. आणि याच रिक्षावाल्याने मर्सिडीजला खड्ड्यात घातले. त्यामुळे नादी लागू नका. ही आग आहे. मी दोन दिवस गावी गेलो तर हे आरोप करायला लागले. अरे तुम्ही तर अडीच वर्षांत दोन दिवस मंत्रालयात गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पक्षाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली नव्हती. तुम्ही आम्हाला घरघडी बनवायला चालला. तुम्ही फेसबुक सरकार चालवले. आता फेसबुक शाखा चालवत आहेत. आपले काम फेस टू फेस आहे. आभासी दुनियेत त्यांनाच राहू दे. तुम्ही आपल्या सरकारचे काम, ‘शासन आपल्या दारी’सारखी योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि हे गतिमान सरकार कसे काम करते आहे हे सर्वांना पटवून द्या. जिथे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविडमध्ये माणसे मरत होती तेव्हा तुम्ही पैसे बनवत होता. मुंबईतल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण 15 वर्षांपूर्वी झाले असते तर साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. या सर्वांचा हिशेब तुम्हाला द्यावाच लागेल असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा युती संयुक्तपणे लढेल असेही जाहीर केले.

आजच्या मेळाव्याला येणारे लोक हे कातडे पांघरलेले लांडगे आहेत असे हे म्हणाले होते. पण तुमची कोल्हेकुई जास्त काळ चालत नाही. वाघ जोपर्यंत डरकाळी फोडत नाही तोपर्यंत ती चालते. वाघ जंगलात आला तर हे शेपूट घालून कुठे पळतात हे त्यांनाच कळत नाही. उठाव करायलाही वाघाचं काळीज लागतं, असेही एकनाथ शिंदे यांनी ठासून सांगितले.

मुंबईमधून बाहेर गेलेल्या सर्व मराठी माणसांना गिरणी कामगारांना मुंबईत परत आणणे हे आमचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणारच. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम आम्ही करत आहोत. ते पुढे चालवणार आहोत. उद्यापासून आपण पुढचे दहा दिवस शाखेशाखेत उठावदिन साजरा करा, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content