Homeपब्लिक फिगरसर्व माध्यमांच्या शाळांत...

सर्व माध्यमांच्या शाळांत लवकरच सुरू होणार केजी!

शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते झाले. आमदार मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशाप्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत, असे त्यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असेही केसरकर यांनी जाहीर केले.

जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चार हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

आर/उत्तर विभागातील सखाराम तरे मार्ग महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९५७मध्ये झाली. या इमारतीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या शाळा असून सुमारे ४ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या सतत वाढत असल्याने, तसेच वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने या इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. आधीच्या इमारतीची रचना तळ मजला अधिक २ मजले अशी होती. पुनर्बांधणीनंतर इमारतीची रचना तळमजला अधिक ६ मजले प्रस्तावित करण्यात आली. १४ मार्च २०२० रोजी या इमारतीची पुनर्बांधणी सुरू झाली होती.

दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच

दोन टप्प्यामध्ये या इमारतीची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तळमजला अधिक सहा मजले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय, सभागृह, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत जुन्या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येईल.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content