Homeचिट चॅटडॉ. काकोडकर, ज्येष्ठराज...

डॉ. काकोडकर, ज्येष्ठराज जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबईतल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचारक्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. डॉ. काकोडकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांमधील परीक्षणाची तयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

“इनोव्हेशन स्किल हा शब्द वापरण्यापेक्षा त्याचा मुळ गाभा समजून घेणे अत्यावश्यक आहे. सायंटिफिक टेम्पर जोपासणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. फक्त विज्ञान शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळत नाही, विचारांची पद्धत वैज्ञानिक असणे महत्त्वाचे आहे. समाजाची प्रगती केवळ ज्ञानाने नव्हे तर तर्कशुद्ध विचारांनीच होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी नवकल्पनांची खोली समजून घेण्यावर भर देत, “उत्तर शोधायचे असेल तर विषयाच्या मुळाशी पोहोचणे आवश्यक आहे. इनोव्हेशन म्हणजे कल्पनेला शेवटपर्यंत नेण्याची क्षमता,” असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी विद्यार्थ्यांनी विकसित करावयाच्या प्रमुख कौशल्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “कुतूहल, प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे धाडस, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, निर्मितीशीलता, परीक्षणाची वृत्ती आणि ‘अंत्योदय ते सर्वोदय’ ही विनोबा भावे यांनी सुचविलेली एकात्म दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये जागी झाली पाहिजे.” GEI चे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी संस्थेमार्फत या उपक्रमासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले. उपाध्यक्ष डॉ. सुधीर पानसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीक्षम विचार, सखोल ज्ञान आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “नवीन गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्य ठेवल्यास ती परिपूर्ण होते,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष रविंद्र तामरस, उपकार्यवह महेश केळकर, संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, जनरल एज्युकेशन व दादर परिसरातील विज्ञान शिक्षक तसेच छबिलदास इंग्लिश व मराठी माध्यमातील विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन कार्यवाह विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना इशी व समृद्धी जगताप यांनी केले, तर आभारप्रदर्शन रुपेश गायकवाड यांनी केले.

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content