देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नि त्याचबरोबर राष्ट्रध्वजाच्या बदलाबाबत अनेकांना माहिती आहेच. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्याकाळच्या धुरिणांनी, नेत्यांनी दिलेला लढा हुतात्म्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या कुटुंबियांना भोगावा लागलेला त्रास, छळ हे सर्वांनीच वाचलंय. आज त्याच स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी होत असता जे हयात आहेत, त्यांच्या डोळ्यासमोरून तो चलत चित्रपट जात नसेल. जुन्या आठवणी अनेक लेखाद्वारे समोर उलगडल्या जातात. त्या बलिदानाविषयी, इतिहासाचे विस्मरण होऊ नये म्हणून!
हा लढा लढला जात असताना एक ध्वज असावा, त्याखाली एकजुटीने सर्व यावेत ही भावना ठेऊन त्याचा रंग, त्यातील मानचिन्हे ठरविण्यात आली. वेळोवेळी त्यात बदल होऊन आताचा राष्ट्रध्वज आपण पाहतो आहोत. जगभरात त्या ध्वजासारखा रंग असलेला काही देशांचा ध्वज जरूर आहे. मात्र, जगभरात वर केसरिया, मध्यभागी पांढरा नि त्यात अशोक चक्र, त्याखाली हिरवा असा पट्टा दिसला की हाच तो भारतीय ध्वज म्हणून छाती अभिमानाने फुलून येते.
कोणताही देश असेल त्याच्या नागरिकांत राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक प्रेम आणि आदरभाव असतोच! त्याच्या सन्मानासाठी कायदे, प्रथा, संकेत याबाबत जाणिवेचा अभाव सामान्य लोकांबाबतच नव्हे तर शासकीय संस्था, अभिकरणे, वरिष्ठ अधिकारी, नेते यांमध्येदेखील अनेकदा आढळून आलेला आहे. वेळोवेळी राष्ट्रध्वज लावण्याबाबत शासनाने लागू केलेल्या सूचनांव्यतिरिक्त बोधचिन्ह आणि नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०चा क्र. १२, राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१चा क्र. ६९ याच्या तरतुदींनुसार राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केले जाते.
भारतीय राष्ट्रध्वज संहिता २००२ ही सध्या देशात लागू असून ती सोयीसाठी तीन विभागात विभागण्यात आली आहे. ती त्याच वर्षाच्या २६ जानेवारीपासून लागू करण्यात आली. भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश असून दोनमध्ये जनतेतील सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था आदींनी राष्ट्रध्वज लावण्याची माहिती दिली आहे. तर संहितेच्या तिसऱ्या भागात केंद्र – राज्य सरकारे, त्यांच्या विविध संघटना अभिकरणे (अंगिकृत उपक्रम) यांनी राष्ट्रध्वज लावण्याबाबतची माहिती आहे.
भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या बाबतीत सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सणांसह अन्य दिवशीही भारतीय मानक संस्थेने ठरवून दिल्यानुसार प्रमाणित ध्वज वापरता येतात. तीन रंगांचा, समान रुंदीचा कापडी जोड पट्ट्यांचा ठरवून दिलेल्या रंग क्रमानुसार नि मध्यभागी २४ आऱ्यांचे समान अंतराचे निळे चक्र, सदर राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या, विणलेल्या लोकर, सूत, रेशमी, खादी कापड यापासून बनवलेला असेल. आयताकृती राष्ट्रध्वजाची लांबी उंची (रुंदी) हे प्रमाण ३:२ असेच असेल. त्यासाठी प्रमाणित नऊ आकार मिमीमध्ये दिले आहेत. प्रसंगाच्या महत्त्वानुसार योग्य आकाराचा ध्वज निवडला जावा. मान्यवर – अतिविशेष व्यक्तींच्या विमान, मोटारीवर लावण्याचादेखील विशिष्ट आकार आहे. हे सर्व तपशील bis.org/gov.in इथे पाहता येतील.
भाग दोनमध्ये जन सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था, आदीकडून ध्वजारोहण करणे/राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे या तपशिलाचा समावेश आहे. राष्ट्रध्वजाचा केसरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही. कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी तो खाली आणला जाऊ नये. विशिष्ट वेळी शासन निर्देशानुसार तो अर्ध्यावर खाली आणला जाईल याची काळजी घेणे. खासगी अंत्यसंस्कारासह कोणत्याही कारणासाठी त्याचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. पोशाख – गणवेश, उशा-हातरुमालसारखा किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर छपाई, भरतकाम करता येणार नाही. ध्वजावर कोणतीही अक्षरे किंवा काहीही लिहिता येणार नाहीत. ध्वजाचा कोणतीही वस्तू देण्या-घेण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याची साधन म्हणून वापर करता येणार नाही. मात्र, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय दिनी ध्वज फडकवण्यापूर्वी तो साजरा करण्याचा भाग म्हणून फुलांच्या पाकळ्या त्याच्या घडीच्या आत ठेवता येतील. यासह इतर अनेक बाबीचा यात अंतर्भाव आहे.

राज्यातील सदस्य, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा-सन्मान राखून सर्व प्रसंग-समारंभावेळी राष्ट्रध्वज फडकविता-लावता येईल. तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. फाटलेला/चुरगळलेला ध्वज लावला जाऊ नये. ध्वज अन्य कोणत्याही ध्वजांसोबत एकाचवेळी, एकाच काठीवर लावण्यात फडकवू नये. वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असल्यास वक्त्याच्या तोंड श्रोत्यांकडे असल्यास वक्त्याच्या उजव्या हाताला असावा किंवा पाठीमागे लावायचा असल्यास त्याच्यामागे वरच्या बाजूस तो असावा. राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला, त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही पताका ध्वज लावू नये. ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर, त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले-हार यासह कोणतीही वस्तू ठेऊ नये अथवा बोधचिन्ह लावू नये. तोरण, पताका, गुच्छ किंवा शोभेसाठी म्हणून उपयोग करू नये.
राष्ट्रध्वज कागदापासून तयार केलेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमाप्रसंगी लावता येईल. तथापि, असे कागदी ध्वज कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू-फेकू नयेत. त्याची प्रतिष्ठा राखून खासगीरीत्या विल्हेवाट लावावी. ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असल्यास तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावला जावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही पद्धतीने तो लावू नये किंवा बांधू नये. फाटल्यास अथवा मळल्यामुळे खराब झाल्यास खासगीरीत्या तो किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा पद्धतीने संपूर्णच्या संपूर्ण नष्ट करावा.
ध्वजारोहणावेळी तो झर्रकन वर चढवावा आणि तो उतरवताना मात्र सावकाश नि विधिपूर्वक उतरवावा. बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर ध्वजारोहण ध्वजावतरण करायचे असल्यास या क्रिया त्या सुरांबरोबरच झाल्या पाहिजेत. घटनात्मक उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या उजव्या बाजूस तो नेहमी असेल हे पाहवे. तसेच अशा व्यक्तींच्या निधनप्रसंगी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याचीदेखील विहित पद्धती ध्वजसंहितेत नमूद केलेली आहे. राष्ट्रीय सण, आनंदोत्सवावेळी अशी दुःखद घटना घडल्यास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून आलेल्या आदेशाचे पालन करून राष्ट्रध्वज तातडीने अर्ध्यावर उतरवावा.
प्लॅस्टिकचे ध्वज
गेल्या काही वर्षांत देशभरात प्लॅस्टिक ध्वजाची सर्रास विक्री होताना दिसते. त्यावरून वेळोवेळी केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. दरम्यान, १५ ऑगस्टच्या निमित्ताने काही इ कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यावरून राष्ट्रध्वजाचा मास्क विकला जात असल्याची तक्रार सुराज्य अभियान उपक्रमाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भारतीय राष्ट्रध्वज हा अस्मितेचा विषय असल्याने त्याचा मास्क म्हणून वापर करणे कायद्याने दखलपात्र नि अजामीनपात्र गुन्हा असल्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या या उपक्रमाने लक्ष वेधले आहे.
राष्ट्रध्वज हे सजावटीचे माध्यम नाही. संकेतस्थळावर असे मास्क उपलब्ध आहेत. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश सरकारने गेल्या वर्षी असे मास्क विद्यार्थ्यांना वितरित केले होते असा या संस्थेचा दावा आहे. हे मास्क वापरल्यास त्याला थुंकी लागणे, शिंकणे, तो अस्वच्छ होणे, शेवटी तो कचऱ्यात टाकणे याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. असे करणे हा राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०, कलम २ व ५, राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१चे कलम २ नुसार आणि बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना तातडीने पाठवावी, वर्ष २०११मध्ये याबाबतच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा होणार अपमान रोखावा, या निर्देशानुसार कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. (अशा विक्री करणाऱ्या काहींची नावे त्यांनी दिली आहेत. मात्र, त्यांची जाहिरात होऊ नये म्हणून ती देणे टाळले आहे.)
राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहेच, शिवाय त्याचा योग्य आदर करणे हे भारतीय संविधानाचा आदर करण्यासारखेच आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने राष्ट्रध्वज योग्य तऱ्हेने फडकवला जाईल, अजाणतेपणी काहीजण तो छातीवर उलट लावतात, तो नीट लावला जाईल, तो कुठे फेकला जाणार नाही, तसा दिसल्यास उचलून पायदळी किंवा कचऱ्यात पडणार नाही याची दक्षता घेणे हे आपले संवैधानिक कर्तव्यच मानले पाहिजे. सर्वच झेंडारोहण करणाऱ्या व्यक्ती – संस्था यांनी याविषयीच्या कायद्याची माहिती घेणे नि इतरांना देणे, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घेणे स्वतःसाठी बंधनकारक करून घ्यावे. देशप्रेम नि ध्वजप्रेम या आचरणात आणायच्या गोष्टी आहेत, नाही का? जय हिंद!!

