Homeबॅक पेजटी-२० क्रिकेटच्या जमान्यात...

टी-२० क्रिकेटच्या जमान्यात दुसरा पुजारा तूर्ततरी कठिण!

राहुल द्रवीड याच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतर त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेचा प्रश्न चेतेश्वर पुजाराने आपल्या चिवट, संयमी फलंदाजीने सोडवला. त्यामुळे तेव्हाच्या बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी सुस्कारा टाकला असेल. जणूकाही मग राहुल द्रवीडचाच भक्कम वसा पुजाराने १३ वर्षे पुढे नेला. सौराष्ट्राच्या या लढवय्या फलंदाजाने आपल्या दमदार फलंदाजीची छाप पाडून भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. २०१० साली पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. पहिल्या डावात तो लवकर बाद झाला. पण दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मग प्रत्येक कसोटीत सातत्याने धावांचा रतीब टाकून त्याने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले. त्यावेळी कर्णधार असलेल्या महेंद्र सिंग धोनीने पुजाराला सतत प्रोत्साहन देत त्याचा आत्मविश्वास उंचावला. त्यामुळे काही दिवसांतच पुजाराच्या फलंदाजीत परिपक्वता आली. मग तो भारतीय संघाचा अविभाज्य घटक होऊन गेला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे कधीही सोपं नाही. कारण, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याऱ्या फलंदाजावर नेहमीच एकप्रकारचे दडपण असते. हा क्रमांक नेहमीच फलंदाजाची कसोटी पाहणारा असतो. त्यामुळे या क्रमांकावर खेळताना एक वेगळी कणखर मानसिकता लागते. खेळपट्टीवर घट्ट पाय रोवून उभे राहून संघासाठी किल्ला लढवायला लागतो. पुजाराकडे ती मानसिकता, कणखरता होती. त्यामुळे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ तो या क्रमांकावर तग धरू शकला. त्याची विकेट कशी घ्यायची हा मोठा पेच पुजाराने प्रतिस्पर्धी गोलंदाजासमोर निर्माण केला होता. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असला की इतर भारतीय फलंदाज निर्धास्त असायचे. ते मोकळेपणाने फलंदाजी करायचे. हेच त्याच्या फलंदाजीचे मोठेपण होते. देशातच नव्हे तर, विदेशातदेखील त्याची बॅट चांगली चालली. तंत्रशुद्ध फलंदाजी करत असल्याने विदेशातील वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवरपण त्याची बॅट चांगली स्थिरावली. जास्त फटकेबाजी न करता तो जास्तीतजास्त चेंडू खेळून गोलंदाजांची दमछाक करायचा. मग अशावेळी गोलंदाज आपली दिशा, टप्पा विसरुन जायचा. गोलंदाजाला तो कधीच सहजासहजी आपली विकेट देत नसे. संयमाचा जणूकाही पुतळाच होता तो.. असे पुजाराबाबत म्हटले तर वावगे ठरू नये.

मुंबईकर क्रिकेटपटूंची खड्डूस क्रिकेट खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेटविश्वात ओळख आहे. तोच खड्डूसपणा पुजारात होता. वेगवान गोलंदाजीबरोबर तो फिरकी मारादेखील तेव्हढाच उत्तमप्रकारे खेळायचा. त्याच्या डाईव्ह, कट, पूलच्या फटक्यात एक वेगळी नजाकत बघायला मिळायची. कुठला चेंडू खेळायचा आणि कुठला सोडायचा, याची उत्तम जाण त्याच्याकडे होती. त्यामुळेच तो दीर्घकाळ एक बाजू लावून धरत आरामात फलंदाजी करायचा. प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक आणि प्रत्येक सत्राचा विचार करून पुजारा आपल्या खेळीची उभारणी करायचा. तेज गोलंदाजाचा मार खाल्यावर तो कधी डगमगला नाही. दुखापतीची त्याने कधी तमा बाळगली नाही. आपल्या संघासाठी तो योद्ध्याप्रमाणे लढला. २०१८च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात पुजाराने केलेली अफलातून फलंदाजी भारतीय क्रिकेटप्रेमी कधी विसरणार नाहीत. ऑस्ट्रेलियन तेज माऱ्याचा पुजाराने यशस्वी मुकाबला करुन भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन भूमीत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. त्याने ४ कसोटीत ३ शतकांसह ७४.४२च्या सरासरीने ५२१ धावा फटकावल्या होत्या. त्या मालिकेत तो १२००पेक्षा जास्त चेंडूना सामोरा गेला. मालिकावीर किताबाचा तोच मानकरी ठरला. १०३ कसोटीत पुजाराने ७१९५ धावा केल्या. त्यात १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश होता. त्याने काढलेल्या १९ शतकांपैकी‌ भारताने १३ शतकांच्या वेळी भारताने विजय मिळवला. त्याने केलेल्या साठ टक्के धावा भारत जिंकलेल्या कसोटी सामन्यातील आहेत. विराट ५२, दवीड ३९, तेंडुलकर ३८ यांच्यापेक्षाही टक्केवारी अधिक आहे. एव्हढे यश मिळवूनदेखील त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असायचे. कधी त्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करुन आकांडतांडव केल्याचे आढळले नाही तसेच कधी कुठल्या वादात तो अडकला नाही. खरोखरच तो आताच्या काळात कसोटी क्रिकेटचा सदिच्छादूत होता.

त्याकाळच्या सौराष्ट्रसारख्या काहीशी दुबळया संघातून पुजारा पुढे आला. सुरूवातीला तो वडिलांच्या तालमीत तयार झाला. त्याचे वडील चांगले क्रिकेटप्रशिक्षक होते. त्यांची स्वतःची अकादमी होती. तिथेच सुरूवातीला छोट्या चेतेश्वरकडून संयमी खेळाचे तंत्र त्यांनी घोटून घेतले. सुरूवातीपासून‌ वडिलांनी चेंडू कधीही‌ हवेत भिरकावयाचा नाही. उंचावरून मारायचा नाही. सर्व फटके‌ जमिनीलगतच खेळायचे, हा कानमंत्र दिला. त्याचाच मोठा फायदा पुढे चेतेश्वरला भारताची खिंड लढवताना अनेकदा झाला. त्याकाळी सौराष्ट्राचा संघ फारसा ताकदवान नव्हता. त्यामुळे सातत्याने मोठमोठ्या खेळी करुन पुजारा संघाचा तारहणार ठरत होता. याच मोठ्या खेळ्यांमुळे पुढे पुजारासाठी भारतीय क्रिकेट संघाची दारे उघडली गेली. हळुहळू सौराष्ट्रचा दुबळ्या संघाचा बसलेला शिक्कादेखील पुसून टाकण्यात पुजाराला‌ यश आले. मग त्याच्या नेतृत्त्वाखाली मानाची रणजी करंडक स्पर्धा दोनवेळा जिंकण्यात सौराष्ट्र संघाला यश आले. लहानपणी त्याची आई लवकर गेली. तेव्हा मावशीने त्याचा सांभाळ केला. वडिलांनंतर आपल्या जडणघडणीत मावशीचा मोठा वाटा असल्याचे चेतेश्वर मान्य करतो. काहीसा धार्मिक असलेला पुजारा हरिश्चंद्र महाराज‌ या आपल्या गुरुंनादेखील खूप मानतो. आपल्या या यशात त्यांचेही खूप मोठे योगदान असल्याचे तो मान्य करतो. भारतीय क्रिकेटमधील तो पोस्टरबॉय नव्हता. पण आपल्या लढाऊ बाण्याने भारतीय क्रिकेटवर‌ स्वतःची वेगळी छाप त्याने उमटवली यात शंका नाही. २०२३मध्ये तो भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. नुकत्याच झालेल्या भारत, इंग्लंड कसोटी मालिकेत समालोचकाच्या भूमिकेत त्याच्या चाहत्यांना पुजारा बघायला मिळाला. तेव्हाच पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्याचा इशारा मिळाला होता. तो काही दिवसातच खरा ठरला. भारतीय क्रिकेटने एकापेक्षा एक असे सरस फलंदाज दिले. त्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावाचा समावेश करावाच लागेल. भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानासाठी सलाम करावाच लागेल. आजच्या वाढत्या टी-२० सामन्यांच्या जमान्यात दुसरा चेतेश्वर पुजारा होणे तूर्ततरी कठिण दिसतेय.

Continue reading

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...
Skip to content