Homeटॉप स्टोरीढिसाळ नियोजनामुळे मुंबईतले...

ढिसाळ नियोजनामुळे मुंबईतले लसीकरण ३ दिवस बंद?

राज्याकडे लसीचा सुमारे साडेसात लाख मात्रांचा साठा उपलब्ध असताना व येत्या ३ दिवसांत आणखी २० लाख मात्रा मिळणार असतानाही मुंबई महापालिकेने कोविड–१९ प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्याचे कारण देत उद्यापासून म्हणजेच शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल २०२१पासून रविवार, दिनांक २ मे २०२१पर्यंत, असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने सरकारचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे बोलले जाते.

कधी नाशिक तर कधी पुणे, कधी मुंबई तर कधी अहमदनगर असे रोज कुठे ना कुठे कोविडचे लसीकरण बंदच असते. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लागणाऱ्या लसींचा साठा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राला काल २८ एप्रिलला सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १,६३,६२,४७० लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या (०.२२%) मात्रांसह एकूण १,५६,१२,५१० मात्रांचा वापर करण्यात आला. राज्याकडे, उर्वरित ७,४९,९६० लसींच्या मात्रा, पात्र वयोगटातल्या लोकांना देण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात कोविड प्रतिबंधक लसीच्या २०,४८,८९० मात्रा पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. याचाच अर्थ येत्या तीन दिवसांत राज्यात लसींच्या साधारण २० लाख मात्रा उपलब्ध होणार असताना मुंबई महापालिकेला त्यातली एकही मात्रा मिळू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणी केलेल्यांनाच यापुढे मिळणार लस

याचबरोबर यापुढे मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरील लाभार्थ्यांच्या प्रचंड रांगा लागू नये म्हणून यापुढे फक्त नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच लस दिली जाणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना पुढील आवाहनही करण्यात आले आहे.

१. कोविड प्रतिबंध लस देताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य असेल.

२. लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तरच लस देण्यात येईल.

३. ज्येष्ठ नागरिकांनी व गरजूंनी लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या अशासकीय संस्था, व्यक्ती यांची मदत घ्यावी.

४. लसीकरणासाठी ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करू नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवून लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत.

५. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनीदेखील चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (ऍण्टीबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करू नये.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content