Homeन्यूज अँड व्ह्यूजएकनाथ शिंदेंचा उधळलेला...

एकनाथ शिंदेंचा उधळलेला वारू रोखण्यासाठी देवाभाऊंचे ‘मिशन खरात’?

जगात “एपस्टीन” आणि राज्यात “खरात स्टिंग” अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. कदाचित युद्ध सुरू आहे एपस्टीनवरून लक्ष वळवण्यासाठी. खरात स्टिंगवरून लक्ष उडवण्यासाठी एखादं दुसरे वेगळे प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध लांबले तर “घरगुती गॅसचा तुटवडा” हे प्रकरण खरात प्रकरणावरून लक्ष विचलित होण्यासाठी पुरेसे आहे. तसे घडल्यास ते महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

कॅप्टन अशोक खरात हा गेली वीस-पंचवीस वर्षे भविष्यकथन करतो आहे. जमिनी घेणे, जमिनी विकणे हा व्यवसायही तो करत होता. अलिकडे त्याने जमिनी खरेदी करून माया जमवण्याचाही सपाटा लावलेला होता. रूपाली चाकणकरांचे प्रस्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढले होते आणि पुणे मनपाची २०१७मधली निवडणूक हरल्यानंतर त्यांना शहर महिला अध्यक्ष केले गेले. त्यांचे पती आधी राष्ट्रवादीत कार्यरत होते. नंतर त्या आल्या. त्यांचा पक्षातील प्रवास धुमकेतूसारखा अचानक आणि गतिमान ठरला. बघताबघता त्या राज्य प्रदेश महिला अध्यक्ष आणि नंतर लागोपाठ दोन वेळा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. दिवंगत नेते अजितदादा पवारांची त्यांच्यावर कृपादृष्टी होती हे उघडच होते. आजही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही. खरात माझा गुरु होता असे त्या सांगतात. गुरुप्रेमापोटीच त्या नाशिकला वारंवार जात होत्या. सिन्नर परिसरात मोठी शेती, प्रचंड आलीशान फार्महाऊस खरातने उभे केले होते. तिथेही ताईंचा वावर होता. तिथे त्यांनी पूजावगैरे केल्याचे अनेक फोटो, व्हीडिओ समोर आलेले आहेत. कदाचित ताईंच्या प्रभावाने किंवा बोलावण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुनील तटकरे असे नेते खरातच्या मंदिरात गेले असतील.

खरात

खरातकडे सिन्नरजवळ मिरगाव येथे शेतातच मोठे शिवायल बांधले होते. ईशान्येश्वर देवस्थान असे त्याला तो म्हणत असे. हे देवस्थान शिवनिका संस्थानचे होते व या ट्रस्टवर चाकणकरांचा प्रमुख वरदहस्त होता. शिवानिक ट्रस्टसाठी म्हणून या मंदिर परिसरातील २१ एकर जमिनी बागायतीसाठी धरणातून तीन कोटी नव्वद लाख लीटर पाणी मंजूर झाले होते. ही मंजुरी आताचे पाटबंधारे मंत्री विखे पाटलांनी रद्द केली आहे. पण स्वतः विखेही खरातबरोबर पूजापाठ करतानाचे फोटोही आहेतच. खरा मोठा फोटो व व्हीडिओ एकनाथ शिंदेंचा आहे. खरात हा ज्योतिषी होता. तंत्रमंत्र करणारा होता. तो काळी जादू वगैरे करतच होता. माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते व प्रवक्ते दीपक केसरकर या काळ्या जादूचे चाहते होते का? त्यांच्या विनंतीवरूनच शिंदे तिकडे गेले का? खराताच्या सांगण्यावरूनच गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात रेड्याचा बळी दिला गेला का? त्या रेड्याचे शिंग शासकीय बंगल्यात पुरले गेल्याचे आरोप उबाठा नेत्यांनी केले होते. पण प्रत्यक्षात सरकारकडून वा त्या बंगल्याचे सध्याचे रहिवासी फडणवीसांकडून शिंगाबाबत ना खुलासा केला गेला ना त्याचा इन्कार केला गेला. एकनाथ शिंदेंचा विश्वास अशा गोष्टींवर आहे, हे महाराष्ट्राला माहितच आहे. त्यांच्या दरे गावात विशिष्ट तांत्रिक, मांत्रिक पूजा करण्यासाठी येत-जात असल्याच्याही चर्चा राजकारणात रंगलेल्या आहेतच.

खरात प्रकरणात अभिनेते कुलकर्णींनी विचारलेले प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्यालयात काम करणारा नीरज जाधवला व त्याच्या कुटुंबाला सध्या खास पोलीस संरक्षण आहे. २०१९पासून खरात कॅनडा कार्नर या नाशिकमधील विख्यात परिसरात ऑक्स प्रॉपर्टी नावाचे कार्यालय चालवायचा. तिथेच बसून त्याचा भविष्यकथनाचा कार्यक्रम चालायचा. तिथे काम करणाऱ्या जाधवला त्याच्या महिलांच्या भानगडीचा संशय होता. त्याने खरातच्या नकळत तिथे गुप्त कॅमेरे बसवून चित्रण केले व ते पाहून तो हादरला. खरातला काही काळाने याचा पत्ता लागला. तोवर जाधवने नोकरी सोडून दिली होती. त्याला गाठून खरातने धमकावले. गुप्त चित्रणाचे स्टिंग झाल्याचे लक्षात येताच खरातने पोलिसांत तक्रार केली की, काही लोक त्याला अश्लील फोटो दाखवून पाच कोटींची खंडणी मागत आहेत. दोघांनी पाच कोटींची खंडणी मागितल्याचा त्याचा दावा होता. पुणे व मुंबईतील दिनेश परब आणि राजेंद्र जासूद हे दोघे २०१०पासून त्याच्याकडे येत असत. त्यांनी गुप्तपणाने तिथे येणाऱ्या मोठ्या व्यक्ती व महिलांचे फोटो काढले. त्यातील आक्षेपार्ह चित्रे तंत्रज्ञानाच्या वापराने केली, असा खरातचा दावा होता. शिवाय त्यानेच प्रकरण बाहेर फुटणार हे कळताच शिर्डी येथील एका महिलेकरवी स्वतःविरुद्ध तक्रार दाखल केली. पण त्या महिलेला पोलिसांनी जेव्हा तुमचे खरातचे काय व कसे संबंध होते, असे विचारल्यावर तिने चाकणकरांकडे लेखी तक्रार दिली. त्याचा वापर करून शिर्डी पोलिसांवर चाकणकरांनी दबाव आणला, अशाही तक्रारी झाल्या आहेत. तोही तपास विशेष तपास पथकाच्या प्रमुख सातपुते करत आहेत.

खरात

नाशिक शहरालगत तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक मालमत्ता खरातने घेतल्या आहेत. त्यांची किंमत किमान २००० कोटी रुपये असल्याचे संगितले जाते. यात सनिन्र, निघोज, निमगाव, कोऱ्हाळे, शिर्डी, राहता आदी ठिकाणच्या प्राईम जमिनींचा समावेश आहे. जादूटोण्यासठी कोल्ह्याचे कान, सापांचा वापर होत असल्याबद्दल जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अंनिसच्या तक्रारींचीही चौकशी सुरु आहे. शिर्डीच्या तक्रारदार महिलेचे म्हणणे होते की, नितीन जाधव माझी खरातबरोबरची बनावट चित्रफीत प्रसारित करून बदनामी करतो. तिला तुमचा खरातांचा संबंध सांगा, असे पोलिसांनी विचारताच ती चिडली व पोलास उलटसुलट प्रश्न विचारून मानसिक त्रास देतात अशी तक्रार चाकणकरांकडे तिने केली. तेव्हा राज्य महिला आयोगाचा वापर करून पोलिसांवरच दबाव ताईंनी आणला. शिर्डी पोलिसांनी त्याची माहिती थेट पोलीस महासंचालकांना दिली. मग खरातवर बारीक लक्ष ठेवले गेले. त्यातून पुढे त्याला अटकही झाली. चाकणकरांचा शिवनिका ट्रस्टवर पूर्ण प्रभाव होता. त्याच तो ट्रस्ट चालवायच्या. मी मागील वर्षीच ट्रस्टचा राजीनामा दिल्याचाही दावा त्यांनी आता केला आहे.

आपल्या राज्याने जादूटोणा प्रतिबंधक कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. अनेक लोकोपयोगी कायदे सरकारने केले. पण ते फक्त कागदावर आहेत. नाशकातील अशोक खरातसारखे नीच, नराधम, प्रत्येक गावात, शहरात आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करण्याची एक विकृती या देशातील प्रत्येक गावात कमीअधिक प्रमाणात आहे. ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे. पण तशी हिंमत एकाही राजकीय पक्षाने अथवा त्याच्या नेत्यांनी आतापर्यंत दाखवलेली नाही. सुषमा अंधारे यांनी एक गोष्ट आपल्या मुलाखतीत सांगितली. या राज्यातील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस हे नेते जादूटोणा, बुवाबाजी यांच्या भानगडीत पडत नाहीत. यात एक नाव त्यांनी कदाचित जाणूनबुजून घेतले नसेल. ते म्हणजे राज ठाकरे यांचे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालणारा हा नेता बुवाबाजीला तसा थारा देणारा नाही. चार पक्षाचे हे प्रमुख नेते बुवाबाजी, जादूटोणा यांच्याविरोधात असतील तर या राज्यातील गावागावात पसरलेली ही कीड आतापर्यंत का ठेचली गेली नाही हा खरा प्रश्न आहे.

खरात

सर्वसामान्यांचे एकवेळ ठीक आहे. पण सर्वकाही सुरळीत सुरू असलेल्या नरसिंह राव, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, (हे तर अतिशय सूज्ञ नेते म्हणून ओळखले जातात) राधाकृष्ण विखे पाटील, रूपाली चाकणकर हे लोकांचे नेतृत्त्व करणारे नेते अशा नराधमांच्या नादी कसे लागतात हे न उलगडणारे कोडे आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे सर्वसामान्यांचे देव सत्य साईबाबासारख्या भोंदू बाबांच्या चरणी लीन होताना करोडो लोकांनी पाहिल्यानंतर कोणत्याही बाबा, बुवा, महाराज यांच्यावरील लोकांची श्रद्धा वाढते. असे कोणाचे तरी भक्त झाल्यानंतरच यश मिळते असे वाटू लागते. अशोक खरात प्रकरणाने ही घाण बाहेर आलेली आहे. ती साफ करण्याची संधी आपले मुख्यमंत्री देवाभाऊ यांना मिळाली आहे. ते ही घाण मुळापासून साफ करतील असा विश्वास आहे.

देवाभाऊंची ही साफसफाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर त्याचे स्वागतच आहे. एकनाथ शिंदे या खरातच्या घरात सातत्याने जात होते, ही गोष्ट जगजाहीर आहे. शिंदे नुकतेच दिल्लीवारी करून आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. शिंदे यांची “मी पुन्हा मुख्यमंत्री होईन” ही दुर्दम्य इच्छाशक्ती लपून राहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत का? सर्व निवडणुका झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा फिल्डिंग लावली असल्याची कुणकुण देवाभाऊंना लागली का? देवाभाऊ दिल्लीत आणि शिंदे पुन्हा राज्यात असं काहीतरी दिल्लीत शिजतंय का? तश्या हालचाली सुरू झाल्या आहेत का? अशावेळी शिंदे यांचा उधळणारा वारू वेळीच रोखण्यासाठी देवाभाऊंनी ‘मिशन खरात’ला हिरवा कंदील दिला का? पक्षांतर्गत विरोधकांचा वेळीच काटा काढण्याचे देवाभाऊंचे तंत्र राज्याला माहित आहे. त्या तंत्राचाच हा एक भाग आहे का?

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते...

मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेने ट्रम्पचा इराणवरील हल्ला!

“युद्ध नको, मज बुद्ध हवा” असे म्हणणाऱ्या भारताला युद्धाच्या झळा जाणवत आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांच्या हट्टाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप बळी पडल्यामुळे सुरु झालेले इराणविरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि कट्टर इस्रायल, हे युद्ध आता तिसऱ्या सप्ताहात पोहोचले आहे. त्याचा...

नातवाबरोबर ‘खेळण्या’साठी थोरले पवार राज्यसभेत?

दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च 16ला निवडणुका होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जागाही आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, 5 मार्च...
Skip to content