Homeएनसर्कलराजभवनावरून हात हलवत...

राजभवनावरून हात हलवत परतले मुख्यमंत्री ठाकरेंचे शिष्टमंडळ?

राज्य सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या यादीला मान्यता देऊन त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची विनंती करण्यासाठी राजभवनावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाला एक तासानंतरही कोणत्याही चर्चेशिवाय तसेच ठोस आश्वासनाशिवाय परतावे लागले.

आज संध्याकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. तब्बल एक तास हे तीनही नेते राज्यपालांबरोबर होते. मात्र, यावेळी राज्यपालांनी सरकारच्या प्रतिनिधींकडून पीक, पाऊस, पाण्याची स्थिती, कोरोनाची परिस्थिती, त्याला रोखण्याच्या उपाययोजना, अशी सारी माहिती जाणून घेतली. यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. कोरोनाबाबत बोलताना राज्यपालांनी गर्दी टाळा, असे सांगितल्याची माहिती चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

विधान परिषदेतल्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य सरकारने पाठविली आहे. त्यांच्या नियुक्तीचा अधिकार आपला आहे. हा निर्णय लवकर करावा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली. केरळमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत, करत आहोत याची माहिती राज्यपालांना दिली. मुख्यमंत्री ठाकरे येत्या रविवारी राज्यातल्या डॉक्टरांची एक कॉन्फरन्स घेत आहेत. त्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. गणेशोत्सव, दहीहंडीसारख्या सणांमध्ये गर्दी टाळावी अशा केंद्र सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. याचा अर्थ आम्ही फक्त एका धर्मावरच निर्बंध आणत आहोत, असे सांगत काहीजण यात राजकारण करत आहेत. आमचे सरकार सर्वधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहे. कोणताही सण साजरा करताना जीव महत्त्वाचा आहे, हे सरकारचे उद्दीष्ट आहे, असेही आम्ही राज्यपालांना सांगितले, असे पवार म्हणाले.

चाळीसगाव येथे झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना कोकणातल्या अतिवृष्टीतल्या नुकसानग्रस्तांप्रमाणे मदत देण्याचा सरकारचा इरादा आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इडीच्या चौकशीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, केंद्रीय तपासयंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा संपल्यानंतर परब यांना इडीची नोटीस मिळाल्यामुळे त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. कोणत्याही चौकशीला कधी हजर राहायचे हे संबंधित व्यक्ती आपल्या वकिलांच्या मार्गदर्शनानुसार ठरवत असते. त्यासाठी कोणते कारण द्याचे हेही तीच व्यक्ती ठरवते. त्यामुळे अनिल परब चौकशीला का हजर राहिले नाहीत, हे आपण सांगू शकणार नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले की नाही, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यावर आपण कोणतेही वक्तव्य करणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content