Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे सरकारचे...

उद्धव ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू?

राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेला घरघर लागल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढल्यात जमा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव यांचे सरकार अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेले दोन दिवस मुख्यमंत्री ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीबरोबरच अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पक्षसंघटनेवरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी मेळावे घेऊन एकनाथ शिंदे गटाला गर्भित इशारे दिले. अनेक ठिकाणी आक्रमक शिवसैनिकांनी शिंदे गटातल्या आमदारांच्या घराबाहेर निदर्शने तर कार्यालयांचीही तोडफोड केली. परंतु शिंदे गटातले आमदार बधले नाहीत. शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदे गटातले २०-२२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला.

शिंदे गटाचा पलटवार

एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव गटाच्या या दाव्याचे जोरदार खंडन केले. आपल्या संपर्कात असलेल्या एकाही आमदाराचे नाव जाहीर करा, असे आव्हान त्यांनी दिले. येथील सर्व आमदार आनंदात आहेत. आम्ही येथे कायमचे राहणार नाही, लवकरच आम्ही मुंबईला पोहोचू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी सुहास कांदे, उदय सामंत, शहाजी बापू पाटील आणि दीपक केसरकर, अशा अनेक आमदारांचे व्हिडिओ जारी करून येथे आमदारांवर कोणतीही जबरदस्ती नसल्याचे दाखवून दिले.

केसरकर यांचे राज्यपालांना आवाहन

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज विविध माध्यमांशी संपर्क साधत ठाकरे गटाकडून केल्या जात असलेल्या टीकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. संजय राऊत ज्या भाषेत बोलतात त्यामुळे गुवाहटीतल्या आमदारांच्या भावना अत्यंत तीव्र असून हे जास्त काळ सहन केले जाणार नाही, असा इसारा त्यांनी दिला. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेनेच्या विधिमंडळ गटाचे बहुमत आमच्याकडेच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताच्या चाचणीतून अपमानित होण्यापेक्षा स्वतःहून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतच आम्ही सरकारचा पाठिंबा काढण्याची भूमिका मांडली आहे. राज्यपाल कोश्यारी स्वतःहून याची दखल घेतील, याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपालांनी माहिती मागवली

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून राज्यातल्या आघाडी सरकारडून घेतल्या जात असलेल्या अंधाधूंद निर्णयांची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत राज्यपालांनी दोन दिवसांत काढण्यात आलेल्या १६० जीआरची माहिती सरकारकडून मागवल्याचे कळते.

मुख्यमंत्र्यांनीही माहिती मागवली

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातल्या सर्व मंत्र्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपविला. त्यानंतर आज त्यांनी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्यात एक जूनपासून घेतलेल्या सर्व निर्णयांच्या फायली मागवून घेतल्या. या फायली तपासून त्यात शिंदे यांची चौकशी लावण्यासाठी काही मिळते का, याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.

उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केले भावनिक आवाहन

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिंदे गटातल्या आमदारांबरोबरच शिवसैनिक तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला होता. आज त्यांनी एक पत्र जारी करत शिंदे गटातल्या आमदारांना भावनिक आवाहन केले. आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो.

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या, माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला. आपण मार्ग काढू, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

एकनाथ शिंदेचा पुन्हा पलटवार

ठाकरे यांच्या आवाहनावर पलटवार करताना एकनाथ शिंदेनी ट्विट केले. आपले पुत्र, प्रवक्ते आम्हाला डुकरे, रेडे, कुत्रे, प्रेते, नाल्यातली घाण असे बोलतात आणि आपण असे आवाहन करून समेट करण्याची भाषा करता, याचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी केला.

मंत्रिमंडळाची बैठक आणि राजीनाम्याची अफवा

आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याच्याही वावड्या उठल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करतील, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अनिल परब यांनी यामध्ये औरंगाबादच्या नामांतराची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. अस्लम शेख यांनी यामध्ये कोरोनावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

उद्या पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्य़ा पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. आज राहिलेले काही विषय उद्या चर्चिले जाणार आहेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यताही बोलली जात आहे.

भाजपा आमदार उद्या मुंबईत

दरम्यान, भाजपाने आपल्या आमदारांना बुधवार दुपारपर्यंत मुंबईत बोलावले असून बहुमत चाचणीची वेळ आल्यास आयत्या वेळी धावाधाव नको, म्हणून भाजपा नेत्यांनी हे पाऊल उचलले आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली गाठली. ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानीही त्यांच्या सोबत होते. तेथे त्यांनी केंद्रीय नेते अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील डावपेच कसे असावेत यावर त्यांनी चर्चा केल्याचे कळते. शिंदे गटाबरोबर सरकार स्थापन करताना सत्तेतला वाटा कसा ठेवायचा, यावरही फडणवीस यांनी आपल्या नेत्यांशी चर्चा केल्याचे कळते.

आम्ही नात्यात कटुता आणू दिली नाही – सुप्रिया सुळे

जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content