Homeएनसर्कलइराण-अमेरिकेतला तणाव आणि...

इराण-अमेरिकेतला तणाव आणि इतर अनेक संक्षिप्त…

इराण आणि अमेरिकेतला तणाव वाढला आहे. इराणचा १४ मुद्द्यांचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला. अमेरिकेच्या ९ मुद्द्यांच्या प्रस्तावाला इराणने हे उत्तर दिले होते. आपल्या अटी मान्य झाल्यावरच आण्विक कार्यक्रमावर चर्चा करण्याची तयारी इराणने दाखवली होती. दरम्यान, एडनच्या आखातात हल्लेखोरांनी एका तेलवाहू जहाजाचे अपहरण करून ते सोमालियाच्या दिशेने नेले आहे. गेल्या १० दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

डच राजकन्यांना केले लक्ष्य– डच राजकन्यांना लक्ष्य करणाऱ्या धमक्या कोरलेल्या काही कुऱ्हाडी सापडल्यानंतर पकडल्या गेलेल्या एका संशयिताची उद्या न्यायालयीन सुनावणी होणार आहे.

अमेरिकेने जर्मनीतले सैनिक बोलावले माघारी- अमेरिकेने जर्मनीतून ५,००० जवानांचे सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं, आता युरोपला आपली संरक्षणक्षमता स्वतःच्या जोरावर मजबूत करावी लागणार आहे.

चीनने प्रथमच वापरली ‘ब्लॉकिंग ऑर्डर’- इराणच्या तेल व्यापारावरून अमेरिकेनं लक्ष्य केलेल्या पाच पेट्रोकेमिकल कंपन्यांचे संरक्षण करण्यासाठी चीननं प्रथमच ‘ब्लॉकिंग ऑर्डर’चा वापर केला आहे.

इराण

विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी- पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळपासून होणार आहे. यासाठी लागणारी तयारी अंतिम टप्प्यात आहे, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत एसीच्या स्फोटाने आग- पूर्व दिल्लीतल्या विवेक विहार येथील एका मोठ्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. घरातल्या एसीचा स्फोट झाल्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर आणि पूर्व भारतात धुळीची वादळं- एका नवीन पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीमुळे आजपासून पाच मेदरम्यान उत्तर आणि पूर्व भारतात धुळीची वादळं तसंच मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळं इथल्या लोकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार- बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. यादृष्टीनं त्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आणि अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

इराण

सुनेत्रा पवार किती मताधिक्याने जिंकणार?- महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अक्षय कर्डिले यांचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली आहे. सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत किती मताधिक्याने विजयी होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोपीला फाशी झाल्यानंतरच नेत्यांना एन्ट्री- महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामधल्या नसरापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्याच्या प्रकरणी आरोपी पकडला गेला असला तरी जनतेच्या भावना फार तीव्र आहेत. जोपर्यंत मारेकऱ्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आपल्याला भेटायला येऊ नये, असे आवाहन पीडित मुलीच्या वडिलांनी केले आहे. त्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजचा आपला पुण्याचा दौरा रद्द केला आहे.

मुंबईतल्या काही भागात मंगळवारी पाणी नाही- मुंबईतल्या अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळं मंगळवार, दिनांक ५ मे रोजी सकाळी १० ते बुधवार, दिनांक ६ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत एफ उत्तर, एफ दक्षिण, एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं आहे.

आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर?- चेन्नई सुपर किंग्जने काल रात्री मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून विजय मिळवत, लीगमध्ये दुहेरी विजय पूर्ण केला. त्यामुळं मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधल्या प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.

थॉमस कपमध्ये भारताला कांस्यपदक- बॅडमिंटनमध्ये थॉमस कप स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चायनीज तैपेईविरुद्धच्या विजयानंतर उपांत्य फेरीत फ्रान्सकडून ०-३, असा पराभव झाल्याने भारताचा प्रवास संपुष्टात आला.

इशांक सिंगचा विक्रम- झारखंडचा रहिवासी असलेल्या सात वर्षांच्या इशांक सिंगने २९ किलोमीटर लांबीची पाल्क सामुद्रधुनी पार करून सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे.

अल्काराझ फ्रेंच ओपनमधून बाहेर- गतविजेता कार्लोस अल्काराझने टेनिसच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे. नुकत्याच मिळालेल्या लॉरियस स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर पुरस्कारानंतर, दुखापतीमुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content