Homeटॉप स्टोरीतसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद...

तसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावेच लागले असते!

जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ होण्यासारखे काय, असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांना आपण तीन सवाल विचारले होते, ज्याची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते की नाही? शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्यात रस नाही, असे सांगत तुम्हालाच मुख्यमंत्रीपदी राहण्यास सांगितले होते की नाही? मात्र त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाची, हिंदुत्वाची कास धरा, असे सांगितले होते की नाही?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युतीबद्दल चर्चा केली होती आणि येथे भाजपाचे १२ आमदार निलंबित केल्यामुळे पुढची बोलणी थांबली, ही खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली माहिती खोटी आहे का, असे सवाल करत केसरकर यांनी ठाकरे यांना पुन्हा धारेवर धरले.

अडीच वर्षे फक्त राजकारणच केले. राजकारण करण्यालाही मर्यादा असतात. रोज सकाळी नऊ वाजता एकाने उठायचे आणि पत्रकारांसमोर केंद्र सरकारवर टीका करायची. अशाने राज्य चालवता येत नाही. युवा सेनेचे नेते आता जे शाखा-शाखांमधून फिरत आहेत ते अडीच वर्षे कुठे होते? सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय होते. जनतेला भेटण्यासाठीच कार्यालय आणि सरकारी निवासस्थान दिलेले असते. मग या काळात किती वेळा ते कार्यालयात गेले आणि किती जणांना भेटले, असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

तुम्ही आजारी असताना आम्ही कटकारस्थान केले, या आरोपात काहीही तथ्य नाही. आम्ही कारस्थानच केले नाही. जे काही केले ते सांगून, समजावून केले. कार्यकर्ते कसे गोळा करायचे हा तुमचा प्रश्न आहे. पण यात जनतेला ओढू नका. आज खासदारांच्या घरावर मोर्चा काढला जात आहे. अशाने कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो. पोलिसांना बळाचा वापर करणे भाग पडू शकते. तुम्हाला शांतता नको आहे का? हे सर्व थांबले गेले पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा करणाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जाण्याची गरज आहे. खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी, असा सवालही केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content