भारत राममय होणार आणि जणू राम पहिल्यांदाच अवतरणार आहे, असे वातावरण केले गेले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी आज नागपूरला विधानसभेत केली. त्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात विरोधकांना निष्प्रभ केले. फडणवीस म्हणाले की, जयंतराव, राम नसते तर तुमचे तरी अस्तित्त्व राहिले असते का… राजारामांमुळे तुम्ही अस्तित्त्वात आले. तुम्हाला तरी रामाचे अस्तित्त्व मान्य असले पाहिजे. (जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव राजारामबापू पाटील असे आहे.) त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मला हे मान्यच आहे, आणि सभागृहात एकच हंशा पिकला.
सत्तर मिनिटांच्या भाषणात फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील कायदा-सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर दिले. विदर्भात अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षांना विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला याबद्दल मला खेद वाटतो, असे सांगून फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले हे विदर्भवादी आहेत. पण त्यांनी विदर्भाचे प्रश्न उपस्थित केले नाहीत. उद्धवजी ठाकरे सभागृहात बोलत नसले तरी बाहेर टीव्ही वाहिन्यांशी बोलताना म्हणाले की, विदर्भाचे प्रश्न उपस्थित करू. पण सुनील प्रभूंनीही हे प्रश्न उपस्थित केले नाहीत.
जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सत्ताधारी पक्षानेच विदर्भाचे प्रश्न उपस्थित केल्याने आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात ते घेतले नाहीत, असे सांगून सारवासारव केली. त्यावर, अंतिम आठवडा प्रस्तावाचा विषय कालच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये उपस्थित करायला हवा होता. त्यामुळे इकडे वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे बोलायचे हे धंदे बंद करा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना सुनावले.
आमचा शेतकऱ्यांचा प्रस्ताव होता तरी तुम्ही दिलाच ना. म्हातारी मेल्याचे दुःख आहेच. पण काळही सोकावतो, याचे जास्त दुःख आहे. विदर्भात येऊन विरोधकांनी विदर्भाचे प्रश्न मांडले नाहीत, याचे दुःख आहेच. नानाभाऊ पटोलेंनी अंमली पदार्थाचा विषय काढून थेट गुजरातपर्यंत पोहोचले. पण, मी सांगू इच्छितो की, आमच्या सरकारने २४ हजार लोकांवर ड्रग्जची कारवाई केली. गेल्या वर्षी ही किती झाली होती तर १३,१२५वर. पोलीस पदे रिक्त ही टीका केली, पण आम्ही अभूतपूर्व भरती केली असून २३ हजार पोलिसांची भरती आमच्या सरकारने केली, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, रवींद्र वायकर यांनी १८७६पासून आकृतीबंध आहे आणि लोकसंख्या वाढली आहे हे सांगितले. पण पहिल्यांदा १९७६नंतर या सरकारने नवा आकृतीबंध तयार केला आणि यापुढे २०२३च्या आकृतीबंधानुसारच काम होणार आहे. लोकसंख्येमागे पोलिसांचे निकष, दोन पोलीसठाण्यांमधील अंतरासह सर्व निकष नवे आहेत.
आता आर्थिक गुन्हे हा प्रमुख विभाग झाला आहे. कारण १९७६मध्ये ते कमी होते, असे सांगून फडणवीस म्हणाले की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल कसा वाचायचा, हे किमान जयंत पाटील आणि अनिलबाबू देशमुख या दोघा माजी गृहमंत्र्यांना तरी माहीत असायला हवे. एकूण गुन्हे संख्येपेक्षा प्रति लाख लोकसंख्या गुन्हे असे ते मांडायला हवे तरच खरे चित्र समोर येऊ शकेल. पण, ते राजकीय सोयीचे आकडे घेऊन टीका करताना दिसत आहेत. आधीच्या सरकारने ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेतली नाही आणि कृष्ण प्रकाश यांनी पत्र लिहिले राज्य सरकारला… पण त्यांना परवानगीच दिली नाही. तरी हे विषय इकडे येताहेत, याचेच आश्चर्य वाटते.
हरवलेल्या मुली, अपहरण केलेल्या स्त्रिया हे विषय गेले काही अधिवेशन मांडले जात आहेत आणि जणू हे सरकार आल्यावरच हे प्रकार वाढलेयत. पण मुली परत येण्याचे प्रमाणही चांगले आहे. दरवर्षी ४ हजार मुली ६४ हजार महिला बेपत्ता होतात आणि अगदी कोरोना काळातही म्हणजे २०२० साली ४५१७ मुली, ६३२५२ महिला बेपत्ता झाल्या होत्या. पण, त्यांचे परत येण्याचे प्रमाणही मोठे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याची स्थिती बरी आहे, हे मी सांगेन. गुन्हे आकडेवारी प्रतिलाख लोकसंख्येमागे विचारात घ्यावी, ही माझी माध्यमांनाही विनंती आहे, असे त्यांनी सांगितले.
२०२०मध्ये गुन्हे संख्या ३९४०१७ होती तर ती २२-२३मध्ये ३७४०३८ होती आणि २०२०च्या तुलनेत कमी झालेत गुन्हे. नवी दिल्ली, केरळ, हरयाणा, तेलंगणा आणि मध्य प्रदेश ही गुन्ह्यांमध्ये पहिली पाच राज्ये आहेत जेथे सर्वाधिक गुन्हे आहेत. दिल्ली आणि मुंबई तुलना केली तर मुंबईत रात्री बारा वाजता मुली फिरू शकतात हे मी सांगू शकतो. पण तरीही आकडेवारीवरून राज्याला बदनाम केले जाते तेव्हा मलाही ते मांडावे लागतात. महाराष्ट्र हे अतिशय सुरक्षित असे राज्य आहे. जयंतरावांनी दंगलींचा विषय मांडला. एक असते कम्युनल दंगल आणि एक असते चार वा पाच माणसांच्या वर संख्या असते तेव्हाही दंगलीचा गुन्हा होतो. तुम्ही वाचलेत ते आकडे कम्युनल दंग्यांचे नाहीत. ड्रग्जचे कारखाने आढळून येताहेत मोठ्या प्रमाणावर, अशी टीका केली गेली. पण, ललित पाटीलचा कारखाना कधी सुरू झाला आहे माहीत आहे का, तर तो २०२०ला सुरू झालाय, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.