Homeटॉप स्टोरी‘हल्लाबोल महामोर्चा’वर ‘माफी...

‘हल्लाबोल महामोर्चा’वर ‘माफी मागों’चा उतारा!

राज्यातल्या महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल महामोर्चा’वर आज भारतीय जनता पार्टीने उतारा दिला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान तसेच उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाचा केलेल्या अपमानाविरूद्ध उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन पुकारले आहे.

एका आठवड्यापूर्वी महाविकास आघाडीने या मोर्चाची घोषणा केली होती. त्यानंतर मोर्चाच्या तयारीसाठी आघाडीच्या नेत्यांच्या तीन वेळा बैठकाही झाल्या. यासाठी आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्रत्येकी ५० हजार लोक आणण्याचेही निश्चित करण्यात आले. ठाकरे गटाकडून याकरीता आज मुंबईत लोकांना आवाहन करण्यासाठी गाड्याही फिरविण्यात आल्या. राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने मुंबईबाहेरच्या कार्यकर्त्यांवर भर दिला आहे. आज या मोर्चाला पोलिसांनी काही अटींवर परवानगीही दिली. जे. जे. रूग्णालयाला लागून असलेल्या रिचर्डसन क्रुडास कंपनीकडून टाईम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत हा मोर्चा उद्या सकाळी ११ वाजता निघणार आहे.

शनिवारच्या मोर्चात शिस्त राहिलीच पाहिजे – अजित पवार

येत्या १७ तारखेच्या मोर्चाबाबत आमच्या सर्वच पक्षांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या-ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या-त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो. त्याचपद्धतीने हा मोर्चा काढणार आहोत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मोर्चा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेकडून अफगाणी संकट – आशिष शेलार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न उद्धवजींच्या शिवसेनेकडून जाणीवपूर्वक सुरू आहेत. भारतातील सर्व आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यावेळी शेतकऱ्यावर संकट ओढवते तेव्हा त्याला अस्मानी किंवा सुलतानी संकट म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण करुन उद्धवजींच्या शिवसेनेने अफगाणी संकट निर्माण केले आहे, अशी टीका आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

उद्धवजींची सेना हे का करत आहे, असे प्रश्न पडले आहेत. आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. डॉक्टर चांगली औषधे देतो की कम्पांऊडर?.. असे अज्ञान त्यांनी पाजळले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरुन खोटी माहिती पसरविण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही खोटी माहिती पसरविणे अक्षम्य चूक आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय? असा सवाल त्यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत उद्धवजींच्या सेनेचे इतके अज्ञान? समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर आधारीत असलेल्या संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला, हे तरी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मान्य आहे का? गरिब, दलित, शोषित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला, हे तरी त्यांना मान्य आहे का? स्वातंत्र्यापासून नवीन भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले, हे तरी त्यांना मान्य आहे का? नाहीतर या सर्व गोष्टी उद्धवजींमुळेच झाल्यात, असेही राऊत छापायला मागेपुढे पाहणार नाहीत, अशी टीका केली.

मोर्चा

राऊत यांनी चुकीची माहिती दिल्यानंतरही माफी किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाही. हा अहंकाराचा परमोच्च बिंदू आहे. भाजपाला हे मान्य नाही. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला, त्या काँग्रेससोबत जाऊन उद्धवजींच्या सेनेने आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

याच सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह नाही का? हिंदू देवदेवतांचा अपमान करणे, हिंदू मनाला इजा पोहोचली जाईल, अशी वक्तव्ये समाजमाध्यमांवर आल्यानंतरही उद्धवजी मौन सोडायला तयार नाहीत, मग कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात का? महापुरुषांचा अपमान महाविकास आघाडी आणि विशेषतः या शिवसेनेकडून सुरू आहे. त्यामुळेच या सर्वांविरूद्ध भाजपातर्फे उद्या, १७ डिसेंबरला मुंबईतल्या  सहा लोकसभा क्षेत्रात “माफी मांगो” निदर्शने करण्यात येणार आहेत. उद्धवजी माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा… याकरीता ही निदर्शने असतील, असे शेलार यांनी जाहीर केले.

उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर, उत्तर पश्चिम विभागात आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला, उत्तर पूर्व विभागात निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व, दक्षिण मध्य मुंबईत कैलास मंदिर (लस्सी) समोर, दादर पूर्व, दक्षिण मुंबईत गांधी उद्यान, महाराष्ट्र भाजपा कार्यालयाच्या बाजूला, नरीमन पॉइंट, उत्तर मध्य मुंबईत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुतळा पश्चिम द्रुतगती मार्ग, एव्हियान हॉटेलच्या बाजूला, विलेपार्ले पूर्व येथे ही निदर्शने दिवसभरात वेगवेगळ्या वेळी केली जाणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत महाविकास आघाडीविरूद्ध भाजपा असा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम दिसणार आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content