मुंबई महापालिकेने आजपासून म्हणजेच २४ मेपासून येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच २६ मेपर्यंत लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) येणाऱ्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी कोविशिल्डची दुसरी मात्रा (डोस) घेण्यासाठी पहिला डोस १ मार्च किंवा त्याआधीच झालेला असला पाहिजे. नाहीतर अशा लाभार्थ्यांची लसीकरण केंद्रावर निव्वळ रपेट होईल.
मुंबई महापालिकेनेच हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या ६ ते ८ आठवड्यांऐवजी आता किमान १२ ते १६ आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर ८४ दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.
ही बाब लक्षात घेता, दिनांक १ मार्च २०२१पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील ६० वर्षं व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी दिनांक १ मार्च २०२१ रोजी किंवा त्याआधी कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास, त्यांनाच आज दिनांक २४ मे २०२१ अथवा ८४ दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार..
(अ) सोमवार, दिनांक २४ मे २०२१ ते बुधवार, दिनांक २६ मे २०२१ असे ३ दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे.
यामध्ये, कोविशिल्ड लसीसाठी-
• ६० वर्षं व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी.
• ६० वर्षं व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी.
• आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी.
• ४५ वर्षं व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी.
हे सर्वजण लस घेऊ शकतील.
त्यासोबत, कोव्हॅक्सिन लसीचा विचार करता, सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र (किमान २८ दिवसांचे अंतर) लाभार्थी येऊ शकतील.
(ब) दिनांक २७ मे २०२१ ते दिनांक २९ मे २०२१ असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर १००% लसीकरण कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
(क) रविवार, दिनांक ३० मे २०२१ रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील.
आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल. मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

