Homeपब्लिक फिगरशक्ती कायद्यासाठी केंद्राकडे...

शक्ती कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा!

कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा तसेच महिलेचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच दि. ३० नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या कुर्ला परिसरातील ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्त मनोज पाटील व तपासी अधिकारी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. तसेच भाभा हॉस्पिटलचे डीन डॅा. डोळस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला असून आवश्यक ती कलमे दाखल केली आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या अहवालानुसार इतर कलमांचा विचार होईल व कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

सदर महिलेचा आत्मविश्वास वाढवा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी उपायुक्तांना केली. पोलिसांनी एक चतू:सुत्री कार्यक्रम राबवावा अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

पोलिसांनी त्यांच्या झोनच्या हद्दीत जे गुन्हे घडतात व जे आरोपी जामिनावर सुटले असतील त्यांच्यासंदर्भात कठोर कारवाई व्हावी. ज्या अपहरण झालेल्या मुलींना पोलीस शोधून काढतात व परत त्यांना मुख्य प्रवाहात आणतात त्या मुलींनी परत त्या चक्रात सापडू नये यासाठी या मुलींना सायबर साक्षरताचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ज्या केसेसमध्ये महिलांविरुद्ध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी एक वेगळी नोंदवही तयार करावी. बीट स्तरावरील महिला मोहल्ला दक्षता समितीच्या बैठका घेण्यात याव्यात. ज्या केसेसचे बी समरी रिपोर्ट झालेले आहेत त्या केसेसचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्तांना केल्या.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने  शक्ती कायदा पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात यावा यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content