आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून परतल्यानंतर राज्यात कोरडे हवामान सुरू झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मान्सून माघारी जाताच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. गडचिरोली वगळता महाराष्ट्राला मान्सूनने गुडबाय केले असून देशभरातून उद्या, 16 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार जवळजवळ निश्चित मानली जाते.
यंदा तब्बल साडेचार महिने बरसत राहिलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर गडचिरोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अधिकृतरित्या ही घोषणा केली आहे. आतापर्यंत कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबलीच्या रेषेतील वरच्या संपूर्ण भागातून मान्सून परतला आहे. गडचिरोलीसह संपूर्ण देशभरातून 16 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार घेतली जाईल, अशी शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दरवर्षी साधारणत: 15 ऑक्टोबरच्या दरम्यान संपूर्ण देशातून मान्सून माघार घेतो.

काही प्रदेशात ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधी
दुसरीकडे, दक्षिण द्वीपकल्पीय भारत तसेच दक्षिण आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर पूर्वेकडील आणि ईशान्येकडील वारे वाहत आहेत. या कालावधीत आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधी सुरू होण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात विदर्भात पावसाची शक्यता
ईशान्य मान्सून पावसाळी गतिविधीमुळे दक्षिणेसह देशातील काही भागात पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात उकाडा वाढत असताना तामिळनाडूच्या वरच्या बाजूला दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाली आहेत. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येणार असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 पावसाची शक्यता राहू शकते. हा पाऊस मुख्यत: विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यातील काही भागात राहील. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकेल. अर्थात, हा अतिशय हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस राहणार असल्याने विशेष काळजीचे काही कारण नाही. याशिवाय, नरक चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे.