Homeमुंबई स्पेशलकोस्टल रोडवरील पुलाच्या...

कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट होणार!

विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आणि कोळी बांधव उपस्थित होते.

वरळीजवळून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदरजवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू असून त्या पिलरमधील अंतर वाढविण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांची होती. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोळीबांधवांची बैठकदेखील घेतली होती. त्यामध्ये या मागणीबाबत तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने महिनाभरात अहवाल देत अंतर ६० वरून १२० मीटर करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोळीबांधवांची अंतर वाढविण्याची मागणी मान्य करीत या पिलरमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय जाहिर केला.

कुठल्याही विकास प्रकल्पाला गती देताना स्थानिकांची नाराजी असू नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही लोकहिताच्या निर्णयाला नेहमीच प्राधान्य देत आहोत. त्यानुसार कोळीबांधवांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे. पिलरमधील अंतर वाढवल्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी त्या भागातून सहजपणे ये-जा करू शकतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रगत तंत्रज्ञान, अधिकचे मनुष्यबळ वापरून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कोळीवाड्यांचे सीमांकन, पुनर्विकास आदीबाबत चर्चा झाली. कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरच पूर्ण होईल. कोळीवाड्यांचे हक्क अबाधीत राहतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content