Homeटॉप स्टोरीशिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपा...

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपा लालबुंद!

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, या आशयाची जाहिरात आज राज्याच्या बहुतांशी वर्तमानपत्रात झळकली खरी, पण त्यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरचा आपला कोल्हापूरचा दौरा रद्द केला तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचे बोलले जाते.

आज दिवस उजाडला तो शिवसेनेच्या याच जाहिरातीमुळे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे..
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीत लिहिला आहे.

या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती असल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीवरून उलटसुलट चर्चा चालू असतानाच त्यामध्येच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीतही भाजपा मंत्र्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद दाराआड शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा केली. आजच्या जाहिरातीवरुन शिवसेना-भाजप युतीत असलेल्या वादाबद्दल यामध्ये चर्चा झाल्याचे कळते. त्यावेळी देवेद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला. कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल असे कोणतेही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका, असा सल्ला फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले. त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक मौनाची सर्वत्र चर्चा आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस शासन आपल्या दारी, हा कोल्हापूरला होणाऱ्या कार्यक्रमाला प्रकृतीच्या कारणामुळे जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या कानाच्या पडद्यांना सततच्या विमान प्रवासामुळे त्रास झालेला आहे. वैद्यकीय सल्ल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे केसरकर म्हणाले. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जाहिरातीत काही चूक झालेली असू शकते. ती नंतर सुधारली जाऊ शकते. या सरकारमधले एक मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई म्हणाले की, ही जाहिरात शिवसेनेने दिलीच नाही तर शिवसेनेच्या कोणी हितचिंतकाने दोन्ही पक्षांमध्ये वादंग निर्माण व्हावा या हेतूने प्रसारित केली आहे. ती जाहिरात कोणी प्रसिद्ध केली आहे याची माहिती घेतली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य करताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आमचे सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. सर्वच प्रकल्प वेगवान सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत, आमची जबाबदारी वाढली असून आणखी कामे करू.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मत व्यक्त करताना जनतेची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही पसंती असल्याचे दाखवले आहे आणि सरकारचे यश हे दोन्ही पक्षांच्या समन्वयामुळेच आहे असे ठासून सांगितले. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या जाहिरातीबद्दल नापसंती व्यक्त केली. या जाहिरातीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोणी कमी दाखवण्याचा प्रयत्न करते का हे पाहिले पाहिजे. शिवसेना भाजपाच्या युतीत मिठाचा खडा कोण टाकतोय? वातावरण कोण कलुषित करण्याचा प्रयत्न करतोय हे बघणे आवश्यक आहे. ही जाहिरात पूर्णपणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content