Homeटॉप स्टोरीअखेर गोरेगावच्या मोतीलाल...

अखेर गोरेगावच्या मोतीलाल नगरचा होणार म्हाडाकडून पुनर्विकास!

मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये मोतीलाल नगर १, २ व ३मधील सुमारे ५० हजार हेक्टर जागेवर ३८ हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यात ५३०० गाळ्यांमध्ये सध्या राहत असलेल्या लोकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ येथे सुमारे ५० हेक्टर एवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजीत संख्या ३७०० व झोपड्यांची संख्या अंदाजे १६००, अशी एकत्रित ५३०० इतकी आहे. मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता १०६ गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४च्या विनियम ३० (बी)नुसार ४५० गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्त्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध आहे.

सर्वसामान्यांसाठी ३३ हजार गाळे उपलब्ध होणार

मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे ३३,००० गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वसाहतीचे एकूण क्षेत्र सुमारे ५० हेक्टर क्षेत्रफळ, त्यावरील गाळयांची १०६ प्रती हेक्टर घनता, पुनर्विकास घटकासाठी लागणारे क्षेत्रफळ, या पुनर्विकासासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली २०३४ च्या विनियम ३३ (५)मधील अनुज्ञेयतेपेक्षा निवासी – अनिवासी वापराकरीता अधिकचे बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करावयाचे असल्याने, तसेच हा पुनर्विकास प्रकल्प कंन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सीची नेमणूक करून करावयाचा असल्याने या प्रकल्पास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय झाला.

ही नेमणूक करताना चटईक्षेत्र निर्देशांकाची हिस्सा विभागणी तत्त्वानुसार करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया म्हाडामार्फत राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी निविदा अंतिम करताना पुनर्वसन हिस्सा वगळून उर्वरित शिल्लक चटई क्षेत्रफळापैकी जास्तीतजास्त हिस्सा म्हाडास उपलब्ध करुन देणाऱ्या एजन्सीची निविदा अंतिम करण्यात येईल. मात्र, निविदेतील देकारानुसार म्हाडास मिळणारे बांधिव क्षेत्रामध्ये सवलत देणे अथवा त्याऐवजी अधिमूल्याचा पर्याय स्वीकारला असल्यास अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत नेमकी स्थिती याबाबत निविदा अंतिम करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात येईल.

या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरीता प्रतीगाळा १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळ (BUA) मंजूर करण्यात येईल. मात्र, या १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी विनियम ३३(५)च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या ८३३.८० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या एजन्सीला करावा लागेल. अनिवासी वापराकरीता प्रतीगाळा ९८७ चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल या ९८७ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी वि.नि.व प्रो.नि. २०३४मधील विनियम ३३(५)च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या ५०२.८३ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या संस्थेने करावा.

उच्च न्यायालयाच्या दि.१७.१०.२०१३ रोजीच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्यपरिस्थितीत शक्य नसल्याने एजन्सीची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह म्हाडातर्फे कच्ची पूर्वतयारी म्हणून करण्याकरिता पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठीदेखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content