Homeहेल्थ इज वेल्थमुंबईतल्या कूपर रुग्णालयात...

मुंबईतल्या कूपर रुग्णालयात ‘अँजिओप्लास्टी’चा श्रीगणेशा!

बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना २६ डिसेंबर २०२२पासून सुरुवात झाली. तेथे पहिल्याच दिवशी एकूण तीन रुग्णांवर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली.

विशेष म्हणजे या तीनही अँजिओप्लास्टी महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजनेंतर्गत करण्यात आल्याने सदर गरजू रुग्णांवर खर्चाचा कोणताही भार पडलेला नाही. कूपर रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू झाल्याने पश्चिम उपनगरांमधील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्‍या विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये फेब्रुवारी २०२२मध्‍ये हृदयरोग विभाग सुरू करण्यात आला. हृदयरोग विभाग सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिली अँजिओग्राफी करण्‍यात आली होती. तेव्हापासूनच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियादेखील सुरू करण्याचे प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता रुग्णालय प्रशासनाने हृदयरोग विभाग सुरू केला आहे. रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी हा विभाग सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला तसेच, पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्‍णालयाचे हृदयरोगविभाग प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी ही सुविधा सुरू करण्‍यासाठी महत्त्वाचे सहकार्य पुरवले.

साधारणतः आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का बसल्याने ६० वर्षे वयाचा एक मधुमेहग्रस्‍त रुग्‍ण उपचारार्थ कूपर रुग्‍णालयात दाखल झाला होता. अँजिओग्राफी केल्‍यानंतर सदर रुग्णाच्या हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या वाहिन्‍यांमध्‍ये दोन ठिकाणी अडथळे (ब्‍लॉकेज) आढळून आले. या रुग्‍णाच्या हातातील रक्‍तवाहिनीमधून २ स्‍टेन्‍ट हृदयापर्यंत नेऊन अँजिओप्लास्टी करण्‍यात आली व हृदयाचा रक्‍तपुरवठा यशस्वीपणे पूर्ववत करण्‍यात आला. याव्यतिरिक्त आणखी दोन रुग्णांवर पहिल्या दिवशी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

महापालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्‍णालय या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्‍ध असणार्‍या सुविधांच्‍या धर्तीवर अँजिओप्लास्टीसारखी सुविधा देणारे कूपर रुग्‍णालय आता पश्चिम उपनगरातील पालिकेचे पहिलेच रुग्‍णालय ठरले आहे. हृदयरोगांनी त्रस्‍त असणाऱ्या रुग्‍णांसाठी अँजिओप्लास्टीसारखी सुविधा सुरू केल्‍यामुळे रुग्‍णांना वेळीच उपचार मिळून त्‍याचा लाभ घेता येईल. 

अँजिओप्लास्टी झालेल्या तीनही रुग्णांवरील अँजिओप्लास्टी व स्‍टेन्‍टसाठी येणारा संपूर्ण खर्च शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजनेंतर्गत विनामूल्य करण्‍यात आला आहे. कूपर रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्‍णांना खर्चाचा भार सोसावा लागणार नाही.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content