केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.
समुद्रात पडून वाहून जात असलेल्या या मच्छिमाराचे प्राण नौकेवरील खलाशांनी वाचवले होते, मात्र फुफ्फुसात जास्त पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर मच्छिमार नौकेने वैद्यकीय मदतीसाठी दिलेल्या आपत्कालीन हाकेला भारतीय तटरक्षक दलाने प्रतिसाद दिला आणि कोची येथून आर्यमन आणि C-404 जहाजे, तसेच वैद्यकीय पथकासह हलकी प्रगत हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी रवाना केली.
भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या मच्छिमार नौकेचा शोध घेतला आणि नौकेवरील रुग्णाला हवाईमार्गे कोची येथे नेले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षामा’ या आपल्या ब्रीदवाक्याला अनुसरून जलद आणि तत्परतेने समन्वय साधल्याने समुद्रामध्ये मृत्यूशी झुंजत असलेल्या मच्छिमाराचे प्राण वाचले.