Homeटॉप स्टोरी... आणि देवेंद्र...

… आणि देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसाच तोंडपाठ म्हटली!

किती द्वेष करायचा? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू… आमच्यातला प्रत्येकजण हनुमान चालिसा म्हणेल, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत तोंडपाठ असलेली हनुमान चालिसाच म्हणून दाखवली आणि सारे उपस्थित अवाक् झाले. उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर सत्ताधारी धास्तावले. लावा आमच्यावर राजद्रोह, असे आव्हानही त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दिले.

केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते यावेळी उपस्थित होते.

संवादापेक्षा संघर्ष करू..

ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत. गृहमंत्री आहेत, पण त्यांना अधिकार आहेत का, हा प्रश्न आहे. अशा बैठकीत काय निर्णय होणार? ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास ठरणार तर नाही ना? गेल्या चार-पाच दिवसांमधल्या घटना पाहता या सरकारने संवादासाठी जागाच ठेवलेली नाही. जर सरकारच हिटलरी भूमिकेतून वागत असेल तर संवादापेक्षा संघर्ष करणे आम्ही पसंत करू, असे म्हणत फडणवीस यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलाविलेल्या भोंग्याच्या विषयावरील बैठकीवर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले.

हल्ल्यामुळे आवाज दबणार नाही

आमच्या पोलखोल रथावर हल्ले झाले. आमच्या नेते, कार्यकर्त्यांना मारहाण झाली. हे केवळ मुंबईत नाही तर राज्यात सर्वत्र असे प्रकार सुरू आहेत. असे हल्ले करून कोणी आमचे भ्रष्टाचाराबद्दल बोलणे बंद करू पाहत असेल तर ते शक्य नाही. पोलीसठाण्याला कळविल्यानंतरही किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात आठ खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार जयकुमार गोरे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत आम्ही चर्चा तरी कशावर करणार, असा सवाल त्यांनी केला.

मुंबई मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला

आता मुंबईत जे घडते आहे, ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यावर सुरू आहे. त्यांनी वाटप करून घेतले आहे. मुंबईत मुख्यमंत्री तर राज्यात इतर भागात राष्ट्रवादी गृह खाते चालविते. केरळात, पश्चिम बंगालमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली. तीच स्थिती आज महाराष्ट्रात आहे. पण आम्ही संघर्ष करू. आम्ही गप्प बसणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, असे ते म्हणाले.

नवनीत राणा यांना वॉशरूमही दिले नाही

खा. नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणीसुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधनगृहात जाऊ देण्यात आले नाही. एका महिला खासदारांना नामोहरम करण्यासाठी हजारो कार्यकर्ते गोळा केले जातात. लज्जा आणणारी वागणूक दिली जाते. हेच का हे पुरोगामी महाराष्ट्र, असा सवालही त्यांनी केला. खासदार राणा यांनी याबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमचे शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटायला गेले आहे. आपणही त्यांना पत्र पाठवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

त्या आजीबाईंच्या व्यथांकडे तरी बघा..

या सरकारचा अहंकार तरी किती तो बघा. एका स्त्रीला रोखण्यासाठी हजारो कार्यकर्ते गोळा करायचे. एका ८० वर्षांच्या कार्यकर्त्या आजीला भेटायला त्यांच्या घऱी जायचे. गेलात ना.. मग, त्या आजींनी मांडलेल्या व्यथांवर तरी काम करा.. त्यांचा आक्रोश तरी ऐका. आपण ८० वर्षांच्या झालो, परंतु आपल्याला घर नाही… मुलाला, नातवाला नोकरी नाही.. असे त्या सांगत होत्या. त्यावर हे काहीही बोलले नाहीत, असे फडणवीस म्हणाले. शेकडो एसटी कामगारांनी आत्महत्त्या केल्या. त्यांच्यापैकी एखाद्याच्या घरी भेट द्यायची. एखाद्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट द्यायची. इतकी संवेदना तरी दाखवायला हवी होती, असेही त्यांनी नमूद केले.

भोंग्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे पालन व्हावे

भोंग्याबाबत भाजपाचे धोरण असे आहे की, सरकारने तसेच सर्व समाजाने उच्च, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन व्हावे, असे त्यांनी सांगितले. नवरात्रीत आम्ही रात्रभर जागरण करायचो. गणेशोत्सवात करायचो. अनेक हिंदू सणांमध्ये करायचो. पण न्यायालयाचा निर्णय आला आणि आम्ही रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावणे बंद केले. आम्ही निर्णयाचे पालन करतो तसे प्रत्येक समाजाने करावे अशी आमची भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content