Homeटॉप स्टोरीतेलसंकटावर अमित शाह...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे. देशभरात दिसत असलेल्या गॅसटंचाईत वस्तुस्थितीचे आकलन करून त्यावर कोणती उपाययोजना करायची यावर ही समिती निर्णय करेल. दरम्यान, काल रात्री उशिरा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांच्याशी केलेल्या चर्चेला यश आल्यानंतर इराणने होर्मूझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना जाण्यास परवानगी दिली आहे. यानंतर पुष्पक तसेच परीमल ही दोन भारतीय जहाजे होर्मूज सामुद्रधुनीतून निघाली आहेत. एक तेलवाहू जहाज मुंबई बंदरात पोहोचल्याचे समजते.

आखातातले हे युद्ध आज तेराव्या दिवशी होर्मूझच्या सामुद्रधुनीत सुरू झाले आहे. या सामुद्रधुनीतून जगातल्या अनेक देशांमध्ये कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायूची ये-जा होत असते. या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा असून येथून सध्या फक्त भारतीय तेलवाहू जहाजांनाच इराणकडून परवानगी देण्यात आली आहे. याच सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या एका जहाजावर इराणने हल्ला केला. त्यात हे तेलवाहू जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे कळते. अमेरिकेला प्रत्त्युत्तर देण्याच्या प्रयत्नात इराणने होर्मूझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीत इराणकडून पाण्याखालचे सुरूंग पेरण्यात आल्याचे सांगितले जाते. जी जहाजे येथून जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना या पेरलेल्या सुरूंगाद्वारे उडवण्यात येईल, असा इशारा इराणने दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ही कारवाई फार महागात पडली असून आता त्यांनी इराणमध्ये हल्ला करण्यासारखे काही राहिले नाही, असे सांगत आवराआवर सुरू केल्याचे कळते. होर्मूझच्या सामुद्रधुनीत सुरूंग पेरण्याची इराणची धमकी पोकळ असून असून सर्व देशांनी आपापली जहाजे येथून न्यावीत, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले. येथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला पूर्ण सुरक्षा दिली जाईल, असेही ते म्हणाले. मात्र, ट्रम्प यांच्या या आवाहनाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, इराकच्या बसराजवळ समुद्रात असलेल्या अमेरिकेच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणने हल्ला चढवला. त्यात सुमारे चार लाख टन तेल होते. ते समुद्रात पसरले असून जहाजांना आगी लागल्याचे कळते. थायलंडच्या एका जहाजावरही इराणने हल्ला केला आहे. त्यानंतर थायलंड सरकारने इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून घेतल्याचे समजते.

इराणकडून आखाती देशांतल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे ट्रम्प जेरीस आले आहेत. १७ आखाती देशांतल्या लष्करी तळांवरील सेनिकांना अमेरिकेने सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यास सांगितले आहे. होर्मूझ सामुद्रधुनीच्या जवळ असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकाही आता दूर नेण्यात आल्याचे बोलले जाते. तेलसंकटामुळे पाकिस्तान सरकारने देशात आणिबाणी जाहीर केली असून सरकारी कार्यालये आठवड्यातून चार दिवस ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालविण्याचे आदेश दिले आहेत. शाळांना १५ दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. ज्या सरकारी क्रमचाऱ्यांना गाड्या दिल्या गेल्या आहेत त्यांना गाड्या न वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे ही अवस्था असतानाही काल रात्री अमेरिकेच्या सूचनेनुसार पाकिस्तानने त्यांच्या दोन युद्धनौका होर्मूझ सामुद्रधुनीकडे रवाना केल्याचे समजते.

होर्मूझ

इराणमध्ये सध्याचे सरकार उलथवण्याचे स्वप्न धुळीला मिळाल्यानंतर, तेथील जनतेची सध्याच्याच सरकारला साथ देत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या युद्धातून माघार घेण्याच्या दृष्टीने हालचाली चालू केल्या आहेत. इस्त्रायलकडून इराणच्या तेलसाठ्यांवर जवळजवळ ४० ठिकाणी हल्ले केल्यानंतर इराणमध्ये आता तेलासकट काळा पाऊस पडायला लागला आहे. ही स्थिती पाहता तेथील जनता आपल्या अधिकच विरोधात जाईल, हे ओळखून ट्रम्प यांनी इस्त्रायलला तेलसाठ्यांवर हल्ले न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, इस्त्रायल त्याचे कितपत पालन करेल हे सांगता येत नाही. जगभरात तेलसंकट निर्माण करून इराणने ट्रम्पला वेठीस धरल्यानंतर ते आता नरमले आहेत. इराणचे नवे खलिफा म्हणजेज सर्वेसर्वा अली खामेनेईंचे पुत्र मोजतबा खामेनेई आपल्याला मान्य नाहीत, लवकरच त्यांना आपल्या वडिलांकडे जावे लागेल, असे म्हणणारे ट्रम्प आता मोजतबा यांची निवड झाल्याचे आपल्याला आवडले नाही, असे म्हणू लागले आहेत.

इराणमध्ये हल्ले करण्यासाठी काही उरले नाही, आपण ठरवू तेव्हा युद्ध थांबेल, असे म्हणत ट्रम्प यांनी आवराआवर सुरू केली असली तरी इराणने यासाठी तयारी दर्शवलेली नाही. आम्ही ठरवू तेव्हाच युद्धविराम होईल, असे इराणने म्हटले आहे. यासाठी त्यांनी तीन अटीही अमेरिकेला घातल्या आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई करावी, आमच्या राजवटीला मान्यता द्यावी आणि यापुढे अमेरिका वा इस्त्रायलकडून हल्ले होणार नाहीत याचे ठोस आश्वासन द्यावे, अशा या तीन अटी इराणने घातल्याचे बोलले जाते.

होर्मूझ

Continue reading

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच...

E20मुळे गाड्या खराब होतात हा हेतूपुरस्सर चाललेला अपप्रचार!

अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले. ॲड. अमितकुमार...
Skip to content