Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्स८ ऑगस्टपासून अजितदादा...

८ ऑगस्टपासून अजितदादा घालणार महाराष्ट्र पालथा

महाराष्ट्रातल्या जनमताचा कानोसा घेतानाच महायुतीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीत समन्वय राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा येत्या ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार आहे. जनस्मान यात्रेचा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असेल. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. यामध्ये दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघांत ही यात्रा जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे, असे ते म्हणाले.

अजित

पहिल्या पाच दिवसानंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा-कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघात नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ हे नाव ठेवले आहे. काही योजना अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी दिल्या. त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात हासुद्धा या यात्रेमागचा हेतू आहे. राज्याची आर्थिक घडी आणि स्थिती जराही विस्कटणार नाही याची खबरदारी घेत आर्थिक शिस्तीचे एक नवीन पर्व महाराष्ट्रात, सरकारच्या अर्थकारणात अजित पवार यांनी निर्माण केले. अजितदादांच्या ३५ वर्षांच्या राजकीय जीवनाचा मागोवा घेतला तर जनतेचे हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही तटकरे म्हणाले.

अजित

‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने अजितदादा समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधणार आहेत. ही यात्रा योजनांपुरती सीमित न राहता समाजघटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही दादा जाणून घेणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. या यात्रेत प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमच्या महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहोत. महायुतीमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे ही यामागची भूमिका आहे असेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आदी उपस्थित होते.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content