प्रत्येक नातवाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक म्हणजे ‘एका आजीची गोष्ट’. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली आहे. ते लिहितात- हे पुस्तक कोकणातील रम्य आठवणींचा अल्बम आहे. कोकणची माती ही तशी सुपीक, पण पिके घ्यायला अवघड. इथल्या माणसांचेही तसेच आहे. दिसायला राकट, वागायला कडक पण आतून नारळा-फणसासारखे रसाळ, प्रेमळ. कोकणातल्या अशाच एका जिद्दी आजी-नातवाची ही गोष्ट. दिसायला देखणी, प्रेमळ पण निश्वयाची ठाम, अशी एक आजी आपल्या नातवाला मुंबईतून गावाला घेऊन जाते, स्वतःकडे ठेवून घेते, वाढवते, मोठे करते, त्याच्यावर निश्चयाचे, आपल्या ध्येयाप्रति ठाम राहण्याचे संस्कार करवते आणि नातवाला एक उत्तम माणूस, उमदा पत्रकार बनवते, त्याची ही कहाणी तिच्याच पत्रकार नातवाने कथन केलेली…
लेखक विकास महाडिक लिहितात- ‘एका आजीची गोष्ट’ या माझ्या पहिल्या पुस्तकातून मी माझ्या आजीची, आईच्या आईची गोष्ट सांगितली आहे. सर्वसाधारपणे आजी नातवंडांना गोष्टी सांगतात. म्हणजे पूर्वी सांगायच्या. आता मोबाईल हातात देतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही या मोबाईलचे गारूड आहे. अशा वातावरणात माझ्या ‘आजीची गोष्ट’, ती तुम्ही काय म्हणून वाचायची, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. दुसऱ्यांचे गॉसिप वाचायला आपल्याला आवडते. त्यात काही थ्रिल, दुःख, वेदना असतील तर ते कान देऊन ऐकले जाते आणि मन लावून वाचले जाते. पण गोष्टबिष्ट म्हणजे अतीच झालं आणि ती पण दुसऱ्याच्या आजीची गोष्ट म्हणजे नकोच, असंही काही जणांना वाटेल. वाटणारच. माझंही तेच म्हणणं आहे. प्रत्येकाला एक आजी असते. या जगात ज्याला आई-वडील आहेत, त्यांना आजी असणारच. एखादे अनाथ मूल असले तरी त्यालाही आजी असणार. फक्त तिचा सहवास त्याला लाभला नसेल.
आजी दोन प्रकाराच्या. एक आईची आई आणि एक बाबांची आई. अर्थात हे काही मी वेगळे सांगत नाही. या आज्यांचे नातवंडांवर प्रेम असते. मुलांपेक्षा नातवंडांवर जिवापाड प्रेम करणारी आजी आपण अवतीभोवती पाहतो. तुमची पत्नी तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मुलांची किती काळजी घेते हे बघूनच तुम्हाला हेवा वाटत असेल. आजीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो. अहो ९० टक्के मुलींचे पहिले बाळंतपण आईकडे होते की. काहींचे सासरी होते. आता तर परदेशात केवळ बाळंतपणासाठी जाणारे आजी-आजोबा काही कमी नाहीत. बाळंतपणाच्या काळात सर्वात जवळ कोणी असेल तर ती आजी. कोणतीही. काही जणांना हे सुख मिळत नाही. पण ज्यांना हे सुख मिळत नाही त्यांच्या आजुबाजूला आजी बनून कोणीतरी उभे राहतेच. छोट्याशा रोपाला पाणी, खत, माती घालण्याचे काम या आजी करतात. काही मुलांचे संपूर्ण संगोपन आजी करतात.

काही आजी चांगल्या असतात तर काही खाष्ट. पण आजी असतात. माझा मुद्दा हा आहे की, या आजींच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या शिकवणीबद्दल, त्यांच्या संस्काराबद्दल किती महापुरुषांनी लिहिले? बोटावर मोजण्या इतकेपण नाही. सर्वांनी आपल्या आई-वडिलांबद्दल लिहिले. म्हणूनच ‘श्यामची आई’ आणि ‘आमचा बाप अन् आम्ही’ ही पुस्तके लोकांना आवडली. मग आजींनी काहीच केले नाही का? प्रत्येकाच्या जीवनात आजीचे महत्त्व आहे. तुमच्या जडणघडणीत जितके तुमच्या आईचे महत्त्व आहे, तितकेच किंबहुना आईपेक्षा कांकणभर जास्त योगदान आजीचे आहे. पण ते आपण विसरून जातो किंवा गृहित धरून अनुल्लेखाने दुर्लक्ष करतो. माणूस हा सोयीनुसार लक्षात ठेवणारा प्राणी आहे. आजी केवळ जेवणातील कडीपत्त्यासारखी उरते. जेवताना कडीपत्त्याप्रमाणे आपण तिला आपल्या जीवनातून बाहेर काढतो.
महाभारत, रामायण आपले दोन महाग्रंथ असतील तर मग या दोन ग्रंथात रामाच्या आणि कृष्णाच्या आजीचा उल्लेख का नाही? या दोन ग्रंथांचा भारतीय समाजमनावर खूप प्रभाव आहे, मग त्यात आजीच्या नात्याविषयी काहीच उल्लेख कसा नाही? राम आणि कृष्ण या दोन महापुरुषांना आजी नव्हती का? त्या दोघांनाही आजी होती, पण हे दोन महान ग्रंथ लिहिणाऱ्यांनी आजीचे महत्त्व अधोरेखित केले नाही. अशाचप्रकारे देशात नव्हे परदेशातील महापुरुषांच्या चरित्रातही आजीला अनुल्लेखाने मारले आहे. काही पुस्तकात ओझरता उल्लेख आहे. आजीवर निबंधपण आहेत, पण ते सर्व तोंडी लावण्यापुरते. मी कुणी मोठा माणूस नाही. कदाचित राष्ट्रपती, पंतप्रधान झालो असतो तरीही हे पुस्तक लिहून आजीचे महत्त्व जगाला ओरडून सांगितले असते. मी एक साधा बातमीदार आहे. बातमीच्या नजरेतून जे दिसले, मनाच्या पटलावर जे कोरले गेले, ते लिहून काढले. आजीच्या संस्कारांबरोबरच कोकणातील निसर्ग सौंदर्य, नातीगोती, कहाण्या, सण, यांचे वर्णन केले आहे. त्यात फार काही ग्रेट नाही, पण तुम्हाला गोष्टी सांगणाऱ्या आजीचीपण एक गोष्ट असू शकते, ही या पुस्तकामागची खरी संकल्पना आहे. प्रत्येकाला लिहिता येईल असे नाही. प्रत्येकाला पुस्तक काढता येईल असेही नाही. पण प्रत्येकाकडे आजीची एक गोष्ट असणार. ती लिहून काढा. आपल्या पोराबाळांना सांगा. लिहिता येत नसेल तर दुसऱ्याकडून लिहून घ्या. तेही जमत नसेल तर मोबाईलवर रेकॉर्डिग करून ठेवा. काहीही करा. पण आपल्या आजीचे अनुभव कथन करा. पुढच्या पिढीला ते उपयोगी ठरणारे आहेत. काहीच जमलं नाही तर मला सांगा. मी पुढचे पुस्तक ‘आजींच्या गोष्टी’ लिहू शकतो. पण आजीबद्दल कृतज्ञ राहा. त्यांनी तुमच्यासाठी घेतलेले कष्ट, दिलेले प्रेम याची जाणीव ठेवा. हाच या पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे.
एका आजीची गोष्ट
लेखक: विकास महाडिक
प्रकाशक: संगणक प्रकाशन
मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- १४०
टपालखर्च- ५० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (9404000347)