Homeब्लॅक अँड व्हाईट'ऑपरेशन सिंदूर'वरही निघाले...

‘ऑपरेशन सिंदूर’वरही निघाले पुस्तक!

एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी हल्ला असो की काश्मीरमधला दहशतवाद. त्यावर आधारीत कथा, पुढे पटकथा आणि नंतर चित्रपट अशी मालिका सुरू होतानाही आपण पाहिले आहे. पहलगामध्ये मागच्याच महिन्यात झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. हे ऑपरेशन अजूनही संपलेले नाही. मात्र, यावर पुस्तकही निघाले. महाराष्ट्रातील भंडारा येथील निवासी आणि युरोपातील स्पेनमध्ये स्थायिक झालेले उद्योजक, लेखक व लघुपट निर्माते रोशन भोंडेकर यांनी चार दिवस चाललेल्या भारत आणि पाकिस्तानमधील धुमश्चक्रीवर आधारीत “दी फायर ऑफ सिंदूर: इंडियाज स्ट्राईक अगेन्स्ट टेरर” (The fire of Sindoor: India’s strike Against Terror) हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.

२१० पानाचे पुस्तक अहमदाबादमधील “राईट इंडिया पब्लिशर्स” येत्या महिन्यात प्रकाशित करीत असून त्याचे मूल्य २२० रुपये ठेवण्यात आले आहे. या पुस्तकाची विक्री आणि स्वामित्वधन यातून उभारला जाणारा निधी पूर्णपणे भारतातील अनाथ मुलांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांना दिला जाईल. भोंडेकर आणि सहलेखक निलॉय चत्तराज यांनी लिहिलेल्या या पुस्तकात २२ एप्रिलला काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी घेतलेल्या २६ निष्पाप पर्यटकांचे बळीपासून १० मे रोजी शस्त्रसंधी होईपर्यंत, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि रणांगणावर भारताने घेतलेल्या कणखर भूमिकेचा उहापोह करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या नागरी वस्त्या आणि लष्करी आस्थापना यांना सुरक्षित ठेऊन “जैश ए मोहम्मद”, “लष्कर ए तयिबा”, “हिजबुल मुझाहिद्दीन” आणि इतर दहशतवादी संघंटनांच्या तळांचा भौगोलिक अभ्यास करुन बहवालपूर, मुद्रीकेसह अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय लष्कराने केलेली गौरवशाली कामगिरी आणि या संघर्षाचा दक्षिण आशियातील घडामोडींवर होणारा परिणाम यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

७ मे रोजी अंधाऱ्या रात्री मोहीम सुरु झाल्यानंतर १० मेला शस्त्रसंधी होईपर्यंत चार दिवसांत झालेल्या रणधुमाळीचे या पुस्तकांत विस्तृत वर्णन करण्यात आले असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कित्येक वर्षे चाललेल्या सीमावादाचा इतिहासही उद्धृत करण्यात आला आहे. याचबरोबर “स्काल्प”, “ब्रम्होस”सारख्या क्षेपणास्रांचा लक्षवेधी उपयोग आणि त्यांचे इतर राष्ट्रांत उमटणारे  पडसाद यांचेही विष्लेषण करण्यात आले आहे.

दृष्टीकोन

“ऑपरेशन सिंदूर”बाबत भरगच्च साहित्य उपलब्ध असतानाच पुस्तकांच्या बाजारात प्रवेश करणाऱ्या “दी फायर ऑफ सिंदूर: इंडियाज स्ट्राईक अगेन्स्ट टेरर” या पुस्तकाची धाटणी वेगळी आहे. हे पुस्तक भारतीय संरक्षण विभागाचे नियोजन, पाकिस्तानची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांची भूमिका, दहशतवादविरोधी कृती आणि इतर देशांची सावध भूमिका यांचे फिरते इतिवृत्त आहे. शिवाय भारताचा पाकिस्तानविरुध्द निश्चयी लढा यावरही पुस्तकाचा कटाक्ष आहे.

थोडेसे लेखकांबाबत-

भारतीय-स्पॅनिश उद्योजक आणि लघुपट निर्माते रोशन भोंडेकर यांनी पारितोषिक विजेत्या “दि शूज” (२०१९) आणि “होसला और रास्ते” (२०१८), अशा लघुपटांची निर्मिती यापूर्वी केली आहे. शिवाय “लव: दि की टू ऑप्टिमिज्म” (Love: The Key to Optimism) (२०१५) या पुस्तकाबरोबरच इतरही पुस्तके लिहिली आहेत. सहलेखक निलॉय चत्तराज यांना इलेक्ट्रॉनिक युद्ध संप्रेषण शिकविण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी स्टीफन हॉकिन्स यांची उत्सर्गाशी संबंधित “ब्लेक होल थिअरी” आणि इतर विज्ञानविषयक लेखांचे समालोचन केले आहे.

1 COMMENT

  1. रोशन भोंडेकर यांचे पुस्तक मला निश्र्चितच वाचायला आवडेल- सुनील विश्र्वनाथ वागळे

Comments are closed.

Continue reading

डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले सर्पदंश झालेल्या गर्भवतीचे प्राण

नाशिक योथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या गर्भातील बाळाला अथक प्रयत्नांनी नुकतेच वाचविले. इगतपुरीतील एका 30 वर्षीय गर्भवती महिलेला सर्पदंश झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले...

भाड्यापोटी विकासकांची म्हाडाकडे १३५ कोटींची थकबाकी!

मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले असल्यामुळे भाडेकरूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सेवाशुल्कवाढीस बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने तीव्र विरोध करीत आंदोलनाचा ईशारा...

व्हिजन डॉक्युमेंटच्या नावावर होणार मंत्र्यांचे परदेश दौरे! मच्छिमार बोंबलणार!!

राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना त्यामध्ये वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा समावेश करावा असे मत्स्यव्यवसाय विभागाने ठरविले आहे. मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमार प्रस्तावित व्हिजन डॉक्युमेंटबाबत साशंक आहेत. मुख्य म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट तयार...
Skip to content