Details
अडवाणी-जोशींचे करायचे काय?
26-Jan-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे करायचे काय, हा भाजप नेतृत्त्वापुढील एक मोठा प्रश्न आहे. 2014 साली अडवाणी गुजरातच्या गांधीनगरमधून तर जोशी उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. जोशी यांनी वाराणसी हा आपला मतदारसंघ नरेंद्र मोदी यांच्यासाठी सोडला होता. देशात नरेंद्र मोदींची त्यावेळी लाट आली. भारताच्या इतिहासात प्रथमच भाजप स्वबळावर सत्तेवर आला. त्यावेळी अडवाणी-जोशी या दोन ज्येष्ठ नेत्यांना चांगली पदे मिळतील अशी अपेक्षा होती. पण उलट्या काळजाच्या मोदींनी या दोन्ही नेत्यांना अडगळीत ढकलले. एकेकाळी पंतप्रधान होऊ इच्छिणारे अडवाणी लोकसभेचे अध्यक्ष होऊ इच्छित होते. पण त्यांना बाजूला सारून सुमित्रा महाजन यांची त्याजागी निवड करण्यात आली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळीही अडवाणींना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आले.
दरम्यान, एक असा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला जो पाहून असंख्य लोकांना अडवाणींची कीव आली. व्यासपीठावरून मोदी निघाले आहेत, अडवाणी दीनवाणा चेहरा करून त्यांना हात जोडून नमस्कार करीत आहेत आणि मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपल्याच मस्तीत चालले आहेत असा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओची छायाचित्रेदेखील व्हायरल झाली. त्यावर असंख्य लोकांनी भाष्य केले. त्या एका व्हिडिओवरून अडवाणींचे भाजपमधील स्थान जगाला कळले. अडवाणी-जोशी यांच्याप्रमाणेच शांताकुमार आणि बी. सी. खंडुरी या दोन ज्येष्ठ नेत्यांनादेखील मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले. स्मृती इराणी यांच्यासारख्या बारावी पास नटीला महत्त्वाची खाती देऊन मंत्रीपदी बसविण्यात आले. पण आयुष्यभर भाजपसाठी खपलेल्या ज्येष्ठांना मात्र राजकीयदृष्ट्या खपविण्यात आले. नाही म्हणायला अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे एक `मार्गदर्शक मंडळ′ बनविण्यात आले. त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली. पण त्यानंतर चार वर्षांत या मंडळाची एकही बैठक झाली नाही. दरम्यान अटलजींचे निधन झाले. यावरून या मार्गदर्शक मंडळाला मोदी मंत्रिमंडळाने किती महत्त्व दिले हे दिसून येते.
75 वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रीपद द्यायचे नाही हे भाजपचे धोरण आहे. अर्थात अशा ज्येष्ठ नेत्यांना तिकिट देण्यास मात्र पक्षाची मनाई नाही. या पार्श्वभूमीवर 91 वर्षीय लालकृष्ण आडवाणी आणि 84 वर्षीय मुरली मनोहर जोशी यांचे करायचे काय हा प्रश्न मोदी यांच्या प्रभावाखालील भाजपला पडल्यास नवल नाही. त्यात संसदीय अंदाज समितीचे चेअरमन म्हणून जोशी यांनी गेल्या काही महिन्यात केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात अनेक प्रश्न विचारले आहेत. साहजिकच त्यामुळे पक्षाची अवस्था कठीण झाली आहे. सद्यस्थितीत तर भाजपसमोर प्रियांका गांधींच्या रूपात नवी डोकेदुखी उभी राहीली आहे. उत्तर प्रदेशातील उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला प्रियांका आकर्षित करू शकतात हे उघड आहे. अशा परिस्थितीत मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा यांना अडगळीत टाकणे भाजपला परवडणारे नाही. किंबहुना, त्यामुळे ब्राह्मण समाजाचा भाजपवरील राग तीव्र होण्याचा संभव आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या बाबतीत ‘धरलं तर चावतंय आणि सोडलंय तर पळतंय’, अशी भाजपची केविलवाणी अवस्था झाली आहे. जोशी सरकारविरोधात उघडपणे बोलत असले तरी अडवाणीजी मात्र अजूनही शांत आहेत. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता आहे. ज्या दिवशी ती भंग पावेल त्यादिवशी मोदींच्या अडचणीत प्रचंड वाढ झालेली असेल. धूर्त राजकारणी असलेले अडवाणीजी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे मोदींची शिकार आपल्या टप्प्यात येण्याची वाट पाहत आहेत हे नक्की!”

