Details
हवा बिघडली..
10-Apr-2019
| 1
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
सध्या वातावरण असे आहे की हवा बिघडली म्हटल्यावर कुठल्या राजकीय पक्षाची हवा बिघडली, कोणाची हवा आहे, असे प्रश्न वाऱ्यावर तरंगत जिकडेतिकडे पसरतात. निवडणुकीचीच हवा आहे म्हटल्यावर हे स्वाभाविकच आहे. पण खरी हवा बिघडलीय ती मुंबईची. गेल्या वर्षात २७९ दिवसांपैकी एकदाही मुंबईच्या हवेचा दर्जा अत्यंत चांगला असा नोंदवला गेला नाही, अशी धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने जाहीर केली आहे. याला हवाला आहे तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीचा. याच तपशीलाच्या आधारे प्रजा फाऊंडेशनने हा निष्कर्ष काढला आहे. धक्कादायक म्हणजे मंडळाच्या संकेतस्थळावर २०१८मधील ८६ दिवस हवेचा दर्जा काय होता याची माहितीच उपलब्ध नाही. संस्थेचे मिलिंद म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये २७९ दिवस मुंबईतील हवा खूप चांगली नव्हती. तुलनेत २०१७ मध्ये ४५ आणि २०१६मध्ये ६५ दिवस मुंबईतील हवा चांगली होती, असं दिसून आलं आहे. तसेच २०१८मध्ये मुंबईतील हवा १३८ दिवस समाधानकारक होती. त्या तुलनेत २०१७मध्ये १३४ तर २०१६ मध्ये १७७ दिवस मुंबईतील हवा समाधानकारक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच २०१८मध्ये मुंबईतील हवा १२५ दिवस मध्यम स्वरूपाची होती. २०१७ मध्ये १४४ दिवस आणि २०१६मध्ये १०७ दिवस मुंबईची हवा मध्यम स्वरूपाची होती, असा निष्कर्षही या अहवालातून काढण्यात आला आहे.
याआधी दिवाळीनंतर मुंबई, ठाण्यातील हवेत प्रदूषक घटक फटाक्यांमुळे वाढले असे निरीक्षण नोंदवले गेले होते. ठाण्यात काही भागांत सुरू असलेल्या बांधकामांमुळे, रस्त्यांच्या कामांमुळे हवेत धूलीकण मर्यादित प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढले आहेत, असेही निदर्शनास आले होते. आता मुंबईची हवा बिघडल्याची बातमी उरलासुरला श्वासही घुसमटवणारी आहे. प्रजाचा अहवाल मंगळवारी आला आणि सोमवारी मुंबईची हवा चांगली होती, असे निरीक्षण ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीनुसार समोर आले होते. हवेतील प्रदूषक घटक चेंबूरसारख्या ठिकाणीही कमी होते. त्याचवेळी नवी मुंबईत मात्र हवेचा दर्जा मध्यम होता. सफर प्रणाली त्या दिवसापुरता अंदाज देते आणि प्रजाच्या अहवालात गेल्या वर्षभरातील निरीक्षणांवरून हवेच्या दर्जाविषयी निष्कर्ष काढण्यात आला आहे. याच ‘सफर’ संकेतस्थळाने गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद घेतली होती. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप अशी क्रमवारी होती. पण एकूणच मुंबई काय ठाणे काय बहुतेक महानगरांमधील हवा बिघडत चालली आहे.
ग्रामीण-नागरी संमिश्र वस्तीमधीलही हवा फारशी चांगली नाही. खेदाची गोष्ट अशी की आपल्याला आता या हवेची सवय झाली आहे. आजारी पडण्याचीही सवय झाली आहे. नामवंत कवी अशोक नायगावकर म्हणतात तसे, चार दिवस निसर्गसहल करून आल्यावर आजारी पडायला झालं, मग डॉक्टर म्हणाले आता तुम्ही चार दिवस गटाराशेजारून फिरा, ती हवा श्वासांत भरून घ्या लगेच बरे व्हाल.., अशी आपली सगळ्यांचीच दयनीय अवस्था होऊ लागली आहे. उन्हाळा आताच तीव्र झाला आहे. हवेतील या टोकाच्या बदलांमुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत आहे. उष्माघात वाढला आहे, अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनाकलनीय ताप येतोय. सर्व वयोगटांतील व्यक्तींना या आजारांची लागण होत आहे. हवेतील सूक्ष्म धुलिकणांचे (पीएम- पर्टिक्युलेट मॅटर) प्रमाण ३०० मायक्रोग्रॅम प्रति घनफुटाहून अधिक झाले तर हवा बिघडली हे नक्की. हेच प्रमाण १०० पेक्षा कमी असल्यास हवा शुद्ध मानली जाते. ठाणे, मुंबई आणि परिसरात हवेची तपासणी केली तर यातील बहुतांश प्रदूषक घटक हे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, कारखान्यातील धुरांडी तसेच बांधकामांमुळे हवेत मिसळणाऱ्या धुलिकणांमुळे वाढतात हे लक्षात येते. या प्रदूषित घटकांमुळे दमा, श्वसनविकाराच्या रुग्णांचा त्रास सर्वच ऋतुंमध्ये वाढतो. हवा फार दमट झाली तर सामान्यांनाही श्वसनविकार होण्याची शक्यता वाढते. हे सूक्ष्म धूलिकण शरीरात गेल्यास फुप्फुसाला सूज येण्यापासून कर्करोगापर्यंत आजार होऊ शकतात. हे लक्षात घेतले तर हवेची बिघडलेली पातळी म्हणजे आपल्या सृष्टीसाठी आणि आपल्यासाठीही धोक्याची घंटाच आहे.”

