Details
“अच्छे दिन द्या, जनता डोक्यावर घेईल!”
25-May-2019
| 0
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
आयेगा तो मोदीही! मोदीजी, पुनश्च सरकार स्थापनेबद्दल शुभेच्छा! अगदी विरोधी, विखारी प्रचार करीत देशभरातील नेत्यांनी एकट्या मोदींवर तुटून पडत हल्ला चढविला असता सामान्य माणूस मात्र म्हणत होता तेच वाक्य, पण त्याला भक्त म्हणून इतर हिणवत राहिले. त्यात केवळ भक्ती नव्हती तर लोकहिताची भावलेली कामं, शत्रूराष्ट्राला जरब बसविण्याची हिम्मत असे काही मुद्दे होते. काही बाबतीत नाराजी होती ती लोक बोलूनही दाखवत होते. पण हा माणूस करेल आपल्यासाठी काहीतरी हा आशावाद.
आता वेळ आलीय ती जनतेला चांगलं काही देण्याची. रस्ते, पूल, नगरविकास हे होतच राहील. दैनंदिन जीवनात प्रभाव टाकतील अशा बाबींची पूर्तता होऊ द्या. हाताला काम, रोजगार, पुरेसा पैसा, स्मारकं उभारण्यापेक्षा चांगली आरोग्यसुविधा नि सुरक्षितता, मग ती सीमेवरील असेल किंवा देशांतर्गत वीज, पाणी या मूलभूत गरजा भागवाव्यात. सरकारकडे एवढंच मागणं असतं. जनधन योजना, उज्ज्वला गॅस, शालेय शिष्यवृत्ती, असं काही काम झालंय. पण अधिक काही करायची गरज आहे. ऑनलाइनमुळे काही प्रमाणात भ्रष्टाचाराच्या मुसक्या आवळल्यात, त्यात परिणामकारकता यावी ती वरच्या पातळीवरसुद्धा!
कालच्या मतगणनेनंतर विरोधी पक्ष सुन्न पडल्यासारखाच झालाय. शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, सत्कार यात गुरफटून न पडता मागच्याप्रमाणे तुम्ही कामावर झपाटलेपणाने स्वार व्हाल. लोकशाही ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. पुन्हा कुठल्यातरी निवडणुका येतील. नोटबंदी, जीएसटी यामुळे निर्माण झालेले बेरोजगारीसारखे प्रश्न, निसर्गाचा लहरीपणा.. त्याने हवालदिल झालेला शेतकरी कुठेतरी तातडीने दिलाशाची वाट बघत आहेत. त्याकरिता गेल्या काळात अर्थनीतीत झालेल्या धोरणातील चुका सुधारून मलमपट्टी नव्हे तर कायमची तोड कशी निघेल हे अत्यावश्यक काम आहे. यातील बऱ्याच गोष्टी जागतिक तेल बाजारावर अवलंबून असतात हे सामान्य लोकांना नीट कळलं नाहीये.
त्यावर निर्णय घेऊन याच पावसाळ्यात शेतकरी नि त्याच शेत जोमदार होईल हे पाहा. कर्जमाफीसारखा दिलासा आता थेट खात्यावर देऊ शकता जनधन मुळे! अर्थात यासाठी खजिना पुरेशा प्रमाणात मोकळा सोडावा लागेल. जगात कर्ज मागण्याची पाळी गेल्या काळात आली नाही याचा अभिमान आहे हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून योग्य निर्णय घ्यावा, भांडवली बाजारावर आधारित निर्णय घेऊ नका लोकहितही पाहा, असं लोकांना वाटतं.
आपापल्या परीने सर्व बोलत असतात. आर्थिक व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असला तरी सामान्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या दिसतील. कारण एकच अच्छे दिनची आस! जरी नितीनभाऊ गडकरी म्हणाले असले की हा एक चुनावी जुमला होता तरी. तुम्ही पंधरा लाख देऊ बोलला नव्हता. तरी काँग्रेसने दरवर्षी ७२ हजार देण्याची घोषणा केली. तुम्ही काळ्या पैशाला हात घालू म्हणाला ते काम दिसत नाही. लोकांना हॅट घालू नका, आधी तेच झालं म्हणून जनता तुमच्याकडे आली. शेतमालाला वाजवी दाम देताना ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, मागणी पुरवठा सुधारून ताळमेळ बसवावा ही अपेक्षा आहेच.
आशिया खंडात हिंदुस्थान महासत्ता व्हावी म्हणून काही धोरण घेऊन तुम्ही जगभ्रमंती केलीत. त्यावर टीकाही झाली. त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही ठाम राहिलात. त्याचे काही फायदेही देशाला झाले. ते लोकांनी पाहिले. शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत आपण कसे तुल्यबळ राहू हे तुम्ही काटकसरीने दाखवून दिले. देशाचा विकास दर वाढून औद्योगिक उत्पादन वाढ, निर्यात वाढ, आयात कमी, चिनी मालाचा कमीतकमी वापर, यावर जोर द्यावा लागेल. जनतेवर या बाबी ठसवाव्या लागतील.
उद्योग व्यवसायाला सवलती देताना शेती हा घटक दुर्लक्षित होऊन चालणार नाही. हा विकासाचा कणा असल्याने त्याला उभारी देण्याचे बघाल ही अपेक्षा. छोट्या मध्यम उद्योगाने रोजगारात वाढ होते हे आपण गुजरातमधील असल्याने चांगलेच जाणता. चिनी मालाच्या आक्रमणाने स्थानिक उद्योग मोडीत निघत आहेत. सरकारी नोकरीत पदं भरली जात नाहीत, लोक सुविधेअभावी वैतागले आहेत. दलाली राज फोफावतेय. रस्ते, पूल, वीज या पायाभूत सुविधा रोजगार वाढवतील. यात गुंतवणूक वाढवताना टोलधाडीला किमान आळा बसेल असे पाहा.
अर्थगणित देशाला नि लोकांना विकासाकडे घेऊन जाईल हे सरकारला माहीत आहे. इतरांनी सांगायची गरज नाही. पेट्रोल, डिझेल, कांदा अशा संवेदनशील विषयांनी कोणत्याही सरकारचा नेहमी वांधा झाला आहे. दशभरात जातीयवाद्यांना आरक्षण नि इतर बाबीवर राजकारण करायला मिळणार नाही यावर लक्ष दिले पाहिजे. लोकांना त्यातून स्थैर्य मिळून शांतता लाभेल. सीमेवरचा भाग सोडला तर देशात आपल्या सरकारने शांतता दिलीय. गुप्त माहिती मिळूनही त्यावर अंमलबजावणी न करता ढिम्म राहणाऱ्या यंत्रणेला चाप लागल्यास लोकांना आनंदच मिळेल. तुम्ही आलात म्हणून शेजारी घाबरून गप्प बसत नाही हेही तितकेच खरे! करायची कामं तर खूप आहेत नि लोकांच्या अपेक्षादेखील! बहुमत आहे म्हणून काहीही करणार नाही हे जाणून आहेत सगळे. तातडीने दिलासा मिळेल अशी आशा सर्वाना वाटते. देश पाठीशी उभा असल्याची प्रचिती निवडणुकीपूर्वी घेतली आहेच. पुनश्च शुभेच्छा! जय हिंद!”

