HomeArchiveमातोश्री मतांचा जोगवा...

मातोश्री मतांचा जोगवा मागणार!

Details
मातोश्री मतांचा जोगवा मागणार!

    20-Jun-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा तिसावा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात संपन्न झाला. त्यानिमित्ताने प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात त्यांनी उतरावे असा आग्रह आदित्य ठाकरेंच्या अनुयायांनी धरला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तेव्हाही आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. नंतर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांची नावेही चर्चेत होती. उपमुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेत संघर्ष आणि असंतोष निर्माण होण्याची चिन्हे दिसताच नको ते औटघटकेचे उपमुख्यमंत्रीपद असा पवित्रा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आणि ते अयोध्येस रवाना झाले.

आदित्य ठाकरे आगामी विधानसभा लढविणार. त्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी झाली आहे. दादर, शिवडी आणि वडाळा या तीन मतदारसंघात शिवसेना प्रभावी आहे. हक्काचा मराठी मतदार असल्याने आदित्य यांना विरोधकांचे आव्हान नसणार, हे ओघाने आलेच. मात्र निवडणुकीच्या थेट मैदानात आदित्य ठाकरे जर उतरले तर मातोश्रीचा शिरस्ता प्रथमच मोडला जाणार आहे. निवडणूक लढवायची नाही, सत्तेचे पद भोगायचे नाही, असा संकल्प शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता.

मनात आणले तर शिवसेना भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब होऊ शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. सर्वोच्च सत्तेला ते भुलले नाहीत. सत्तेची पदे त्यांनी चेहरा नसलेल्या सर्व समाजातील तळागळातील माणसांना दिली. बहुजन, मागास समाजाला बाळासाहेबांनी सत्तेच्या राजकारणात, प्रवाहात आणले. त्यांनी जातीभेदाच्या भिंती तोडून मराठी माणूस आणि त्याची अस्मिता निर्माण केली. कार्यकर्त्यांना मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक बनविले. सत्तेपासून अलिप्त राहून त्यांनी खरीखुरी सत्ता गाजविली. बाळासाहेबांनी त्यांच्या सरकारवर कायम नियंत्रण ठेवले. शिवसेना बलाढय़ आणि आक्रमक अंकुश ठेवला. मीडियाने या नियंत्रणाला रिमोट कंट्रोलची उपमा दिली. त्या रिमोटचा ठाकरेंनी सन्मानच केला. काँग्रेस पक्षात हायकमांड चालतो ना. मग माझा रिमोट का नको, असा टोला ते पत्रकारांना लगावत असत. बाळासाहेब हे किंगमेकर ठरले. अखेपर्यंत त्यांनी सत्तेला स्वत:पासून दूर ठेवले. त्याच बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य आज प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी होण्यास आतूर झाले आहेत. ते प्रत्यक्ष नाही-नाही म्हणत असले, तरी समर्थकांच्या माध्यमातून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहेच.

निवडणुकीच्या आणि सत्तेच्या सक्रिय राजकारणात उतरायचे म्हणजे प्रत्यक्ष उमेदवार बनून आदित्य ठाकरेंना विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना लोकांना सामोरे जावे लागेल, जनतेत फिरावे लागेल हे ओघाने आलेच. महत्त्वाचे म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनाही आदित्यसासाठी मतदारांकडे मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. आजवर असा मतांचा जोगवा मागण्याचा प्रसंग ‘मातोश्री’वर कधी आलेला नाही. बाळासाहेबांनी केलेला निर्धार त्यांच्यानंतर आता मोडीत निघणार. त्याबद्दलच आता बाळासाहेबांच्या निष्ठावंत अनुयायांत खंत व्यक्त केली जात आहे. लाखो मराठी माणसांना ‘मातोश्री’ आणि ठाकरे घराणेच्या बाबतीत कमालीचे ममत्व आहे. वेगळा अभिमान आहे.

यावेळच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचाही संदर्भ आदित्य ठाकरेंच्या भावी कारकीर्दीशी लावला गेला तर नवल नाही. राजकीय नेत्यांची नवी पिढी राजकारणात येत आहेत. सुजय विखे थेट खासदार झाले तर पार्थ पवारांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. ते आता विधानसभेची निवडणूक लढवतीलच. पवार, तटकरे, राणे, डावखरे, भुजबळ, मुंडे यांची घराणेशाही यापूर्वीच सुरू झाली आहे. मात्र अन्य राजकीय घराणी आणि ठाकरे घराणे यात प्रचंड फरक आहे. बाळासाहेबांनी असा विचार कधीच केला नव्हता. ‘मातोश्री’बद्दल महाराष्ट्राच्या मनात वेगळी भावना निर्माण झाली आहे. त्या भावनेला बाळासाहेबांनी कधीच तडा जाऊ दिला नाही. आदित्य ठाकरे इतिहास घडवू पहाताहेत. मात्र ते महाराष्ट्राला कसे रूचेल हा खरा सवाल आहे. ‘मातोश्री’साठी आता मतांचा जोगवा मागायचा का, याबद्दलचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. ‘मातोश्री’ आणि ठाकरे घराणे याच्या परंपरेचे काय होणार?”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content