HomeArchiveबटाटावडा!

बटाटावडा!

Details
बटाटावडा!

    08-Jul-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राजेश शिरभाते, मुंबई ब्युरो चीफ, गांवकरी
rajesh.shirbhate@gmail.com
मुंबईचे राष्ट्रीय खाद्य कोणते असा प्रश्न जर कोणाला विचारला तर तो एकच उत्तर देईल ते म्हणजे वडापाव. या वडापावातला बटाटावडा ही त्याची खास ओळख घेऊन येत असतो. तसा बटाटावडा ही काही फार अवघड गोष्ट नाही. मात्र त्याची चव जमवून आणण्याच कसब हे काही थोड्याथोडक्याच लोकांना जमून येते. बटाटावडा म्हणजे उकडलेल्या बटाट्याची कांदा, आले, लसूण, कडीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर घालून तयार केलेली भाजी. त्याचे गोल वा चपटे गोळे करून नंतर ते बेसनाच्या ओल्या पिठात घोळवून तळून काढलेला एक पदार्थ. त्यात हळद आणि मिठाचे प्रमाण अगदी संतुलीत ह.वे त्याचप्रमाणे तो तळताना फार लाल होणार नाही याची काळजी घेऊन तळला पाहिजे. त्याला पावाचे आवरण देऊन आत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांबरोबर तो खाल्ला जातो.

मुंबईत तर अनेक ज्ञात आणि अज्ञात वडापाव मिळण्याची ठिकाणं आहेत. त्यातही चेंबूर पोलीसस्टेशनजवळचा वडापाव, दादरच्या कीर्ती कॉलेजजवळचा वडापाव, शिवडी स्टेशनच्या जवळ मिळणारा, भांडूपमधून सुरू झालेला व आता बऱ्याच ठिकाणी मिळणारा भाऊचा वडापाव, मामा काणे यांच्या हॉटेलमध्ये मिळणारा वडापाव, दादरच्या पोतुर्गीज लेनच्या तोंडावर असलेला मुंबईतला पहिला वडापावचा स्टॉल, मालाड स्टेशनजवळचा, असे अनेक वडापाव आपल्याला माहित आहेत.

यातही काही वडापावांनी आपले वेगळेपण जपले आहे. ज्यात कॅपिटल थिएटरजवळच्या आराममध्ये मिळणारा हळद न घातलेला पण चवीला उत्तम असलेला वडापाव, अंधेरी स्थानकाच्या पूर्वेला गोमांतक वडा, हा पावाशिवायही खाता येतो. हा वडा तसा नेहमीसारखाच असलातरी याबरोबर देण्यात येते ती दही मिर्ची. त्यामुळे तो खाण्याची मजा काही औरच. दादरच्या छबीलदासच्या गल्लीत असलेल्या श्रीकृष्ण वडा हा आकाराने मोठा व यातल्या बटाट्याच्या भाजीचे पार मशीनच्या सहाय्याने केलेले एकजीवीकरणासाठी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या वड्यात उडदाची थोटी जळाल्याच्या जवळ जाणारी उडदाची डाळ टाकली जाते, त्यासाठीही तो प्रसिद्ध. त्याच्याबरोबर मिळते ती मिरची व जाडे मीठ. याचबरोबर घाटकोपर स्टेशनजवळच्या निओ वेलकम हॉटेलमध्ये मिळणारा बटाटावडा हा वेगळ्याच चवीचा असतो. त्यात पांढरी भाजी असते, त्याचबरोबर तो केवळ कडीपत्ता व मिरचीच्या चवीने तयार केला जातो. हा वडा खाताना मध्ये-मध्ये येणारे ओल्या नारळाचे तुकडे याची मजा वेगळीच करतात. त्याच्याबरोबर असते ती खोबऱ्याची चटणी. हा बटाटावडा खाताना त्याच्यावर लिंबू पिळून खाल्ला जातो. त्याने एक आंबट चव या वड्याला येते. याच्याबरोबर पाव मिळत नाही व तो खाण्याची गरजही वाटत नाही. साध्याशा चवीचा हा वडा मन प्रसन्न करून टाकतो.

ही वडापावाची वा वड्याची काही इतरत्र आढळणारी ठिकाणं असली तरी खऱ्या वडापावाने आजही आपले बस्तान आपल्या कामगार वस्तीतच ठेवले आहे. शिवसेनेच्या आधीच्या दिवसांमध्ये अनेकांनी वडापावचा व्यवसाय केला. त्यातही ही भाजी सहसा महिलावर्ग तयार करत असे. पुरूष हे वडे तळणे आदी कामे करत. काही ठिकाणी तर हा व्यवसाय पूर्णपणे महिलांनीच आपल्या ताब्यात ठेवल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या त्या भाजीची चव आजही जिभेवर रेंगाळते.

आताशा सगळ्याच वडापावाच्या गाडीवर भैय्ये असतात. त्यांना ती चव आजही आणता आलेली नाही. याआधी भैय्यांनी केलेल्या वडापावच्या गाडीचे एक वैशिष्ट्य असे, ती त्यांची चटणी. भेळेच्या गाडीवर मिळणारी मात्र थोडीअधिक बडीशेप टाकलेली ही चटणी असे. त्याच्याबरोबर वडापाव खाण्याची मजा येत असे. आता मात्र चटणीचा सगळाच भेसळयुक्त प्रकार वाटतो. एकेकाळी हिरवी चटणी, त्याच्याबरोबर चिंचेची चटणी आणि सोबत लसूण चटणी दिली जात असे. आता सहसा ही सुकी चटणी म्हणजे वडे तळताना शिल्लक राहिलेला चुरा, त्यात तिखट मिसळून तयार केलेली चटणी असते. त्यातून तो लसणाचा झटका हा कमीच झाला. आताशा चिंचेच्या चटणीची जागाही आरारोटच्या लाल रंग टाकलेल्या चटणीने घेतली आहे. त्यामुळे त्यातलीही मजा गेली. एक नवी मजा रेल्वेस्थानकात मिळायला लागली, ती म्हणजे या वड्याबरोबर रगडा असे एक नवेच मिश्रण समोर येते. पावाबरोबर व कमी पैशात पोट भरण्यासाठी या वडारगड्याचा चांगलाच आधार होतो.

अनेक पार्ट्यांमध्ये आता लहान बटाटावडे मिळताहेत. त्यांचीही चांगली चव लागते. अनेक रिसॉर्टमध्येही चांगले बटाटेवडे मिळत असत. रमाकांत यांचा वडा हा मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक हक्काचे ठिकाण होते. आता त्याची जागा बऱ्याच प्रमाणात दत्त स्नॅक्सने घेतली आहे. तुम्ही जर कधी बाईकवरून जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने गेलात तर खोपोलीत, घाट सुरू होण्याआधी एका भाजीच्या बाजारात एक वडापावाची गाडी लागते. त्याच्याकडचा वडाही असाच लगेच प्रेमात पाडायला लावणारा. असा हा आपला वडा, विदर्भात त्याची जरा तिखट आवृत्ती आलूबोंडा म्हणून समोर येते. त्याच्याबरोबर तरीही घ्यायची आणि सोबत अगदी पातळ पण आंबट असे दही या आलूबोंड्याची मजा वाढवतात. कोल्हापूरचा कट वडाही असाच चवीची डबलबारी असल्यासारखे. अनेकठिकाणी हा वडा आपल्याला मिळतो. पुण्यातल्या जोशी यांचा वडा असो की मुंबईतल्या लाडूसम्राट यांच्याकडचा वडा, असो. अगदी दादरच्या शिवाजी मंदिरातल्या वड्याची एक खास अशी चव आहे, ती नाटकाचा आनंद वाढवतात. असा हा वडा आपल्या प्रत्येकाच्याच स्मरणातला, आपापल्या आवडीचा..”
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content