HomeArchiveदेवेंद्र फडणवीस :...

देवेंद्र फडणवीस : आधुनिक ‘चाणक्य’!

Details
देवेंद्र फडणवीस : आधुनिक ‘चाणक्य’!

    22-Jul-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली होती, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात बाणेदारपणे परखड शब्दांत वयाच्या सहाव्या वर्षी एका मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चौफेर राजकीय फलंदाजी करीत आहे. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यक्षात अवतरली असल्याचे आपण याचि देहि याची डोळा अनुभवत आहोत.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक ताकदीचे नेते म्हणून त्यांचे नेतृत्त्व उदयास आले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे, असा त्यांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते.

फडणवीसांच्या मागे त्यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस आणि काकू शोभाताई फडणवीस यांची पुण्याई आहेच. पण त्यांचे स्वत:चे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पदार्पण केले. पाच वर्षांत आपल्या कामाची चुणूक दाखवित आणि संघाचा पाठिंबा मिळवित वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान त्यांनी पटकवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहाता आपले राजकीय नेतृत्त्व सिद्ध केले. विधानसभेकडे आपला मोर्चा वळविला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा त्यांनी दाखविला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून आपले वजन मजबूत केले.

त्यांची राजकीय कारकीर्दीला कलाटणी दिली ती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी. २००९ पर्यंत पक्षातर्फे निवडून येणारा एक हुशार आणि अभ्यासू आमदार एवढीच फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्राला ओळख होती. परंतु २०१३ साली भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या घटनादुरूस्तीचे अधिवेशन मुंबईत होते आणि यात अध्यक्ष नितीन गडकरी यांना त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल आणखी तीन वर्षांसाठी वाढवून देणारी घटनादुरूस्ती करण्यात करण्यात आली. दुर्दैवाने गडकरी यांना निव्वळ आरोपांवरून राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रीय पातळीवरील घटनादुरूस्ती राज्य पातळीवरसुद्धा लागू करण्यात आली. तेव्हा सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष होते. गोपीनाथरावांनी मुनगंटीवार यांना आणखी तीन वर्षे कार्यकाल वाढवून देण्यास विरोध केला. मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींना मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन, असे स्पष्ट सांगितले. मुंडे यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविले. अचानक नवीनच नाव पुढे येताच सारे सुरूवातीला बुचकळ्यात पडले. कोण म्हणे हा मुंडेंचा तर कोण म्हणे हा गडकरींचा कार्यकर्ता. पण फडणवीस हे ना तर मुंडेंचे ना तर गडकरींचे, ते होते (अजूनही आहेत) संघाचे कट्टर स्वयंसेवक. त्यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका लागल्या. देशातील काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवरून पायउतार झाली आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर आली. गडकरी आणि मुंडे भरघोस मतांनी निवडून आले आणि ते दोघेही केंद्रात मंत्री होणार ही खुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधून ठेवली होती. पण घडले वेगळेच. गडकरींचा समावेश मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात केला आणि मुंडे यांचे नाव यादीत नव्हते. मुंडे यांनी नवी दिल्लीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले. सारा प्रकार कानावर घातला. पण मोदींकडे जाणार कोण? खडसेंचं तसे मोदींच्या दरबारात फारसे वजन नव्हते पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने फडणवीस मोदींच्या दरबारात जाऊ शकत होते. त्याप्रमाणे ते मोदींना भेटायला गेले. या दोघांमध्ये व्यवस्थित चर्चा झाली. मुंडेंना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे मोदींनी फडणवीस यांना सांग्तले. परंतु फडणवीस यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर वकिली बाणा दाखवत मोदींकडे मुंडेंची भक्कमपणे बाजू मांडली. तिथेच देवेंद्र नरेंद्रांच्या मनात आपली जागा निर्माण करू शकले.

मुंडे केंद्रीय मंत्री झाले पण, दुर्दैवाने त्यांचे ३ जून २०१४ रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली. सगळी समीकरणे बदलली. कोअर कमिटी निवडण्यात आली. अर्थात फडणवीस यांचाच त्यावर वरचष्मा होता. एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश महेता हे कमिटीत होते. २५ सप्टेंबर २०१४ रोजी खडसे यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही त्याच दिवशी अर्ध्या तासात आघाडी तोडली आणि १५ ऑक्टोबर २०१४ रोजी हे चारही पक्ष स्वतंत्र लढत सामोरे गेले. लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आणि २८८ च्या सभागृहात भाजपने १२२ जागा जिंकून, तो सर्वात मोठा पक्ष बनला. शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे ४२ आणि ४१ जागांवरच समाधान मानावे लागले आणि पंधरा वर्षांची राजवट गमवावी लागली. फडणवीसांचे मजबूत वजन दिल्ली दरबारी प्रस्थापित झाले असल्याने एकनाथ खडसेंच्या नाराजीची तेवढ्यापुरती दखल घेत राजनाथ सिंहांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्रीपदाचा मानाचा मुकुट देवेंद्रांच्या शिरी बसविला. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक व्यक्ती या शपथविधी समारंभात साक्षीदार म्हणून उपस्थित होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा जसजशी होत होती तसतसे अंदाज आडाखे मांडले जात होते. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी इथेही ‘गुगली’ टाकली आणि राष्ट्रवादी बाहेरून भाजपच्या सरकारला समर्थन देण्याची घोषणा केली. ज्या मोदींनी बारामतीत जाऊन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी अशी संभावना केली, त्याच मोदींच्या पक्षाला पवार पाठिंबा देतात, यावरून तर्ककुतर्कांना उधाण आले. देवेंद्रांच्या राजकीय कौशल्याचा कस इथेच लागला. हरीभाऊ बागडे विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले. राजकीय हलकल्लोळ माजला होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. पण देवेंद्रांना आपल्या अल्पमतातल्या सरकारला स्पष्ट बहुमतात आणायचे होते. यासाठी नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेणे आणि राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखविणे क्रमप्राप्तच होते. डिसेंबर २०१४ च्या पहिल्या चारच दिवसात धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांना फडणवीस यांनी आपले दूत म्हणून ‘मातोश्री’वर धाडले. ठाकरेंसमवेत सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई यांच्याबरोबर चर्चा केली. ५ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी विरोधी पक्ष असलेली शिवसेना संध्याकाळी फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाली.

१२२+६३=१८५ अशी मजबूत संख्या भाजप-शिवसेना युतीची २८८ च्या सभागृहात झाली आणि रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत हेही सोबत आले असल्याने खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार अधिकारारूढ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीवर भव्य स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मराठा समाजाला आरक्षण असे अनेक प्रश्न मार्गी लावतानाच पायाभूत सुविधा, आर्थिक, राजकीय आघाडीवर फडणवीस यांनी आपल्या चाणक्य नीतीचे पुरेपूर दर्शन महाराष्ट्राबरोबर देशालाही घडविले. मोदी २०२४ साली पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि त्यानंतर फडणवीस त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येतील अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. पाहुया..”
 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content