एकीकडे नितीन गडकरी नावाचा अवलिया भारतभर रस्त्यांचे नवनवीन प्रोजेक्ट्स राबवतोय. त्यांच्या कार्यकुशलतेला सलाम करत राजकीय मुखवटे बाजला ठेवत टोकाचे विरोधी पक्षदेखील आपापल्या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावतायत. असे चित्र असताना मुंबई-गोवा महामार्गाची प्रगती कूर्मगतीने का? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात येणे स्वाभाविकच.
एखाद्या प्रदेशातील रस्ते आणि पायाभूत सुविधा या तिथल्या विकासासाठी महत्त्वाच्या बाबी. चांगल्या दर्जाचे रस्ते त्या प्रदेशातल्या राजकीय नेतृत्त्वाच्या दूरदृष्टी आणि कर्तृत्त्वाची साक्ष देतात. मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येताना इथल्या राजकीय दूरदृष्टीचा अभाव जाणवल्याशिवाय राहत नाही. एखादा प्रकल्प तडीस न्यायचा असल्यास स्थानिक नेतृत्त्वाची इच्छाशक्ती हा महत्त्वाचा घटक. याचं कारण तिथले स्थानिक प्रश्न, जनमानसाची नस इतर कोणापेक्षा स्थानिक प्रस्थापितांनाच अधिक ज्ञात असते. जनाधार व राजकीय वजनाचा वापर ते लोकांसमोर प्रकल्पांची विधायक बाजू जोरकसपणे ठेऊन तात्पुरत्या त्रासाउपर भविष्यात होणाऱ्या फायद्याचे चित्र उभे करण्यासाठी करतात की, स्थानिकांच्या हितसंबंधांचा बागुलबुवा उभा करून स्वतःसह स्वकीयांचे उखळ पांढरे करण्याला प्राधान्य देतात यावर त्या प्रकल्पाचे भवितव्य ठरते.
मुंबई-गोवा महामार्गानंतर सुरू झालेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी प्रत्यक्षात आलेल्या महामार्गांमुळे आलेली सुबत्ता अनुभवल्यानंतर अनेक चाणाक्ष धुरिणांनी पक्षाचे सोयरसुतक न ठेवता भविष्याचा वेध घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात महामार्ग विस्ताराचे प्रकल्प मार्गी लावण्याची राजकीय प्रगल्भता दाखवल्याची अनेक उदाहरणे पाहयला मिळतात. याउलट कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात जमिनींचे खितपत पडलेले वाद, पोटरस्ते, अंडरपास, ओवरब्रिज याबाबत व्यापक जनहित विचारात घेऊन ठोस भूमिका घेत अडथळे दूर करण्याचे प्रयत्न वेळच्यावेळी झालेले दिसत नाहीत. महामार्गाचे काम रखडण्याचे हे एक महत्त्वाचे कारण म्हणावे लागेल.
सावित्री नदीचा पूल तीन महिन्यांत होत असेल तर वर्षानुवर्षे रखडलेल्या चिपळूणचा वाशिष्ठीवरील पूल, वाहतूक सुरू असलेले पर्यायी दोन्ही पूल वाहून जाऊन महामार्ग बंद होण्याची नामुष्की येईपर्यंत होत नसेल तर खरंच आपण कुठेतरी कमी पडतोय. उलटपक्षी स्थानिक राजकीय वर्चस्वाचा आधार घेत प्रकल्पाच्या कामांमध्ये वाटे घेण्यातला प्रभाव लपून राहिलेला नाही. या सर्वांचा परिणाम इथल्या रोजगारासाठी शहरांची फरफट करुन मरणयातना भोगणाऱ्या पिढीवर नक्की होतोय. कारण पर्यटनउद्योग, कारखाने, व्यापारउदीम ही दिवास्वप्ने पूर्ण होण्यासाठी सक्षम दळणवळण व्यवस्थेला पर्याय नाही. इतर प्रांत पायभूत विकासाची कास धरुन गुंतवणूक आकर्षित करताना आम्ही मात्र रखडलेला महामार्ग व सक्षम पायाभूत सुविधांअभावी असलेले उद्योगही इतर प्रांतांमध्ये जाण्यासाठी हातभार लावतोय एवढं मात्र नक्की.


Perfect good keep it up Tushar