Homeएनसर्कलबारा बलुतेदार पद्धती,...

बारा बलुतेदार पद्धती, संगीत कारंजे, आदींनी नटलेले शिल्पग्राम उद्यान!

धावपळीच्या जीवनामध्ये निवांतपणा आणि विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करण्यासह त्यांना प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्याची किमया मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने साधली आहे ती जोगेश्वरी पूर्वेच्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राममध्ये! बारा बलुतेदार कार्यपद्धती, प्राचीन खेळ, कला अशी विविधांगी सांस्कृतिक माहिती देणारे हरित केंद्र म्हणून या शिल्पग्रामची ओळख बनली आहे.

मुंबईच्या जोगेश्वरी (पूर्व) येथे जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्गावर पूनम नगर परिसरात तब्बल ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान फुलले आहे. हे निव्वळ उद्यान नाही तर सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणारे हरित केंद्रदेखील आहे. याठिकाणी बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पं आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे बारा बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरूप, प्राचीन खेळ व नृत्यपरंपरा यांची शिल्पं पाहताना मुले आणि वडीलधारीदेखील हरखून जातात. इतिहासातील माहिती शिल्प रूपामध्ये पाहून मुलांना सांस्कृतिक आकलन करणे सहज सोपे तर ठरतेच, समवेत विरंगुळ्यातून शिक्षणदेखील मिळते.

शिल्पग्राममध्ये खुला रंगमंचदेखील (एम्फीथिएटर) तयार करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी किमान ५०० व्यक्ती बसू शकतील, इतक्या क्षमतेचा हा खुला रंगमंच आहे.

या उद्यानात आकर्षक हिरवळ व वृक्षवेली आहेत. हिरवळीसोबत विविध प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे ठिकठिकाणी असल्याने सदर उद्यानाच्या सौंदर्यात ती भर घालतात. संगीतमय कारंजे आणि सांगीतिक पदपथ हे आणखी महत्त्वाचे आकर्षण याठिकाणी आहे. सांगीतिक तालावर विविध रंगांमध्ये उसळणारे कारंजे अबालवृद्धांना आनंद देतात. शिल्पग्राममधील विस्तीर्ण परिसरात फिरताना विविध ठिकाणे जोडणारे सांगीतिक पदपथ (म्युझिकल वॉकिंग ट्रॅक्स) व आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. संगीत श्रवण करताना हिरवळीवर चालणे आणि सोबत उद्यानातील शिल्पं पाहणे हा आगळावेगळा अनुभव ठरतो.

शिल्पग्राममध्ये ठिकठिकाणी आसनव्यवस्था आहे. उद्यानाच्या सौंदर्यात भर घालणारे वेगवेगळ्या आकाराचे गझेबो आसन व्यवस्थेसह संपूर्ण उद्यानाचे मनोहारी दृश्य पाहता येईल, अशा रीतीने बनविण्यात आले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागेत विविध साहित्य लावण्यात आली आहेत.

शिल्पग्राम उद्यान सकाळी ६ ते १० आणि दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान नागरिकांकरिता खुले असते. दर बुधवारी नियमित देखभालीकरिता ते बंद असते. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीदरम्यान नागरिक शिल्पग्रामला भेट देऊन आनंद लुटू शकतात.

हे उद्यान पाहण्याकरिता प्रवेशशुल्क आकारले जाते. ३ ते १२ वर्षे ह्या वयोगटातील लहान मुलांकरिता प्रत्येकी ५ रुपये आणि १२ वर्षेपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी प्रत्येकी २५ रुपये आकारले जातात. असे असले तरी दोन प्रौढ आणि दोन लहान मुले अशा चौघांच्या एका कुटुंबासाठी (आई, वडील व १२ वर्षांखालील दोन मुले) यांना मिळून फक्त २५ रुपये आकारण्यात येतात. शिल्पग्रामला दररोज सुमारे १५०० ते २ हजार नागरिक भेट देतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी ह्यांनी दिली. विविध चित्रपटांच्या/मालिकांच्या चित्रिकरणासाठीदेखील शिल्पग्रामला सातत्याने मागणी असते. त्यासाठीदेखील सशुल्क आकारणी करून परवानगी दिली जाते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content