Homeटॉप स्टोरीश्री गणरायाच्या निरोपासाठी...

श्री गणरायाच्या निरोपासाठी मुंबईकरांची लगबग सुरू!

कोरोना काळात कंटाळलेल्या मुंबईकरांनी आज श्री गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला, बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू केली. लालबाग, परळ या गणेशोत्सवाच्या माहेरघरी उजाडल्यापासूनच लगबग सुरू झाली. लालबागमधल्या गणेश गल्लीतल्या उत्सवात सकाळीच पूजाअर्चा उरकून घेण्यात आली. तशीच परिस्थिती इतर अनेक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांत दिसत होती.

मुंबई महापालिका सज्ज

दरम्यान, श्री गणेशचतुर्थीपासून घराघरात आणि मुंबईतील विविध परिसरात विराजमान झालेल्‍या आपल्‍या लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाचा श्री गणेशोत्सवदेखील ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर होत असल्याने हा उत्सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याचे आवाहन पालिकेने वेळोवेळी केले आहे. या आवाहनाला मुंबईकर अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद देत आहेत.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पालिकेने श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक ती सर्व व्‍यवस्‍था पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार इतक्या संख्येने संबंधित कर्मचारी–अधिकारी कार्यरत आहेत, असे उपायुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी सांगितले.

कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदादेखील पालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळेदेखील कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्‍थळे असून, याठिकाणी पालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षीदेखील पालिकेद्वारे विविध सेवासुविधा उपलब्‍ध करुन देण्यात येत आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नये, यासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर विविध ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जनस्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवासुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सरंक्षण कठडयांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्थादेखील आवश्यकतेनुसार करण्‍यात आली आहे.

यंदाचा गणेशोत्सव हा ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर होत असल्याने संबंधित प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.

या अनुषंगाने मुंबई महापालिकेतर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत-

• सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इ.चा कमीतकमी वापर करुन कमीतकमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी.

• घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्याघरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

• गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्याघरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनीदेखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

• घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्यावेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीतजास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत.

• घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.

• विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

• शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये.

• सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १०पेक्षा अधिक लोक असणार नाहीत.  जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर १० व्‍यक्तिंनी शक्‍यतो ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येऊ नये.

• सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जनस्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेऊ नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जनस्‍थळी घेऊन जावे.  विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्‍यास  / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

• यंदाच्या म्हणजेच सन २०२१च्या गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याचीदेखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

• मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जनस्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देऊन मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

• नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

• महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

• मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

• प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

• घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

• बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन  करण्‍यात यावे.

• उत्सवप्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल.  अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

Continue reading

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...
Skip to content