Homeडेली पल्स.. उकडीच्या मोहक...

.. उकडीच्या मोहक मोदकांना मात्र पर्याय नाही!!

गणेशोत्सवाचे दिवस आले की गणपतीनंतर कोणाची चाहूल लागत असेल तर ती आहे मोदकाची. हा एक सुरेख दिसणारा, ज्याच्या आकाराने मोद निर्णाण होईल असा मोहक पदार्थ असल्यामुळेच याला मोदक असे नाव मिळाले असावे. तांदळाच्या पिठाचे मोदक.. त्यात भरलेले सारण.. इतकेच मोदकाचे महत्त्व नाही. मोदक तयार करण्याची संपूर्ण प्रक्रियाच आनंददायक आहे.

आधी चांगल्या प्रतीचे तांदूळ घ्यायचे. समाजातल्या सर्व स्तराला एकत्र घेऊन चालणारा हा गणेशोत्सव असल्यामुळे त्यात थोडे साधेही तांदूळ मिसळायचे. ते चांगल्याप्रकारे धुऊन घ्यायचे. मग ते साधारण दमट हवामान असेल किंवा आभाळ आलेले असेल त्यावेळी पंख्याखाली सुकवायचे. ते कडक उन्हातही सुकवून चालत नाहीत. त्याचा रंग कमी होतो. किंवा ते तुटतात.

या सुरेख मोदकाच्या प्रत्येक प्रक्रियेला एक अर्थ आहे. एकमेकांवरचे अवलंबित्व आहे. एक प्रक्रिया जरी चुकीची झाली तरी त्याचा थेट परिणाम त्याच्या पूर्ण परिणामावर पडतो. ते सुकवून झाले की मग ते दळायचे. ते जात्यावर दळत असतानाची लगबगही पाहण्यासारखी असते. ते दळतानाही फार काळजी घ्यावी लागते. आजुबाजूला धुळीचा एक कणही असता कामा नये. अगदी घरघंटीवर जरी ते दळले तरी ही दक्षता पाळावी लागते. आमची आई तर मोदकाचे पीठ तयार करत असते त्यावेळी घरात एकप्रकारची घोषित संचारबंदीच असते. हे मोदकाचे पीठ फ्रिजमध्ये ठेवायचे. ही तिचीच टिप आहे.

गणपतीच्या दिवशीची मोदक तयार करण्याची लगबगही अगदी पाहण्यासारखी, प्रक्रियेचा आनंद घेण्यासारखी असते. आदल्या दिवशीच मोदकपात्र घासून लख्ख केले जाते. त्यातही ज्यांच्याकडे आजही तांब्याचे जुने मोदकपात्र असेल त्यांना याची चांगलीच कल्पना असेल. कागदाच्या पुरचुंडीत भांडी घासायची चिंच आणायची, मग आधी ते खास प्लॅस्टिकमध्ये किंवा कपड्यात बांधून ठेवलेले मोदकपात्र काढायचे, त्यानंतर ते घासायचे. आजकाल पितांबरीनेही ते चांगले निघते. (उद्य आगाशे वाचताय ना..) त्यानंतर ते सुकवायचे. त्याच्यावर अगदी पाण्याचेही डागही पडता कामा नयेत. आतल्या मोदकाचा व या तांब्याच्या स्वच्छतेचा काही संबंध नसला तरी तो पाळावा लागतो बाबा.. शास्त्र असते ते..

मोदक करायचा दिवस तसाही खासच असतो. बाहेर जेव्हा सगळ्यांची पुजेच्या साहित्याची वगैरे गडबड चाललेली असते, त्यावेळी खास सुग्रण महिला मोदकाची जबाबदारी आपल्यावर उचलते. मग ग्लासाने ते मोदक पिठ मोजून घेतले जाते. त्यानंतर एका टोपात पुन्हा मोजून पाणी घेतले जाते. ते पाणी उकळले की मग त्यात हे पीठ टाकून उकड काढली जाते. त्या आधीची एक प्रक्रिया तर सांगायची राहिलीच. जेव्हा ते सारे काम सुरू असते किंवा त्याच्याही आधी सारण तयार केले जाते.

चांगले मोठे पाहून चारपाच नारळ खवले जातात. हा खास शब्द.. आपल्या विळीच्या अग्रभागी हे नारळ खवण्याचे साधन असते. त्या विळीच्या पाटावर बसून हे नारळ खवले जातात. कोकणात विळीचे पाटही मोठे असतात. ते नारळ खवताना त्याच्या दशा वगैरे पडता कामा नये याची दक्षता तर घ्यायची असतेच. तर ते खवून झाले की गुळ किसून घ्यायचा. मग थोडे साजुक तूप घालून हे सारण तयार करायचे. त्यातही मिरी, जायफळ, वेलची किंवा खास मोदकाचा मसाला टाकूनही या मोदकांना चव दिली जाते. साधे गोड सारण केल्यास मोदक खाण्याच्या संख्येवर मर्यादा येतात. त्यात मसाला असला तर दोनचार मोदक जास्त जरी झाले तरी काही हरकत नाही. हे सारण थंड होते.

कट टू मोदकाच्या पिठाकडे आल्यास ते गरम पीठ परातीत घेऊन चांगलेच मळले जाते. हे मळून चांगले झाले की मग मोदक तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. एक लहान गोळा घेऊन त्याची वाटी तयार केली जाते. त्या वाटीत मग सारण भरले जाते. त्यानंतर मग त्या वाटीला दुमडून दुमडून त्याच्या कळ्या पाळल्या जातात. जितके ज्याचे कौशल्य तितका त्याचा वेगही असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक पाळीचा आकारही असतो.

हे मोदक तयार करताना हाताची होणारी हालचालही फार मोहक असते. गणपतीनिमित्त हातावर मेंदी काढली असेल तर हातावरचा त्याचा रंग, नेलपेंटचा रंग या साऱ्यांचा साज ल्यायलेल्या त्या नाजूक हाताचा तो हस्तन्यास (पायाचा पदन्यास म्हणून हाताचा तो हस्तन्यास..) हा पाहण्यासारखा असतो. त्या बोटांच्या एखाद्या नृत्यात दिसणाऱ्या हालचाली पाहणेही गंमतशीर असते. त्याला साज असते ती हातात असलेल्या काचेच्या बांगड्यांच्या किणकिणाटाची. एक एक कळी तयार करत मग त्या मोदकाला त्याचा पूर्ण आकार दिला जातो.

तो सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद केला जातो. मग मोदकपात्राच्या चाळणीला तेल लावून किंवा मग त्यावर केळीची वा हळदीची पान टाकून त्यावर हे मोदक तयार केले जातात. सगळे मोदक आपापल्या जागी विराजमान झाले की मग मोदकपात्र बंद केले जाते. मोदकपात्राच्या तळाशी असलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या वाफेवर मग हे मोदक चांगले उकडले जातात. केक बनवण्याच्या प्रक्रियेत ज्याप्रमाणे बेकिंगची वेळ ठरलेली असते तशीच ती मोदकाचीही असते.

हे मोदक मग तयार झाल्यावर हलक्या हाताने मोठ्या निगुतीने केळीची पान ठेवलेल्या ताटात काढले जातात. गणपतीत ते लगेच खायचे नसतात. गणपतीची पूजा झाल्यावर नैवैद्य दाखवल्यावर ते आपल्यापुढे आधी प्रसाद म्हणून व नंतर जेवणात येतात. जेवणात त्याची गंमत अधिक वाढते. मग ते पुरीभाजी खाताना अधूनमधून किंवा वरणभात व काळ्या वाटाण्याची उसळ खाताना अधूनमधून न मोजता खाल्ले जातात. कोकणातल्या उकडीच्या मोदकांची गंमतच न्यारी असते. त्यासारखे तेच..

मोदकाचा संबंध हा तिबेटमधल्या मोमोजशी लावला जातो. कैलास पर्वतावर राहणाऱ्या शिव-पार्वतीचा मुलगा गणपती शेजाऱ्यांकडे जात असावा व ज्याप्रमाणे आपल्या मुलांना शेजाऱ्यांकडचे जेवण आवडते तसे ते मोदक त्याच्या आवडीचे झाले असावेत. विदर्भात गव्हाचे मोदक करतात. ‘नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लालेगव्हाचे..’ असे जरी गाण्यात म्हटलेले असले तरी विदर्भात ते सवयीने व उपलब्ध साधनाच्या हेतूने तयार केले जातात. या गव्हाच्या तळलेल्या मोदकात पुरणपोळीत भरतात ना ते सारण भरले जाते. जायफळाचा सुगंध असलेले पुरण आधी तळणाचा सुगंध असलेल्या त्या मोदकाची चवही विशेष लागते.

या दोन मोदकांच्या प्रकाराच्या व्यतिरिक्त जे जे काही मोदक म्हणून समोर येते ते केवळ दुसऱ्या पदार्थाला मोदकाचा आकार दिला आहे इतकेच. म्हणजे मावा मोदक.. म्हणजे काय तर त्या माव्याचे पेढे तयार करण्याऐवजी त्याला मोदकाचा आकार देणे.. काजू मोदक ही गोष्ट एकेकाळी फार प्रसिद्ध होती. मुळात काजुकतली करण्याऐवजी हे मोदक करायला हवे होते. मात्र त्याला एक चुकीचे रुपही मिळाले. कोणाकडे गेल्यास मोदक न्यायला सोपे व टिकाऊ असावेत, यानिमित्ताने हे मोदक मिळत असतात.

गोळ्या बनवण्यासाठीचे ग्लुकोज, त्यात काही चवीच्या व रंगाच्या पावडरी टाकून हे मोदक बनवले जातात. ते त्रिकोणी पुड्यात मिळतात. हेच काय ते त्याचे वैशिष्ट्य. विविध पदार्थांचे जरी हे मोदक आले असले तरी आतापर्यंत बंगाली मिठायांनी काही हा आकार धारण केला नाही. अगदी बेल्जियम चॉकलेटचे मोदक मिळतील. पण मोदकाच्या आकाराचा चमचम वा राजभोग उपलब्ध होत नाही. तर असे हे आपले मोदक या देशात चीनमधून जे काही संस्कृतीचे स्थलांतर झाले त्याचेही द्योतक असावेत. पण उकडीच्या मोदकांना पर्याय नाही हे मात्र खरेचं..

Continue reading

Skip to content