Homeटॉप स्टोरीयंदा सार्वजनिक गणरायाचे...

यंदा सार्वजनिक गणरायाचे दर्शन घ्या फक्त ऑनलाईन व टीव्हीवर!

राज्यातल्या कोरोनाची सध्याची स्थिती पाहता यंदाही विविध निर्बंधांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यादृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आयोजकांनी भाविकांना मूर्तीचे ऑानलाईन किंवा इलेक्ट्रॅानिक माध्यमांद्वारे दर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे.

जाहिराती दाखवा पण जनजागृती करणाऱ्या

उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. याशिवाय ब्रेक दि चेनमधील इतर निर्बंध कायम राहतील, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

भजन-किर्तन करा पण मर्यादित आवाजात

आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वनीप्रदुषणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतल्या भाविकांनी पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना

कोविड-१९ या साथरोगाच्‍या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन मुंबई महापालिकेनेही केले आहे. याअनुषंगाने मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव-२०२१ साजरा करताना पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना पालिकेने जारी केल्या आहेत.

सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. या प्रकोपापासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करुनच गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी यावर्षीच्या (सन २०२१च्या) गणेशोत्सवादरम्यान खालील निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात येत आहे.

  • घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीतजास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती घरगुती उत्‍सवासाठी २ फुटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.
  • सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी १०पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मुखपट्टी (मास्क) वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील. तसेच शक्‍यतो सदर १० व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या  लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत.  श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी ४ फुटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येऊ नये.
  • घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविड-१९ साथरोगापासून रक्षण करणे शक्य होईल.
  • मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली, गणेशोत्‍सव मंडळाचे प्रतिनिधी यांच्‍या उपस्थितीत ०२ सप्टेंबर २०२१ रोजी दूरदृश्‍य प्रणालीसह झालेल्‍या बैठकीत मागील काही दिवसांतील कोविड-१९ रुग्‍णांची वाढती संख्‍या तसेच या साथरोगाची तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे. गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी असा निर्णय घेण्‍यात आला.
  • सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीतकमी वापर करुन कमीतकमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी.
  • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
  • गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनीदेखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.
  • घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीतजास्त ५  व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत.
  • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.
  •  विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.
  •  शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये.
  •  सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १०पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मुखपट्टी (मास्‍क) वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे.  तसेच सदर १० व्यक्तींनी शक्‍यतो ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत. तसेच, कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येऊ नये.
  •  सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जनस्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेऊ नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जनस्‍थळी घेऊन जावे.  विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  •  सन-२०२१ गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याचीदेखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
  •  मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जनस्‍थळे आहेत. तेथे  महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देऊन मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.  त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती  विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.
  •  नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.
  •  महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.
  •  मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
  •  विसर्जनादरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मुखपट्टी / मास्‍क,  सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  •  प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (containment zone) असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तींचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.
  •  घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
  •  बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन  करण्‍यात यावे.
  •  उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content