अविनाश दौंड सेवानिवृत्त? छ्या.. काहीतरीच काय? जो कामगार नेता ऐन भरात गगनभरारी घेत असतो तो सेवानिवृत्त होऊच शकत नाही. अशा हरहुन्नरी तडफदार कामगार नेत्याचा बुलंद आवाज ऐकण्यासाठी तमाम कामगार, कर्मचारी आसुसलेला असताना हा नेता सेवानिवृत्त होऊच शकत नाही. अर्थात, नियत वयोमानानुसार अविनाश दौंड जरी सेवेत अधिकृतपणे कार्यरत राहू शकत नसतील तरी कामगार नेते म्हणून ते निश्चितपणे कामगारांना मार्गदर्शन करू शकतील, कामगारांचे नेतृत्त्व करु शकतील यात वाद नाही.
अविनाश दौंड १९८४पासून चर्नी रोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे कार्यरत होते आणि तेथूनच त्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करण्यास सुरुवात केली. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय म्हणजे माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, अविभाज्य घटक आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्याचे कारण मी १९७५ ते १९७८ या कालावधीत शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे मोनो कास्टिंग मशीन ऑपरेटर या मुद्रणकलेचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. याच कालावधीत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे ३७ दिवस आणि ५४ दिवस असे दोन महत्त्वाचे संप पुकारण्यात आले होते. रवि भागवत, भाई आचरेकर, दादा मंडलिक, रामदास कदम, प्रफुल्ल (पप्पू) पाटकर, विजय सुर्वे ही मंडळी कामगार चळवळ पुढे नेण्यात अग्रभागी होती. त्यामुळे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाबरोबरच माझी एक चांगली जवळीक निर्माण झाली.

पत्रकारिता करता करता र. ग. कर्णिक, सुनील जोशी, भालचंद्र साप्ते गुरुजी, विश्वास काटकर, मिलिंद सरदेशमुख यांच्यासमवेत अविनाश दौंड संपर्कात आले. या मंडळींबरोबर वावरताना जणू काही एका परिवारातच असल्याची भावना निर्माण झाली. आणि मग ही मंडळी मला हक्काने त्यांच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू लागली आणि मला भरपूर सन्मान दिला. याच वातावरणात मला अविनाश दौंड यांच्या नेतृत्वगुणांची जवळून ओळख झाली. अविनाश दौंड यांचे बुलंद आवाजातील घणाघाती भाषण कर्मचाऱ्यांना त्यांच्यातील जल्लोष उफाळून आणण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते आणि खऱ्या अर्थाने कामगार चळवळ पुढे नेऊन कामगारांना त्यांचे न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी अविनाश दौंड यांचे नेतृत्व एका ज्वलंत निखाऱ्यासारखे आहे.
अविनाश दौंड यांनी मिलिंदच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या मंत्रालय कर्मचारी संघटनेचे कार्यालय प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर सुरू केले. त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. तो घरगुती स्वरुपाचा कार्यक्रम र. ग. कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. अविनाश दौंड यांची जवळीक तेथूनच जास्त वाढली. अविनाश दौंड शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे आहेत हे मला माहित झाले आणि मग माझ्या मनात अविनाशबद्दल एक संवेदनशील कोपरा निर्माण झाला. अविनाश दौंड खऱ्या अर्थाने र. ग. कर्णिक यांचे शिष्योत्तम म्हणजे उत्तम शिष्य आहेत. आज कामगार चळवळीत जी भाई श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी, र. ग. कर्णिक, भाई कोतवाल आदि दिग्गज नावे अभिमानाने घेण्यात येतात अशाच झुंझार कामगार नेत्यांच्या मांदियाळीत अविनाशचे नाव घेण्यात यावेत, असे कार्य यांच्या हातून घडो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कणखर नेतृत्त्व सदैव लाभो. यासाठी त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही सदिच्छा!

