Homeमाय व्हॉईसभीतीची लाटही ओसरत...

भीतीची लाटही ओसरत आहे! पण, सावधान!!

देशभरातील कोरोनाचे वातावरण आता सुधारत आहे ही उत्तम गोष्ट घडत आहे. आधीच्या काळातील नव्या रुग्णसंख्येपेक्षा सध्या कमी संख्येने नव्या कोरोना रुग्णांची भर पडते आहे. या गुणोत्तराला आर फॅक्टर अशी संज्ञा शास्रज्ञ वापरतात. भारताचा आर फॅक्टर सध्या एकच्या खाली म्हणजे 0.89 इतका आहे. केरळ राज्य कोरोनासंदर्भात अतिशयच चिंतेचा विषय झाले होते व आहेही. गेला महिनाभर तिथली रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत होती. जेव्हा महाराष्ट्राचा आकडा आठ ते नऊ हजार दररोज नवे रुग्ण असा येत होता तेव्हा केरळने पंधरा हजार, सोळा हजार, वीस हजार अशी उड्डाणे घेतली होती.

देशातली कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 36 हजार असताना त्यातील एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या 21 हजार इतकी आहे. महाराष्ट्रातील आकडे समाधानकारकरीत्या खाली उतरत आहेत, अशी नोंद टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी तसेच रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे. राज्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर सध्या 2.44 इतका खाली आहे. पण यापेक्षा अधिक वेगाने रुग्णवाढ करणाऱ्या अकरा जिल्ह्यांबाबतीत चिंता होती. त्या अकरांच्या यादीतील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि बीड हे चार जिल्हे आता बाहेर निघाले आहेत. त्यांचा पॉझिटिव्हीटी दर आता पुष्कळ कमी झाला आहे.

सध्या सातारा, सांगली, नगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर आणि सिंधुदूर्ग हेच सात जिल्हे राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी दाखवत आहेत. पण त्यातही लक्षणीय भाग असा आहे की पंधरा-वीस दिवसांपूर्वीपर्यंत सांगली-साताऱ्यातील पॉझिटिव्हीटी दर दहा आणि बारापेक्षा अधिक येत होता. आता, साताऱ्याचा दर 5.4 आहे तर या सातांमध्ये सर्वात कमी दर सिंधुदुर्गाचा आहे- 3.2. म्हणजेच या सात चिंता स्थितीतील जिल्ह्यांतीलही रुग्णवाढ मागील तीन आठवड्यात क्रमशः खालीच येत आहे.

राज्याची दररोजची रुग्णवाढ सरासरीने आठ हजारांच्या घरातून चार हजारांच्या घरात, अशी खाली आलेली असानाना हेच होणे अपेक्षित आहे. पण आरोग्य विभागाची सध्याची चिंता इतकीच आहे की या चिंता जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटीचा दरही राज्याच्या बरोबरीने उतरायला हवा. खरेतर राज्यात अशी चिंता जिल्हे यादीच उरू नये. यासाठी आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. मात्र या सात जिल्ह्यांसह जिथे जिथे विविध निर्बंधांतून शीथिलता दिली गेली आहे, त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनांनी काळजी घेणे गरजेचेच आहे. रुग्णवाढीचा दर पुन्हा वाढता कामा नये याची खबरदारी घेतली तर तिसऱ्या लाटेचा धोका संपू शकेल.

कोरोनाची भानगड अशी आहे की, त्याचा धोका आधी लक्षात येत नाही. कोरोनाचे संकट तसे विचित्रच होते व आहेही. लोक एकेमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यातील काहींमध्ये विषाणूसंसर्ग विशिष्ट स्तरावर  झालेला असतो, त्याचा त्यांनाही पत्ता नसतो. कारण ते लक्षणविरहित असे कोरोना रुग्ण बनलेले असतात. अशा स्थितीत ज्यांना संसर्ग नाही त्यांनाही या लक्षणविरहितांमुळे बाधा होते. म्हणून गर्दी टाळा, एकमेकांमध्ये अंतर ठेवा हाच मंत्र जपावा लागतो.

कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचसाठी वारंवार आवाहने करत आहेत की, बाबांनो तिसऱ्या लाटेला निमंत्रण नको. गर्दीचे कार्यक्रम टाळा, सध्या शक्तीप्रदर्शने नकोत. राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. यासंदर्भात ठाकरेंनी म्हटले आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजीदेखील महत्त्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहवे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये. पण नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यात तयार होणाऱ्या जवळपास 1300 मे. टन. दररोज, या ऑक्सिजन उत्पादनात भर टाकण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. पण रुग्णालयातच ऑक्सिजन उपलब्धतेसाठी संयत्रे बसवण्याचा आरोग्य विभागाचा सल्ला रुग्णालयांच्या पचनी पडत नाही. कारण जर हे तीस लाख ते एक करोडदरम्यान किंमतीचे संयत्र बसवले तरी त्याचा भविष्यात वापर किती होईल याची खात्री त्यांना वाटत नाही. आजच ऑक्सिजन व आयसीयू बेड मोठ्या प्रमाणात रिक्त राहत असताना नव्याने खर्च कशाला करा अशी खाजगी रुग्णालयांची भूमिका दिसते व ती अव्यवहार्य नाही.

केईएम रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत दररोज किमान पाचशे कोरोना रुग्ण दाखल असायचे. आजची तिथली दाखल कोरोना रुग्णांची संख्या आहे फक्त दहा! सध्या राज्यातली एक्टिव्ह रुग्णांची संख्याही 56 हजारांच्या आसपास खाली आलेली आहे. ती आधी सव्वा लाखांच्या घरात होती. साधारण तीन लाख लोक सध्या घरात क्वारंटाईन झालेले आहेत. म्हणजेच त्यांना कोरोनाची लक्षणे फारशी नाहीत वा सौम्य लक्षणे आहेत. अशा वातावरणात भारतीय जनता पक्षाने आपला वारू चौखूर उधळायला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्व नवे-जुने मंत्री दिल्लीतच मुक्कामी होते. पण संसदेच्या अधिवेशनाची अखेरीच घंटा लवकर वाजली. पेगासस प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्दयावरचा गोंधळ सुरू राहिल्याने कोरोना अतिवृष्टी अशा बाबी चर्चेतही येऊ शकल्या नाहीत. 15 ऑगस्टच्या दिल्लीतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व नव्या मंत्र्यांना सांगितले की, तुमच्या भागात जाऊन जनतेत फिरा त्यांचे आशिर्वाद घ्या. महाराष्ट्रातील चार नवे मंत्री त्यामुळे सध्या आपापल्या जिल्ह्यात फिरत आहेत. या यात्रांचा उद्द्येश अर्थातच राजकीयच आहे.

नारायण राणे यांनी मुंबईतून सुरूवात करून शिवसेनेला आव्हान दिलेच आहे. कपिल पाटील ठाणे जिल्हा पिंजून काढणार आहेत. भारती पवारांवर नाशिकसह पालघरचीही जबाबदारी दिली आहे. तिकडे मराठवाड्यात भागवत कराड फिरत आहेत. वंजारा, आगरी, आदिवासी अशा सर्व इतर मागास वर्गांना भाजपाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा हा प्रसास जरी असला तरी कोरोना संकटाचे भान त्यांनाही सोडता येणार नाही.

Continue reading

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून,...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत....
Skip to content