वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीतील अर्बन एक्स्टेंशन रोड-२वरील मुंडका टोल प्लाझावर ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती देशभरातील टोलनाक्यांवर टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. टोलवरून वाहन जाताच एएनपीआर कॅमेरे आणि फास्टॅग यंत्रणा वाहनाचा नोंदणी क्रमांक वाचून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी)च्या ‘वाहन’ डेटाबेसशी जोडली जाईल. विम्याची मुदत संपल्याचे आढळल्यास वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर काही मिनिटांतच एसएमएस पाठवला जाईल. त्यात वाहनक्रमांक, टोल ओलांडल्याची वेळ आणि विमा संपल्याची तारीख असेल.
हा एसएमएस म्हणजे दंड किंवा ई-चलन नाही, तर केवळ विमा नूतनीकरणाची आठवण करून देणारी पूर्वसूचना असेल, हे लक्षात घ्यावे. मात्र, वैध विम्याशिवाय वाहन चालवणे हा मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. १५ ऑगस्ट २०२६पासून लागू झालेल्या सुधारित तरतुदीनुसार, पहिल्या उल्लंघनासाठी वाहनाच्या बेस थर्ड पार्टी प्रीमियमच्या तिप्पट रक्कम किंवा ५,००० रुपये, यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास बेस प्रीमियमच्या पाचपट रक्कम किंवा १०,००० रुपये, यापैकी जी जास्त असेल तेवढा दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वीच आपल्या वाहनाचा विमा वैध आहे का, याची खात्री करून घ्यावी आणि मुदत संपली असल्यास तत्काळ नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

