निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा सुरुवातीच्या टप्प्यात ५५ वर्षांवरील आणि ५ लाखांहून अधिक पीएफ शिल्लक असलेल्या सुमारे ६.३२ लाख सदस्यांना होण्याची शक्यता आहे.
या योजनेत सदस्यांना तीन पर्याय मिळणार आहेत.
पहिला- संपूर्ण रक्कम हफ्त्यांमध्ये घेणे
दुसरा- सुरुवातीला काही रक्कम एकरकमी घेऊन उरलेली रक्कम हफ्त्यांमध्ये घेणे
तिसरा- केवळ व्याजाची रक्कम काढणे.
गरज पडल्यास मध्येच एसडब्ल्यूपी थांबवून उरलेली संपूर्ण रक्कम काढण्याचीही मुभा असणार आहे.
हप्ते चालू असताना सदस्याचे निधन झाल्यास, वारसांना उरलेली रक्कम एकरकमी काढता येईल किंवा हफ्ते सुरू ठेवता येतील. ही सुविधा लगेच सुरू होणार नाही. ईपीएफ योजनेत आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांत ती लागू होण्याची अपेक्षा आहे. याच बैठकीत ५५ वर्षांखालील सदस्यांसाठी किमान शिल्लक ठेवण्याची अट २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आली आहे. म्हणजे आता ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल. तसेच बेरोजगारीनंतर पीएफ काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून पुन्हा २ महिन्यांवर आणण्यात आला आहे.

