पत्रकार सामन्यातला! निष्ठावान राऊतांचा आणि बरसला उद्धवजींवर!! होय. मी दैनिक सामनामधून निवृत्त झालेले ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र मुळीक यांच्याबद्दल बोलतोय. आपल्या 35 वर्षांच्या पत्रकारितेतली तब्बल 26 वर्षे ‘सामना’त विविध पदे भूषवित पत्रकारिता करणाऱ्या मुळीक यांनी नुकतेच ‘सुडाचे राजकारण’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातच ‘सामना’मध्ये सहसंपादक राहिलेल्या पत्रकार सुरेंद्र मुळीक यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. या दाव्यांपैकीच एका दाव्यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि ‘सामना’चे संपादक तसेच अप्रत्यक्ष मालक (संचालन एक ट्रस्ट करते.) उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची ‘हास्यजत्रा’ केली, असे त्यांनी म्हटले आहे.
येत्या 30 ऑक्टोबरला मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीतल्या आयईएस न्यू इंग्लीश स्कूल, या ‘मातोश्री’पासून (उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांचे निष्ठावान असलेले मुळीक त्यांच्यासोबतच ‘सामना’मध्ये रुजू झाले. हे पुस्तकही मुळीक यांनी राऊत यांनाच अर्पण केले आहे आणि प्रकाशनाच्या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुळीक यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनाच उद्धवजींचे कान तर टोचायचे नाहीत ना, असा प्रश्न चर्चिला जाऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडलेले राऊत, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भांडुपच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर बऱ्यापैकी बरे झाले. या ‘अध्याया’चा हा पुढचा भाग तर नाही ना, अशी शंकाही यानिमित्ताने पुढे येणार आहे.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनंतर शिवसेना वाईट अवस्थेतून जाताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रशासनावर ज्या पद्धतीने नियंत्रण किंवा अंकुश ठेवायला हवा होता, तो ठेवण्यात त्यांना यश आलेले दिसत नाही. त्यामुळेच बाळासाहेबांनी बसविलेली शिवसेनेची घडी हळूहळू विस्कळीत होत गेली आणि त्या शिवसेनेची ‘हास्यजत्रा’ झाली!”, असा धक्कादायक दावा वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुरेंद्र मुळीक यांनी या पुस्तकात केला आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांच्या विश्लेषणाला आधिक महत्त्व आहे. कारण आपल्या 35 वर्षांतील पत्रकारितेच्या कारकिर्दीतील 26 वर्षे त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “दैनिक सामना”च्या मुंबईतील प्रभादेवी मुख्यालयात काम केले आहे. मुळीक हे “सामना”तून सहसंपादक म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या “हास्यजत्रा” दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडणार आहे. विशेष म्हणजे मुळीक हे पहिल्या पिढीतील कट्टर शिवसैनिक आहेत. 1978 साली वयाच्या 18व्या वर्षी ते हायवे शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शाखा क्रमांक 82मधून शिवसेना सदस्य होते.
“सुडाचे राजकारण” या आगामी पुस्तकात सुरेंद्र मुळीक यांनी राजकारणातील अनेक धक्कादायक दावे केलेले आहेत. त्यातील काही बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिक म्हणून तळमळीतून आलेले आहेत, तर काही पत्रकार म्हणून तटस्थपणे नोंदविलेली निरीक्षणे आहेत. वृत्तमानस आणि डिंपल पब्लिकेशन्स संयुक्तपणे या पुस्तकाचे प्रकाशन करत आहेत. 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता वांद्रे पूर्व येथील आयईएस स्कूलमध्ये सुरेंद्र मुळीक लिखित “सुडाचे राजकारण” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि वसई-विरारचे महापौर अजीव पाटील प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. मुळीक सध्या दैनिक ‘वृत्तमानस’चे संपादक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुरेंद्र मुळीक यांनी हे पुस्तक संजय राऊत यांना अर्पण केले आहे. अर्पणपत्रिकेत त्यांनी म्हटलेय की, “‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या लढाऊपणाला सप्रेम अर्पण. हे पुस्तक अर्पण करण्यामागे तब्बल चाळीस वर्षे असलेल्या मैत्रीचा ओलावा आहे, प्रेम आहे, मला वेळोवेळी दिलेल्या आधाराचे हे पुस्तक प्रतीक आहे.”

शिवसेनेतील वशिलेबाजीवर प्रहार!
“सुडाचे राजकारण” या आगामी पुस्तकात “वशिलेबाजी थांबवा” असे एक प्रकरण आहे. त्यात त्यांनी म्हटलेय- घराणेशाहीला सर्वात पहिला जाहीरपणे विरोध केला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. नेहरू आणि गांधी घराण्याचा जाहीरपणे उल्लेख करून ही घराणेशाही थांबवा, असे आवाहनही देशातील बांधवांना बाळासाहेबांनी केले होते. बाळासाहेब असेही म्हणाले होते की, शिवसेनेत घराणेशाही चालणार नाही, चालवू देणार नाही. उद्धव आहे, राज आहे त्यांना मी तुमच्या बोडक्यावर बसविणार नाही. पण तुम्ही त्यांना स्वीकारले तर मी नाही म्हणणार नाही. त्यानुसार शिवसैनिकांनी उद्धव यांना स्वीकारले आणि राज ठाकरे यांनाही स्वीकारले होते. इथपर्यंत शिवसैनिकांना घराणेशाही मान्य होती. पण, जेव्हा ही घराणेशाही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उतरण्यास सुरुवात झाली तेथूनच सच्चा आणि कट्टर शिवसैनिक शिवसेनेपासून दूर होऊ लागला. आज भाजपा वगळता सर्वच पश्चात घराणेशाही दिसत आहे. शिवसेनेत ती अधिक दिसत आहे. शिवसेनेचा कुठलाही उमेदवार पाहा. एकदा उमेदवारी मिळाली की तो ती जागा सोडत नाही. महिला वॉर्ड झाला तर पत्नीला किंवा मुलीला उमेदवारी द्यायची. नाहीतर मुलगा किंवा भाऊ आहेच. पदे वाटण्याबाबत शिवसेनेत इतकी बजबजपुरी माजली आहे की, एकेका व्यक्तीला पाच-पाच पदे देण्यात आली आहेत आणि वर्षानुवर्षे या व्यक्ती पदे सोडण्यास तयार नाहीत. त्याउलट भाजपामध्ये पाहा. एक व्यक्ती एक पद व त्या पदावर फारफार दोन वर्षे. त्यात घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे राजकारणात येणाऱ्या तरुणांचा ओढा भाजपाकडे अधिक आहे. कारण तिथे पदाधिकारी होण्यास फारसा वेळ लागत नाही. शिवसेनेत तसे नाही. नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मुलांचे, पत्नीचे नंबर लागलेले असतात. युवासेनेचे उदाहरण घ्या. युवासेनेत जे पदावर आहेत त्यातील बहुतांश शिवसेना नेते, पदाधिकारी यांचीच मुले आहेत. त्याशिवाय वरुण सरदेसाई यांचा गट वेगळा आहेच. असे सर्वकाही सुरू आहे.
आदेश बांदेकर यांना शिवसैनिकांच्या उरावर बसवले!
एक साधे उदाहरण घ्या. 57 वर्षे झाली शिवसेनेला. पण मागील दशकाहून अधिक काळ जाहीर सभेसाठी शिवसेनेला एक साधा निवेदक मिळू शकत नाही, याचे सर्वात मोठे आश्चर्य वाटते. शिवसेनेशी कशाचाही संबंध नसताना आदेश बांदेकर थेट निवेदक म्हणून व्यासपीठावर उभे राहतात. त्यांना दादरसारख्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना डावलून उमेदवारी दिली जाते. शिवसैनिक संताप व्यक्त करतात, बांदेकर यांचा पराभव करतात. तरीही त्यांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्षपद दिले जाते. निवेदक म्हणून वारंवार उभे केले जाते. याचाच अर्थ उभ्या महाराष्ट्रात आणि जागतिक स्तरावरील या मुंबई शहरात एकही शिवसैनिक या कामाला पात्र नाही, असेच समजायला हवे. असे असेल तर तरुणांची फौज शिवसेनेत येणार कशी,_याचा ‘मातोश्री’ने गांभीर्याने विचार करायला हवा.

शिवसेनेच्या शाखेत जाणे केले बंद!
एकूणच सुरेंद्र मुळीक याचे “सुडाचे राजकारण” आधीच तापलेल्या महाराष्ट्रातील राजकारणाचा भडका उडवणार आहे. मुळीक यांनी माधव गडकरी, अरुण टिकेकर, ह. मो. मराठे, चंद्रशेखर वाघ आणि संजय राऊत यांच्याकडून पत्रकारितेचे धडे घेतले आहेत. त्यांच्यासह जवळून कामाचा अनुभव घेतला आहे. 1985च्या महापालिका निवडणुकीत सांताक्रूझ प्रभात कॉलनीसारख्या जनता पार्टी आणि पारंपरिक काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले. यात मुळीक यांची महत्त्वाची भूमिका होती. राऊत यांनी त्यांना दिलेला ‘उपशाखाप्रमुख करीन’, हा शब्द पाळला नाही. काँग्रेसमधून आलेल्या एका कमीशिक्षित व्यक्तीला राऊतांनी उपशाखाप्रमुख पदावर नेमणूक दिली. त्या दिवसापासून मुळीकांनी शिवसेनेच्या शाखेत जाणे बंद केले. मात्र, शिवसेनेत ते कार्यरत राहिले. प्रत्येक निवडणुकीतील प्रचारात आघाडीवर राहिले.
2005 साली वांद्रे येथे त्यांनी मुंबईतील शिक्षकांचा भव्य परिसंवाद मेळावा आयोजित केला होता. समारोपाला उद्धव ठाकरे, संजय राऊत होते. यानंतर मुळीक यांना ‘मातोश्री’वरून शिक्षक मतदारसंघाची तयारी करण्यास सांगितले गेले. पण, पुढे काही झालेच नाही! तत्पूर्वी, 1995 साली नारायण राणे यांनी सुरेंद्र मुळीक यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते, अशी चर्चा रंगली. इथेही त्यांच्या नशिबी निराशाच आली. बाकी, अनेक धक्कादायक खुलासे आणि तथ्यं पुस्तकात मांडण्यात आल्याचे समजते. एकूणच, सध्याचे राजकारण हे सुडाचे राजकारण बनल्याची खंत मुळीक यांनी या पुस्तकात वारंवार आणि तितक्याच तीव्रतेने व्यक्त केली आहे.
(सुरेंद्र मुळीक यांचा संपर्क क्रमांक: +91-8928055927)
(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- Vikrant@Journalist.Com +91-8007006862 (फक्त WA) )

