Homeबॅक पेजस्वाती मोहिते यांना...

स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार

प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला.

सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील विशेष मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण केंद्र चालविणाऱ्या ‘आई डे केयर’ या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांना सुप्रसिद्ध तंत्रज्ञ, लेखक, उद्योगरत्न व समाजसेवक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वाती मोहिते ह्यांचा हा प्रवास त्यांच्या मुलीच्या, चैतालीच्या जन्मापासून सुरु झाला. मुलगी पाच महिन्यांची असताना त्यांना कळले की ही मुलगी सामान्य नाही. तिला बौद्धिक दिव्यांगत्व आणि सेरेब्रल पाल्सी झालेले आहे. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर स्वाती मोहिते ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळेपासून एका विशेष मुलीचे पालक म्हणून स्वाती आणि महेंद्र मोहिते ह्यांची वाटचाल सुरु झाली. तिला थेरपीसाठी घेऊन जाणे, विशेष मुलांची शाळा शोधणे ही कामे सुरु झाली. परंतु पेणसारख्या छोट्या गावात विशेष मुलांची शाळा नव्हती. म्हणून स्वाती मोहिते ह्यांनी स्वत: विशेष शिक्षण देण्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चैतालीला घरीच शिकवण्यास प्रारंभ केला. गावातली आणखी ५-६ मुले त्यांच्याकडे शिकायला येऊ लागली. दरम्यान त्यांनी त्यांचे शिक्षणही पूर्ण केले.

२०११पर्यंत १५-२० विद्यार्थी येऊ लागले. विद्यार्थ्याची संख्या वाढत गेल्यामुळे, घराची जागा अपुरी पडायला लागली. नंतर त्यांनी ७ वेळा शाळेची जागा बदलली. वामन मिरवणकर ह्यांनी संस्थेची स्वत:ची जागा होईपर्यंत स्वत:चा बंगला विनामूल्य वापरण्यास दिला. त्यानंतर २०११मध्ये आई डे केअर संस्थेची स्थापना झाली. आज संस्था आजूबाजूच्या खेड्यातून आलेल्या, अत्यंत गरीब कुटुंबातील ७० विशेष मुलांना कोणतीही फी न आकारता प्रशिक्षण देत आहे. ह्यामध्ये त्यांचे शिक्षण, फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, अक्यूप्रेशरथेरपी, हे उपचार आणि त्यांना व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण, विनामूल्य बससेवा, युनिफोर्म, जेवणाची सोय पुरवते. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोयही करून देते.

केशव सृष्टीतर्फे दरवर्षी सामाजिक काम करणार्‍या व्यक्तीस, संस्थेस हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवड समितीतर्फे अनेक सामाजिक संस्थांची माहिती घेतली जाते. तसेच तिथे प्रत्यक्ष भेट देऊन ह्या पुरस्काराची निवड केली जाते. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा अमेया जाधव असून समितीमध्ये डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, शुभदा दांडेकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, रश्मी भातखळकर, राधा पेठे, अर्चना वाडे, सुनयना नटे, सुनिता तिवारी आणि सीमा उपाध्याय ह्यांचा समावेश आहे.

विशेष मुलांसाठी काम करणे खरेच खूप अवघड काम आहे. माझा स्वतःचा मुलगा ऑटीझम विकाराने ग्रस्त असल्याने मी हे सगळे फार जवळून अनुभवले आहे. त्यामुळे स्वाती मोहिते यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत अच्युत गोडबोले यांनी मोहिते यांच्या कार्याचा गौरव केला. वयाच्या 73व्या वर्षी मी एआय शिकलो आणि त्यावर चार पुस्तके लिहिली. पुढच्या दहा वर्षांत अनेक असाध्य रोगांवर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार उपलब्ध होतील याची मला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार अतुल भातखळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकटसमयी खचून न जाता स्वाती मोहिते या अनेक विशेष मुलांच्या आई झाल्या हे खरेच कौतुकास्पद आहे. अशा मुलांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या समस्या खूप गंभीर असतात. समाजामध्ये असलेल्या या समस्येकडे प्रत्येकाने सहानुभूतीने पाहिले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दात आमदार भातखळकर यांनी मोहिते यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच ‘आई डे केयर’ या संस्थेला एक लाख रुपयांचा धनादेश देत असल्याचे जाहीर केले.

केशवसृष्टी या संस्थेच्यावतीने समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांसाठी शाळा, प्रशिक्षण केंद्र, वनऔषधी शेती, गोशाळा, पर्यावरण आणि टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन, सौरऊर्जेवर आधारित सयंत्र अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. केशवसृष्टीचे अध्यक्ष डॉ. सतीश मोद, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, डॉ. अलका मांडके, डॉ. कविता रेगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वसुली एजंट गावात दिसले की झोडपून काढा!

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मायक्रोफायनान्स कंपनीकडून हत्त्या झाल्याचा आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्याकडे सत्ताधाऱ्यांचा पैसा आहे....

आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे धूमधडाक्यात प्रकाशन

महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे नुकतेच नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली 'प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा' या सोहळ्यात रसिक श्रोते आणि वाचकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन...

५ टक्के महिलांच्या स्तनात आढळल्या लक्षणीय गाठी!

एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या...
Skip to content