विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची पदकाची पाटी पुन्हा एकदा कोरीच राहिली. १९७५ साली अजितपाल सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने मलेशियात झालेली ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा निर्णायक सामन्यात भारताने पाकिस्तानवर २-१ गोलांनी निसटता विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत तब्बल ५० वर्षांचा मोठा कालावधी उलटून गेला आहे. पण या स्पर्धेत आजतागायत भारतीय हॉकी संघ अव्वल ४ क्रमांकातदेखील आपले स्थान टिकवून ठेवू शकला नाही, ही भारतीय हॉकीची खरी शोकांतिका आहे. यंदा हॉलंडमधील ऑमल्टलवीन येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा आठवा क्रमांक लागला. स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील लढतीत जेमतेम कसेबसे दोन विजय मिळवून भारताने आपला दुसरा टप्प्यातील प्रवेश पक्का केला. पहिल्या सामन्यात दुबळ्या वेल्सला ३-१ गोलांनी नमवण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लढतीत बलाढ्य इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ करुनदेखील शेवटच्या काही मिनिटांत खराब खेळ करुन भारताने इंग्लंडला विजय देऊन टाकला. या सामन्यात इंग्लंडने अखेर ४-२ गोलांनी बाजी मारली. त्यामुळे आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.
या पराभवामुळे विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची विजयाची पाटी कोरीच राहिली. या पराभवामुळे इंग्लंडविरुद्ध भारतीय विजयाचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. शेवटच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुसऱ्या टप्यात प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक होता. हा सामना भारताने ५-३ गोलांनी जिंकला खरा, पण विजयात सफाईदारपणा नव्हता. पाकिस्तान संघ आता पहिल्यासारखा ताकदवान राहिलेला नाही. त्यामुळे या विजयाला फारसा अर्थ नव्हता. पहिल्या टप्प्यातील भारतीय संघाची सुमार कामगिरी पाहता दुसऱ्या टप्प्यात भारतीय संघाचे काही खरे नाही, याची प्रचिती आली होती. कारण, दुसऱ्या टप्प्यात भारतीय संघाला बलाढ्य हॉलंड, अर्जेटिना या दोन दादा संघाशी दोन हात करायचे होते. या दोघांना पराभूत केल्यास भारताला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार होती. पण ते होणे शक्य नव्हते. कारण गेल्या बऱ्याच वर्षांत भारत या दोन संघाना नमवू शकला नव्हता. तेच चित्र पुन्हा एकदा बघायला मिळाले. हॉलंड, अर्जेंटिना या दोघांकडून पराभूत झाल्यामुळे भारताचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. या दोन पराभवांमुळे पुन्हा एकदा या स्पर्धेत भारतीय संघाची पदकाची पाटी कोरीच राहिली.

भारताला किमान पहिल्या सहा संघात स्थान मिळेल अशी आशा होती. पण भारतीय हॉकी संघाने तमाम लाखो भारतीय हॉकी चाहत्यांची चांगलीच निराशा केली. भारताचा या स्पर्धेत आठवा क्रमांक लागला. सातव्या, आठव्या क्रमांकाच्या सामन्यात बलवान बेल्जियमने भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. दुबळा बचाव अथवा दुबळी बचावफळी हेच भारतीय संघाच्या पराभवाचे मोठे कारण होते. तसेच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यातही भारतीय संघ कमी पडला. आक्रमण आणि बचाव, या खेळातील दोन मुख्य अंगात भारतीय संघाने कच खाली. अचूक नेमबाजीचा अभाव भारतीय संघात जाणवला. गोल करण्याच्या मिळालेल्या संधीचा लाभ आघाडीच्या फळीला फारसा घेता आला नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या मैदानी गोलांची संख्या खूप कमी झाली.
कर्णधार हरप्रीत सिंगवर भारत जास्त अवलंबून राहिला. भारतीय संघात योग्य रणनीती नव्हती. त्यामुळे काहीवेळा तर खेळाडू गोंधळलेले दिसले. मनप्रीत, मनदीप हे संघातील ज्येष्ठ खेळाडू आपली चमक दाखवू शकले नाहीत. स्पर्धेपूर्वी स्वित्झर्लंड येथे संघासाठी दहा दिवसाचा सराववर्गदेखील ठेवला होता. पण त्याचाही फारसा फायदा भारतीय संघाला झाला नाही. गेली बरीच वर्षे भारतीय संघात नव्या खेळाडूंना संधी दिली गेली नाही. तेच-तेच खेळाडू भारतासाठी खेळताना दिसत आहेत. या स्पर्धेअगोदर प्रो लिग स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेतदेखील भारताची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. त्या स्पर्धेतदेखील भारताचा आठवा क्रमांक लागला होता. तेव्हाच भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली होती. पण हॉकी इंडिया, संघ व्यवस्थापन आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतदेखील भारतीय संघाची आठव्या स्थानावर घसरगुंडी झाली. ऑलिंपिक स्पर्धेनंतर नव्याने संघबांधणीची गरज होती. पण त्याकडे अद्याप काणाडोळा केला गेलाय हेच खरे. या पराभवाची जबाबदारी कप्तान हरमनप्रीत सिंग आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक फुल्टन यांनी घ्यायला हवी. त्यांनी पराभवाची कारणमिमांसा करायला हवी. आता लवकरच जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत तरी भारतीय संघ सुवर्णपदक जिंकून २०२८च्या ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट पक्के करेल, अशी आशा करुया.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

