सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करून प्रवाशांच्या हालात भर का घालत आहेत, असा लाखो ठाणेकरांचा सवाल आहे. ठाणे शहराच्या जवळजवळ प्रत्येक लहानमोठ्या गल्लीत जोरशोरसे गणपती उत्सव साजरा केला जात असताना ठाणे स्थानकाला वेठीस धरण्याचा हट्ट गणेशभक्त का करीत आहेत, असा सर्वसामान्य ठाणेकरांचा प्रश्न आहे. महापालिका प्रशासन, सरकारी यंत्रणा, पोलीस व भाराभर असलेल्या लोकप्रतिनिधींनी ठाणे रेल्वेस्थानक व तेथील परिसराला नको इतके ओंगळवाणे स्वरूप दिले असून ते सुधारण्याऐवजी प्रवासी अधिक गर्दी व चेंगराचेंगरीने गुदमरून हवालदिल व्हावेत, असा तर आयोजकांचा होरा नाही ना? प्रत्येक गल्लीत व लाखो घरांत गणपती आणले जात असताना स्थानकात आणखी एक गणपती असा हट्ट कशाला?
चालायला जागा नसते
ठाणे स्थानकात पाऊल टाकताच कासारवडवलीला जाणारे रिक्षावाले ‘वडवली-वडवली’ असे ओरडणारे.. त्यांच्याआधी ‘वागळे वागळे’ ओरडणारे तर सॅटिस पुलाजवळ येऊन ओरडणारे घोडबंदर घोडबंदर, व भिवंडी भिवंडी ओरडून साद घालणारे… ही सर्व मंडळी प्रवाशांना पीडत असतातच. त्यातच स्वस्त सिमकार्ड देणारे, काही बँकाची टेबले, महिलांसाठी सुशोभित

प्रसाधनगृह, शेंगवाले, ‘आपके पैर मे कुछ गडबड है..’ असं सांगणारे आयुर्वेदिक भोंदू, अशा शेकडो नमुनेदार माणसांना दाखवण्यासाठी का गणरायांना येथे बसवले? असले सर्व किळसवाणे प्रकार गणरायाला दाखवायलाच हवेत का? गणरायाच काय पण, प्रत्येक राजकीय पक्षही रेल्वेस्थानक परिसर ही हक्काची जागा असल्याप्रमाणे मनाला येईल त्याप्रमाणे या जागेचा वापर करत आहे. अनेक प्रभावशाली नेत्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रमही येथेच उरकले जातात.
भारतरत्न डॉ. आंबेडकरही झाले खजिल
ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील सर्व धिंगाणा खाली मान घालून पाहत असतात. या महामानवाची मान भले वाकलेली दिसत नसेल पण आपल्या बाळांच्या कर्तृत्त्वाने मात्र ते नक्कीच खजिल झाले असतील.. देशासाठी नियमावली तयार करणाऱ्या या महामानवाला आपल्या डोळ्यादेखत सर्व नियम धाब्यावर बसलेले पाहवे लागत आहे, यासारखे दुर्दैव नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली. आयोजकांना उत्सव करायचाच असेल तर मंडप छोटा करून पूजाअर्चा करण्यापूरताच उत्सव सीमित केला जावा. लाऊडस्पीकर्सचा गोंगाटही नसावा. गणपती उत्सवाला विरोध नाही. पण, गणरायालाही ही गर्दी व धावपळ सहन होणार नाही, या हेतूनेच काळजी व्यक्त केली आहे. बाकी सर्व समजण्यास कार्यकर्ते समजूतदार आहेतच. बाप्पा मोरयाss
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

