Homeन्यूज अँड व्ह्यूजहेतूपुरस्सर धूळ खात...

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच ‘लोकसवांद’मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही. त्यात मुंबईतील प्रशासन, नागरिकांच्या तर अपेक्षाच अपेक्षा… या अपेक्षा पूर्ण करण्यात प्रशासनाची त्रेधातिरपीटच… जनतेला झुकते माप दिले तर नगरसेवक नामक लोकप्रतिनिधी डोळे वटारतात. नगरसेवकांचे ऐकले तर नागरिक नाराज होतात! (दुसरं काय करणार, त्यांच्या हातात तसं काहीच नसतं..) आणि इतक्या विशालकाय महानगरीचे आयुक्तपद म्हणजे जणू काटेरी मुकुटच! कोणाकोणाला सांभाळायचे… यादी संपतच नाही. बरोबरचे अधिकारी, दररोज पाला पडणाऱ्या नगरसेवक, महापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष, आमदार, खासदार… हे तर रोजचेच झाले. नगरविकास मंत्री, राज्यमंत्री, मंत्रालयातील विविध सचिव.. जीव भंडावून जात असेल नाही. या सर्वाना तोंड देऊन थोडी विश्रांती घेत असतानाच खुद्द मुख्यमंत्र्यांचाच फोन. म्हणजे झालेच विश्रांतीचे ‘खोबरेच’! (या यादीत मंत्र्यांचे पीए, लोकप्रतिनिधींचे पीए नाहीत.) खरंतर इतक्या सर्वांना तोंड देण्याची गरज नसतेच. प्रशासनात विकेंद्रीकरणाबाबत बेंबीच्या देठापासून बोलले जाते. पण त्या-त्या स्तरावर कधीच निर्णय घेतला जात नाही. निर्णय घेण्याचे काम प्रमुखांवरच सोपवलेले असल्याने नागरिकांपासून तो अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वजण प्रमुखांचेच डोकं खातात.

प्रकल्पांची माहिती नव्हे, जंत्रीच!

लोकसंवादात आयुक्त महोदयानी शहरात येऊ घातलेल्या काही योजनांची व सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. शहरात कायकाय होणार याची कल्पना देणे गरजेचे आहे. मोठ्या तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहराचा कसा विकास केला जात आहे, हे कळण्याचा अधिकार जनतेला निश्चितच आहे, यात वाद नाही. मुंबईतील रस्ते आता वाढू शकत नाहीत तसेच रस्त्यांचे सिमेंटीकरण पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र जनतेला सध्या किंवा गेल्या अनेक वर्षांपासून जो खड्ड्यांचा प्रश्न भेडसावत आहे त्याबाबत आयुक्त महोदयांनी एकही शब्द उच्चारला नसल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबई शहर वा दोन्ही उपगरांत सिमेंटच्या रस्त्यांवरही खड्डे दिसून येत आहेत आणि आम जनतेला त्याची नको तेथे जाणीवही होत असते. लांब कशाला सीएसटीएम रेल्वेस्थानकातून मुख्य टपाल कार्यालयाकडे जात असतानाचा छोटासाच रस्ता घ्या, किंवा त्याच्यासमोर असलेल्या बोरा बझारचा रस्ता घ्या, इतकेही लांब नको तुमच्या कार्यालयासमोरील मेट्रो स्थानकाची आझाद मैदानाकडील बाजू पाहा. उंचसखल रस्ता तेथेही दिसेल. मॅकडोनाल्डच्या बाजूचा पदपथ. थेट सिद्धार्थ महाविद्यालयापर्यंत एकदा पायी चालून पाहाच. त्या विभाग अधिकाऱ्यांना बोलावून अंगठे धरायला लावले पाहिजेत, अशा प्रकारचे आहेत, असे तुम्हालाही वाटेल. ही सर्व उदाहरणे मी मुद्दाम दिली. कारण ती मुख्यालयाच्या आसपासची आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील रस्ते ठीक आहेत. पण समोरच्या बाजूच्या गल्लीतील रस्त्यांची स्थिती डोळ्याखालून घाला. पश्चिम आणि पूर्व उपनगरातील मुख्य रस्ते म्हणजे स्वामी विवेकानंद मार्ग व लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर काही भाग खरोखरच चांगला आहे. मात्र कुर्ला, भांडुप, कांजूर तसेच खार, सांताक्रुज, गोरेगाव, मालाड, दहिसर आदी भागातील जनता आजही चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई

पाणीपुरवठ्याकडे लक्ष हवेच

मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा समाधानकारक आहे, पुरेसा नाही हे आपणही मान्य कराल! गिरगाव, दादर, परळ, भोईवाडा, शिवडी, कुलाब्यातील जुन्या चाळी, मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूरचा काही भाग, चुनाभट्टी आदी अनेक भागात पाण्याचा दुष्काळ असतो. टँकरवाले मनमानी भाव सांगून या गरिबांचे जिणे त्रासदायक करत असतात. खरंतर अनेक पॉश भागातही पाणीटंचाई असते. सरकार वा पालिकेतील सत्तारूढ पक्ष मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवू असे गाजर दाखवत असतात. ती त्यांची राजकीय निकड असेलही. पण मुंबईकरांना 24 तास सोडा, दोनअडीच तास पाणी आले तरी ते दुवा देतील, अशी चांगली माणसं आहेत.

बेस्ट सुधारणेला बराच वाव

सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेबाबतही आपण बोललात. विशेषतः बेस्टबाबत आपण नवीन बसेस घेण्याबाबत सूतोवाच केलात, हे चांगलेच झाले. परंतु नवीन बसेस येतील तेव्हा येऊद्यात, पण तोपर्यंत काही आगारांत पडून असलेल्या मिडी बसेसना आपण प्रथम जीवदान द्या. कारण, पालिकेच्या पैशांनी या बसेस खरेदी केलेल्या असून त्या कुणा एका अधिकाऱ्याच्या हट्टापायी धूळ खात पडलेल्या आहेत. याची संख्या सुमारे 100 तरी असावी. दुर्गम आणि अरुंद रस्त्यांवर या गाड्या चालवता येतील व प्रवाशांनाही दिलासा मिळेल! तसेच उपनगरातील रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या बसस्थानकपरिसरात फेरीवाल्यांना बसूच देऊ नका. कारण, येथे जे बस अपघात झालेत त्याला कारण हे फेरीवालेच आहेत. फेरीवाल्यांभोवती गर्दी, हॉर्न देऊनही कोणी हटत नाही, उलट चालकाच्याच अंगावर जातात. आणि फेरीवाले हटवले की कोर्टात बाजू मांडण्यासाठी तगडे वकील नेमा. पालिकेचा विधि विभाग एकदम कंडम आहे. मेट्रोचे जाळे अधिक घट्ट होत आहे, हे चांगलेच आहे. तेहीही स्थानकात उतरल्यानंतर रिक्षा वा बसेस लवकर मिळत नाहीत.

सुसह्य झाले तरी दुवा

मुंबई महानगरातील जीवन खडतर आहे याची नागरिकांना पूर्ण जाणीव आहे. जादूच्या कांडीसारखे लगेच काही होणार नाही हे त्यांनाही समजते. पण त्यातही जगणे काहीसे सुसह्य व्हावे, अशी त्यांची अपेक्षा राहणारच. त्यात चूक काही नाही. रस्त्यावरील खड्डे कमी व्हावेत, बसेसचा वेटिंग पिरियड कमी व्हावा, पाणी नियमित यावे, कचरा रोज उचलला जावा, इतक्या छोट्या अपेक्षा असतात, सर्वसामान्य जनतेच्या..

“कधी कौतुक, कधी तक्रार चालूच असते रोजचीच

पण तुझ्याविना अडकलेलं चक्र, या मायानगरी मुंबईचे

सलाम तुझ्या या कष्टाला

सलाम तुझ्या या सेवेला

तुझ्या अखंड कारभाराला

रंग येतो या मुंबईला” (अनामिक)

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....
Skip to content