सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी बेरोजगार आणि अहोरात्र सोशल मीडियावर पडललेल्या तरूणांना झुरळ, म्हणून संबोधल्यावर अमेरिकेत बोस्टनमधे शिकत असलेल्या अभिजीत दीपकेने कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली. इंस्टाग्रामवर अभिजीतच्या घोषणेला देशातून तरूणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अडिच कोटी फॉलोअर्स भेटले. नीट परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी अभिजीतने केली. बावीस लाख विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक त्रास झाला, नैराश्यातून २४ मुलांनी आत्महत्त्या केल्या, गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या. त्याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. कोणतेही संघटन नसलेली आणि सोशल मीडियावर स्थापन झालेली पार्टी काय करू शकणार, अशा भ्रमात मोदी सरकार होते. सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणाला ठेवायचे व कोणाला हटवायचे हे तुम्ही कोण सांगणार, अशी मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून आली. जंतरमंतरवर आंदोलन चालू असताना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची भाजपाने यथेच्छ टिंगलटवाळी केली.
मोदी सरकार सत्तेवरून उलथवायला निघालेत, त्यांना देशात अराजक माजवायचे आहे, आंदोलनात गुंड व दहशतवादी घुसले आहेत, पाकिस्तानमधून त्यांना रसद पुरवली जात आहे, आंदोलनामागे चीन व अमेरिकेचा हात आहे, अशा वाट्टेल त्या कंड्या सत्ताधारी पक्षातून आणि गोदी मीडियातून पिकवल्या गेल्या. जंतरमंतरवरील आंदोलन बदनाम करण्याचा, भरपूर प्रयत्न झाला. लडाखचे नेते सोनम वांगचूक यांना भल्या पहाटे पांढऱ्या चादरीत गुंडाळून उचलून नेण्यात आले. संसद भवनवर मोर्चा काढणाऱ्या मुला मुलींना खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी बदडण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला. गणवेशातील पोलिसांनी मुलांच्या मोर्चावर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. मुलींचे कपडे फाडले, त्यांचा विनयभंग झाला. परस्परांवर दगडफेक झाली. जंतरमंतरभोवती व संसद मार्गावर लावलेल्या बॅरीकेट्समध्ये वीजेचे करंट सोडण्यात आले. जंतरमंतरवर जेवण-खाण्याची रसद तोडण्याचा प्रयत्न झाला. हॉटेल व रेस्टॉरंट मालकांना धमकविण्यात आले. जंतरमंतर व संसद भवनकडे येणारे रस्ते बंद केले गेले. अठरा मेट्रो स्टेशन्स बंद ठेवली. आंदोलकांचा कोणाशीही संवाद होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली. पंधरा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी हे जणू देशद्रोही आहेत, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न झाला.

दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या निर्घृण लाठीहल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात सरकारच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो युवक व विद्यार्थ्यांचे जत्थेच्या जत्थे मिळेल त्या मार्गाने व मिळेल त्या वाहनाने दिल्लीला निघाले. चलो संसद मोर्चात तर एक लाखावर युवक सामील झाले. संपूर्ण देशात सरकारविरोधात उस्फूर्त जनआंदोलन उभे राहिले. दिल्ली, मुंबई, पुणे, नागूपर, छत्रपती संभाजीनगरसह देशातील दिडशे शहरांत तरूणाई हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी दाखवलेली हिम्मत, ताकद आणि देशभर पेटलेला असंतोषाचा वणवा, यामुळे ३६ दिवसानंतर मोदी सरकारचा अहंकार गळून पडला. जेन झीपुढे सरकारला झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. युवाशक्तीची अभेद्य एकजूट व देशभरात झालेले शक्तीप्रदर्शन यापुढे सरकारला नमावे लागले. गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारवर प्रथमच एवढी मोठी नामुष्की आली. कोटी कोटी उधळून सत्ता मिळवली, खोकी देऊन विरोधी पक्षात तोडफोड केली. इडी, सीबीआय, इनकम टॅक्ससारख्या यंत्रणा वापरून विरोधी पक्षांचा आवाज दाबला. सतत इव्हेंट व मार्केटिंग करून स्वत:ची प्रतिमा उजळविण्याचे काम केले, त्यावर जेन झीच्या आंदोलनाने पाणी ओतले. तुम्ही देशाचे सेवक आहात, हुकूमशहा नाही, असा संदेश या आंदोलनाने सरकारला दिला आहे.
या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर आमानुष लाठीमार केला. अनेकांची डोकी फुटली. चेहरे रक्तबंबाळ झाले. पाठ, कंबर सुजली, शरीरावर जखमा झाल्या. त्याला कोण जबाबदार? दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत. केंद्र सरकारला त्याची जबाबदारी झटकटा येणार नाही. कोवळ्या मुलांच्या मोर्चावर लाठीमार करताना थेट खिळे ठोकलेल्या लाठया का वापरल्या? पाण्याचे फवारे का सोडले नाहीत? पेलेट गन्सचा वापर करायचा आदेश कोणी दिला? साध्या वेशातील पोलिसांना मुलांवर लाठ्या चालविण्याचे अधिकार कोणी दिले? अनेक पोलिसांच्या गणवेषावर नावाची पट्टीच नव्हती, हे कशासाठी? ज्या पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले व त्यांच्या श्रीमुखात लगावली, त्यांच्यावर कारवाई काय होणार? आंदोलकांना पांगविण्यासाठी किती व कुठे-कुठे अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या? पोलिसांच्या क्रूर कारवाईची न्यायालयीन चौकशी होईल का?

वीस जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला दिल्लीतून व देशातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल अशी सरकारला कल्पना नव्हती. आंदोलकांच्या हाती केवळ संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व तिरंगा ध्वज होता. याच मैदानात सोनम वांगचूक यांनी २८ जूनला उपोषण सुरू केल्याने जेन झी आंदोलनाला नैतिक बळ प्राप्त झाले. उपोषणाने सोनम यांची प्रकृती खालावू लागली व जंतरमंतरकडे गर्दीचा ओघ वाढू लागला. काँग्रेस, आप, उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), सपा, आदी विरोधी पक्षांचे नेते येऊ लागले. नंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांची रांग लागली. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री थलपती विजय, मेहबुबा मुफ्ती, डिम्पल यादव असे असंख्य नेते आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, आयर्लंड. फ्रान्स, कॅनडा, अमेरिका आदी देशांत भारतीय विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विदेशातील मीडियामध्येही भारतातील जेन झी आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळू लागली. आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या कक्षेबाहेर गेले. सरकारविरोधात सर्वत्र उग्र प्रदर्शन सुरू झाले.
राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले व शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची व मोदी-शाह यांच्या माफीनाम्याची मागणी चालू ठेवली. सोनम वांगचूक यांचे उपोषण मध्यरात्री का सोडविण्यात आले? त्यांचे उपोषण सोडवायला दोन मंत्री इस्पितळात का गेले? पंतप्रधानांनी व्हिडिओवरून युवा पिढीविषयी आपणास खूप चिंता वाटते हे मध्यरात्रीनंतर का सांगावे? वांगचूक यांच्या पत्नीने राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करायला नको होते हे सांगण्याची गरज काय? सोनम वांगचूक व दीपके यांच्यात मतभेद व्हावेत व अंतर पडावे यासाठी सरकारने काळजीपूर्वक प्रयत्न केले. भाजपाशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनांची मदत घेऊन आंदोलनात फूट पाडता येईल का. असाही प्रयत्न झाला. आंदोलक मुले- मुली सुशिक्षित होत्या. त्यांचे आईवडिल, आजीआजोबाही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर आले होते. त्यांच्या घोषणा, पोस्टर्स कल्पक होते. सोशल मीडयाचा वापर करण्यात सारे माहिर होते. ज्या पोलिसांनी ला्ठ्या मारल्या, त्यांचे दुसऱ्या दिवशी त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

आम्ही एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर थांबणार नाही. पोलिसांचाही हिशेब केला जाईल, असे क्रॉक्रोच जनता पार्टीने जाहीर केले आहे. अमानुष वागणूक देणाऱ्या पोलिसांचे व्हिडिओ पुरावे म्हणून तयार ठेवले आहेत. पेपरफुटीनंतर ज्या मुलांनी आत्महत्त्या केल्या, त्यांच्या परिवाराला एक कोटी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे सरकारने कबूल केले आहे. गेल्या बारा वर्षांत विरोधी पक्षांना जे जमले नाही ते ‘जेन झी’ने करून दाखवले. पोलीस, इडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही, हे दाखवून दिले. झुरळांची झुंड सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकते हे दिसले. अभिजीत दीपके याने म्हटले आहे- लोकशाहीची पहाट झाली आहे. देशातील जनता जागी झाली आहे. ये तो पहिला विकेट है, यहीं नहीं रूकेंगे, अभी तो बस शुरूवात हुई है…
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

