तब्बल १८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर बेंगळुरु संघाला गतवर्षी पहिल्यांदाच आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळाले होते. त्या विजयाची अपेक्षेप्रमाणे पुनरावृत्ती करण्यात यंदादेखील बेंगळुरु संघ यशस्वी ठरला. जेतेपदाच्या अंतिम सामन्यात काहीशा एकतर्फी लढतीत बेंगळुरुने गुजरातचा ५ गडी आणि २ षटके राखुन आरामात पराभव केला. अंतिम सामन्यात गुजरातची चांगली फाॅर्मात असलेली कप्तान गिल आणि साई सुदर्शन जोडी अवघ्या २६ धावातच माघारी परतली. तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. विजयासाठी अवघे १५६ धावांचे लक्ष्य बेंगळुरु संघासमोर होते. माजी कप्तान विराटने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी करुन बेंगळुरुची नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. भुवनेश्वर कुमार, हेजलवुड, दार यांनी सुरेख मारा करुन गुजरातला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. नाणेफेक जिंकून बेंगळुरु कर्णधार रजत पाटीदारने गुजरातला पहिली फलदाजी देण्याचा धोका पत्करला. पण त्याच्या गोलदाजांनी झकास मारा करुन गुजरातला मोठ्या धावसंख्येपासून दूर ठेवत कप्तानाचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे गिलच्या गुजरात संघाचे स्वप्न भंग पावले.
पहिल्या “क्वालीफायर” लढतीत झालेल्या पराभवाचा बदलादेखील गुजरात संघाला घेता आला नाही. गतवर्षी अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम लढतीत बेंगळुरुने पंजाबला नमवून पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. मोदी स्टेडियम बेंगळुरु संघासाठी परत दुसऱ्यांदा “लकी” ठरले. यंदा उभय संघात झालेल्या एकूण ४ सामन्यात बेंगळुरुने ३ सामन्यात बाजी मारुन आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. आतापर्यत दोन्ही संघात झालेल्या १०पैकी ६ सामन्यात बेंगळुरुने ४ लढतीत गुजरातवर विजय मिळवला. अंतिम सामन्यापूर्वी कागदावर बेंगळुरुचेच पारडे जड दिसत होते. बहुतेक क्रिकेट समीक्षकांनी, जाणकारांनी बेंगळुरु संघालाच जेतेपदाची पसंती दिली होती. कारण खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये बेंगळुरु संघ नक्कीच गुजरातपेक्षा उजवा होता. त्यामुळे जाणकारांचा अंदाज बेंगळुरु संघाने सार्थ ठरवत आपल्या कोट्यवधी चाहत्यांना निराश केले नाही. मुंबई, चेन्नईप्रमाणे बेंगळुरुने आता सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत योगायोग म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बेंगळुरु, गुजरात याच संघांनी अनुक्रमे अव्वल दोन क्रमांक मिळवले. दोघांनी १४ सामन्यांत ९ विजय मिळवले, तर ५ लढतीत मात्र दोघांना हार खावी लागली. दोघांचे समान गुण झाले, पण सरस धावगतीच्या जोरावर बेंगळुरुने पहिला क्रमांक मिळवला तसेच स्पर्धेच्या “प्ले ऑफ”मध्ये प्रवेश करणारा बेंगळुरु पहिला संघ ठरला.
बेंगळुरुला पहिल्या टप्प्यात राजस्थान, दिल्ली, लखनौ, गुजरात, हैद्राबाद यांचाकडून हार खावी लागली. आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईला मात्र बेंगळुरुने दोन्ही सामन्यात नमवले. २०११पासुन या स्पर्धेत प्ले ऑफ सामने सुरु झाले. योगायोग म्हणजे आतापैकी १६ वेळा “क्वालीफायर वन”च्या लढतीमध्ये पहिला सामना जिंकणाऱ्या संघाने तब्बल १३ वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. एका वेळेला “चोकर्स”चा शिक्का बसलेल्या बेंगळुरु संघाने तो शिक्का आता पुसून टाकण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांचा महिला संघदेखील गेली २ वर्षे आयपीएलविजेता आहे. बेंगळुरुची यंदाची एकूण सातत्यपूर्ण कामगिरी पाहता हा संघ पुन्हा जेतेपदाचा योग्य दावेदार होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्याची फलंदाजी सखोल होती, तर गोलंदाजीच्या आक्रमणात एक वेगळीच धार होती. धावांचा यशस्वी पाठलाग त्यांनी बऱ्याच सामन्यात केला. त्यामध्ये विराटचे योगदान मोठे होते. “चेस मास्टर” हा आपला लौकिक विराटने यंदादेखील कायम ठेवला. बेंगळुरु संघाचा हा विजय सांघिक प्रयत्नांचा होता. योग्य रणनीती आणि रजतचे संयमी नेतृत्व याचा सुरेख मिलाफ जेतेपदात जुळून आला. रजतला माजी कर्णधार विराटची भक्कम साथ मिळाली.

हे जेतेपद बेंगळुरुचा आक्रमक खेळाचा मंत्र बदलेल्या मानसिकतेचा आणि विराट सांघिक ताकदीचा विराट अविष्कार आहे असे म्हटले तरी चालेल. ५व्यांदा अंतिम फेरी गाठून दोन अजिंक्यपदे ही संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पोचपावती आहे. यंदा सुरवातीपासूनच बेंगळुरु संघाने जेतेपदाला साजेसा खेळ केला. यंदा एक वेगळाच “स्पार्क” बेंगळुरु संघात दिसला. जुन्या, नव्या खेळाडूंनी आपली चागली छाप पाडून संघाला जेतेपद मिळवून देण्यात हातभार लावला. रजतला फलंदाजीत छान सूर गवसला. त्याने ५ वर्षांत पहिल्यांदा ५००पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला. बुजूर्ग वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २८ बळी घेऊन आपली या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याला ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज हेजलवुडची चांगली साथ मिळाली. संघाचे मुख्य प्रशिक्षक ॲन्डी फ्लाॅवर आणि क्रिकेटचे संचालक मो बोबॅट या दोघांचादेखील बेंगळुरुच्या विजयात मोठा वाटा आहे. या दोघांनी खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. खेळाडूंना नवी ऊर्जा दिली. तुम्ही विजेते होऊ शकता हा मूलमंत्र दिला.
यंदाच्या या स्पर्धेवर राजस्थानचा सलामीचा युवा डावखुरा फलंदाज १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या जबरदस्त फलंदाजीची छाप पाडली. त्यानेच स्पर्धेत सर्वात जास्त धावा केल्या. “प्ले ऑफ”मधील त्याच्या दोन खेळी सर्वांची दाद घेऊन गेल्या. भविष्यात वैभवच्या बॅटमधून असाच धावांचा पाऊस पडतो का ते बघायचे. गुजरातचा रबाडाने सर्वात जास्त २९ बळी या स्पर्धेत घेतले. भारताचा माजी कर्णधार ४४ वर्षीय महेंद्र सिंग धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली. त्याचा फटका चेन्नई संघाला बसला. एका जमान्यात दादा असलेला संघ यंदा गुणतालिकेत ८व्या क्रमाकावर फेकला गेला. त्यांना अवघे ६ सामनेच जिंकता आले. दुसरा दादा संघ मुंबईचीदेखील धुळधाण उडाली. त्यांना अवघे ४ सामने जिंकता आले. गुणतालिकेत मुंबई संघ ९व्या स्थानावर राहिला. या दोन्ही संघानी भविष्यात नव्याने संघ बांधण्याची गरज आहे. तेव्हाच हे संघ आपले जुने वैभव परत मिळवू शकतील. यंदा विराटने ६७५ धावा फटकावून आणि भुवनेश्वर कुमारने २८ बळी घेऊन आपण अद्याप संपलो नसल्याचे दाखवून दिले.
लखनौ संघाचे कप्तानपद ऋषभ पंतने सोडले. पंतचा संघ १०व्या क्रमांकावर फेकला गेला. १४ सामन्यांत पंतला अवघ्या ३१२ धावा करता आल्या. कॅमरुन ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपये देऊन कोलकाता संघाने घेतले होते. यंदाचा या स्पर्धेतील तो सर्वात महागडा खेळाडू होता. पण तो फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने ३२२ धावा केल्या. अवघे ७ बळी ग्रीनला घेता आले. कार्तिक शर्मा, आयुष म्हात्रे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे या नवोदितांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. आयुषला दुखापतीमुळे मात्र मध्येच स्पर्धा सोडावी लागली. बुमराह, गायकवाड, रिंकू सिंह, दुबे, पुरन, मार्करम, स्टाइनिस, मिलर, हार्दिक पांड्या, तेवातिया, हेटमायर, नारायण, चहल, अक्षर पटेल, बिश्नोई, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, टी.नटराजन हे आयपीएल स्पर्धा गाजवणारे खेळाडू यंदा फ्लाॅप ठरले. बुमराहला तर यंदा या स्पर्धेत पहिला बळी घेण्यासाठी चक्क ६ सामन्यांची वाट पाहवी लागली.
साखळी लढतीमध्ये बेंगळुरू, गुजरात, हैद्राबाद यांनी शेवटचा सामना होण्यापूर्वी आपला “प्ले ऑफ”मधील प्रवेश पक्का केला होता. परंतु चौथ्या स्थानासाठी राजस्थान, कोलकाता, पंजाब या तीन संघात चुरस होती. परंतु राजस्थानने आपल्या शेवटच्या लढतीत यजमान मुंबईचा पराभव करून कोलकाता, पंजाबला मागे टाकून “प्ले ऑफ”मधील प्रवेश पक्का केला. राजस्थानच्या गोलंदाजांनी या महत्त्वपूर्ण लढतीत त्यांच्या विजयास मोठा हातभार लावला. अर्चरने ३ तर बर्जर, ब्रीजेश शर्मा, पुंजाने प्रत्येकी २ बळी घेऊन मुंबईला विजयापासून दूर ठेवले. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकंदरच संपूर्ण भारतात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. परंतु यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मात्र धुवांधार धावांचा पाऊस बरसला. विक्रमी धावसंख्येची, विक्रमी शतकांची, विक्रमी चौकार-षटकारांची नोंद झाली. तसेच तब्बल १७ वेळा धावफलकावर द्विशतकी धावसंख्येची नोंद झाली. षटकामागे ९.८८च्या धावगतीने २७४५० धावा झाल्या. आयपीएलच्या एकाच मोसमातील ही सर्वोत्तम धावगती आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत बेंगळुरू संघ जेतेपदाची “हॅटट्रिक” करणार का, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असेल.

