चित्रपट निर्मितीत सगळ्यात अवघड चरीत्रपट. मग तो चित्रपट रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (१९८३) असेल तर त्यावरच्या प्रचंड संशोधन, अभ्यास, चर्चा, मेहनत, खर्च यावर आणखी एक चित्रपट निर्माण होईल. तसा अतिशय प्रभावी चरीत्रपट तो एकच. तसं पाहिलं तर अनेक भाषेतील अनेकतरी चरित्रपट आपल्या देशात आले. त्याचे तपशील, माहिती, गोष्टी, किस्से, संदर्भ अनेक. कलाकारांवरही चरित्रपट येतात. आता ‘मधुबाला’वर चरित्रपट निर्माण केला जातोय, धक्का बसला? पण सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे ती, ‘मधुबाला’ साकारणार कोण? तितकाच अथवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, ‘ती’ मधुबाला खरंच वाटेल का? भलेही उच्च दर्जाचे रंगभूषाकार असोत, कल्पक वेशभूषाकार असोत, अनुभवी छायाचित्रणकार असोत, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर असो, ‘मधुबाला’ ची सर येईलच कशी? मधुबाला एकच होती, एकच असू शकते, एकच असणार. हे सर्वकालीन सत्य. दुसरी, तिसरी, चौथी मधुबाला होणे नाही, असणे नाही.

मधुबाला (जन्म १४ फेब्रुवारी १९३३. मृत्यू २३ फेब्रुवारी १९६९) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक देखणी सौंदर्यवती. तिचा सहजसुंदर अभिनय आणि नृत्य यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसे. एव्हाना हिंदी चित्रपटाच्या शौकीनाच्या डोळ्यासमोर के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ (१९६०) या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या… हे बहारदार नृत्यगीत आलेही असेल. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने गुगलवर जाऊन सर्च केले असेल- मधुबाला. आणि ते पाहत राहिलेही असतील. चित्रपट माध्यम आणि व्यवसाय याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, काळ कितीही बदलला, पुढे सरकला तरी मागील पिढीतील अनेक चित्रपट, त्यांच्या गोष्टी, गीत, संगीत आणि मधुबालासारखे गुणी कलाकारही पुढे जात असतात. याच मधुबालावर चरित्रपट निर्माण करण्याची तीन-चार वर्षांपासून तयारी सुरु आहे. सुरुवातीला बातमी होती, या चरित्रपटाला तिच्या कुटुंबियांची परवानगी नाही. कोणावरही चरित्रपट निर्माण करताना परवानगी हा कळीचा मुद्दा. अर्थात, विविध माध्यमांतून आणि अनेकांच्या मुलाखतीतून जुन्या काळातील चित्रपट आणि त्यातील अनेक कलाकार याबाबत भरभरून माहिती मिळेल, पण चरित्रपट निर्माण करताना तीच व्यक्ती पुन्हा पडद्यावर आणली जात आहे तेव्हा काही संदर्भ, तपशील, माहिती गोष्टी चूकू नयेत अशी त्या कलाकाराच्या कुटुंबियांची नक्कीच अपेक्षा असू शकते.
मधुबालाच्या आयुष्याला पडद्यावर आणायचं तर त्यात जास्त काळजी घेणे आवश्यक. तेवढेच आवश्यक आहे ते, ‘मधुबाला’ साकारायला योग्य अभिनेत्री मिळणं. कियारा अडवाणी हिने होकार दिल्याची बातमी तिने नकार कधी दिला हे न समजण्यातच विरघळली. आपण कितीही प्रयत्न केले तरी ‘मधुबाला’ दिसणार नाही याची तिला कल्पना आली हे केवढेतरी शहाणपण. त्यानंतर अगदी कालपरवा नाव आले, अनित पड्डा ही ‘मधुबाला’ साकारणार. ‘सय्यारा’ (२०२५) या प्रेमकथेची ती नायिका. तिचा हा आतापर्यंतचा एकमेव चित्रपट. तरीही तिची ‘मधुबाला’साठी निवड व्हावी हे खुद्द तिला तरी पटलं का? दोनच दिवसांत तिचा नकार आला. फार फार समजदार हो ती. आता ‘मधुबाला’ साकारायला कोण बरे होकार देणार? माधुरी दीक्षित की प्रियांका चोप्रा? नव्वदच्या दशकात एकदा ख्यातनाम छायाचित्रणकार गौतम राजाध्यक्ष यांनी माधुरी दीक्षितच अगदी “डिट्टो” मधुबालासारखं देखणं फोटोसेशन केले होते. क्षणभर ते जमल्यासारखेही वाटले.

‘मुघल ए आझम’च्या त्याच प्यार किया तो डरना क्याचाच.. लूक माधुरी दीक्षितला दिला होता आणि तो शोभलाही होता. माधुरीकडेही मधुबालासारखे कधीही न आटणारे असे नैसर्गिक हास्य आहे. हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. एक दैवी देणगी. पण म्हणून काय माधुरी दीक्षित ‘मधुबाला’ कशी होईल? कोणीही कोणासारखे होऊ शकत नाहीत. आणि ‘मधुबाला’ तर नाहीच नाही. आणि ‘मधुबाला’वरचा चरित्रपट म्हणजे नेमके काय दाखवणार? तिचं खासगी आयुष्य की चित्रपटसृष्टीतील जीवन? तिनं किशोरकुमारशी केलेलं लग्न की तिच गंभीर आजारपण? आणि मुळात प्रश्न आहे तो, खूप खूप प्रयत्नपूर्वकही ‘मधुबाला’ कोण आणि कशी साकारणार? मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘डर्टी पिक्चर’मध्ये साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील वादग्रस्त नि बहुचर्चित अभिनेत्री सिल्क स्मिता साकारताना विद्या बालनने आवश्यक तसं भडक रुपडं घेतलं, व्यक्तिरेखाही एकदम चोख बजावली. पण तिला सिल्क स्मितासारखी भेदक नजर दाखवता आली नाही. तेच तर महत्त्वाचं होतं. मधुबालाच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वातील गोडवा तिच्या नजरेतही आहे, तशी आणि ती नजर कोठून आणणार? अभिनयात खरा खेळ नजरेचा असतो. कटाक्ष, बोलके डोळे खूपखूप महत्त्वाचे. मी दुर्बिणीतून पाहतोय, पण कोणीही दिसत नाही. तुमच्या नजरेत तशी कोणी आहे का?
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

